Tuesday, March 8, 2011

हंगामा - पान १६

प्रतिक्रिया: 
"वेगळ्याच कामात!" इन्स्पे. जमदाडे उपहासाने हसले. "दारूच्या भट्टीची नासधूस कुणी केली, त्याला शोधून काढायचं आणि मरेस्तोवर मारायचं. हेच ना ते वेगळं काम? त्यापेक्षा आपल्या भट्टीमुळे जी आग लागली त्यात कुणाचं काही नुकसान तर झालं नाही ना, हे आधी पहावं असं नाही वाटलं तुम्हाला. ती जबाबदारी तुमच्या मोठ्या भावाची?!... आणि कशासाठी करावं त्यांनी हे? कारण तुमच्यासारखा गुंड त्यांचा लहान भाऊ आहे म्हणून?"

तुकाजीने चोरटया नजरेने धनाजीरावाकडे पाहिलं. धनाजीराव काही न बोलता खाली मान घालून ऐकत होता पण त्याला मनातून बरं वाटत होतं. तुकाजीला असं कुणी तरी फटकावणारं हवंच होतं.

रदबदलीचा शेवटचा प्रयत्न म्हणून धनाजीरावाने बोलण्याचा प्रयत्न केला. तुकाजीच्या नादाला लागून आपणही केवढी मोठी चूक करत होतो हे त्याच्या लक्षात आलं. कदाचित आपलं सरपंचपदही तुकाजीच्या आततायीपणामुळे धोक्यात येतंय असं त्याला वाटायला लागलं.

"जमदाडे सायेब, ज्ये झालं त्ये वाईट झालं आसंच मलाबी वाटतं बगा. पन आता फुडं आसं कायबी व्हनार न्हाई याची आमी काळजी घेऊ."

इन्स्पे. जमदाड्यांनी धनाजीरावांकडे रोखून पाहिलं, "धनाजीराव, तुम्हाला काय वाटतं, मी इथे हे भाषण देण्यासाठी आलोय का? तुमच्या गावात बेकायदा दारूची भट्टी लावली होती आणि तिला आग लागली ही बातमी वरपर्यंत पोहोचली आहे. या आगीमुळे गावातल्या माणसांच्या जीवाला धोका पोहोचू शकला असता. आता तुमचा हिस्सा ठेवा तुमच्याचकडे. गावातला दारूचा गुत्ताही बंद आणि तुमची भट्टीही बंद! माझ्या हातात आता काहीच उरलेलं नाही. वरिष्ठांकडून ऑर्डर घेऊनच इकडे आलोय मी. तुकाजी आणि तुम्ही दोघांनाही अटक करायला.

"अटक? मला?" धनाजी गुरकावला.

"तुम्हाला अटक करावीच लागणार धनाजीराव. अहो तुमच्याच नावावर तर भट्टी चालवतात तुमचे धाकडे बंधुराज." धनाजीने संताप आणि असहायतेने डोळे मिटले. तुकाजीने तेवढ्यात निसटून जाण्याचा प्रयत्न केला पण तो नेमका मागे उभ्या असलेल्या हवालदारालाच जाऊन धडकला. तुकाजीची माणसं वेळ पाहून मागच्या मागे पसार झाली होती.

तुकाजीने संतापून रामचंद्राच्या नावाने एक अर्वाच्य शिवी हासडली.

"आता रामचंद्राला शिव्या देतोस? अरे, तू आणि तुझ्या माणसांनी विनाकारण मारलंत त्याला. सरकारी हॉस्पिटल मधे त्याला अ‍ॅडमिड करावं लागलं. तरीदेखील तुझ्या भट्टीवर जखमी झालेल्या लोकांना त्याचे मित्र मदत करत होते आणि तू त्यालाच शिव्या देतोयंस? त्याला मारहाण केल्याच्या आरोपावरून तुला अटक करायलाच मी इकडे आलो आहे."