Monday, March 14, 2011

हंगामा - पान १७ (समाप्त)

प्रतिक्रिया: 
तुकाजी हे काहीतरी नवीनच ऐकत होता. रामचंद्र काळा की गोरा त्याला माहित नव्हतं. भट्टीवर लागलेल्या आगीला तोच जबाबदार आहे असं वाटून त्याने आणि त्याच्या माणसांनी दिवसभर रामचंद्राचा शोध घेतला खरा, पण तो काही सापडला नव्हता आणि आता इन्स्पेक्टर जमदाडे काहीरी वेगळंच ऐकवत होते त्याला.

“अवो सायेब, आमी समद्ये त्याला हुडकत व्हतो पन त्यो गावला नाय आमाला. त्याला शोधून म्या थेट हितच आलो बगा. आन्‌इनाकारन कशापायी मारलं आस्तं? भट्टीला आग त्यानंच लावली व्हती. हाताला लागला असता तर खरंच जित्ता ठेवला नस्ता.” तुकाजी म्हणाला.

"अरे चूप! चोराच्या उलट्या बोंबा!! आणि पोलिसांसमोर धमक्या देतोयंस? तू नाही मारहाण केलीस त्याला तर मग काय या गावतल्या भुताटकीनं केली का?" इन्स्पे. जमदाडे ओरडले. “हं! भुताटकी आहे म्हणे गावात. अरे तुक्या, तुझ्या भट्टीवर हल्ला झाला तो गावाबाहेरच्या झाडांवर असलेल्या माकडांनी केला. जरा डोकं चालव. आजपर्यंत तुमच्या गावात फक्त दारू प्यायलेल्या माणसांवरच हल्ला का झाला? कारण दारूचा वास माकडांना बेभान करायचा. त्यांना दारू हवी होती आणि ती कुठे मिळणार होती?.. तुझ्या भट्टीवर आणि गुत्त्यावर... मग दुसरीकडे कशाला जातील ती? काल असंच काहीतरी झालं असणार, ज्यामुळे तुझ्या भट्टीला आग लागली. बोलून चालून माकडंच ती.”

तुकाजीच काय पण धनाजीच्या घराबाहेर जमलेले सगळेच गावकरी आ वासून हे ऐकत होते.

“गावात येताना तुम्ही लोक माकडांना काही ना काही खायला प्यायला देता ना? तुमच्याच गावातल्या कुणा मुर्ख माणसाने माकडांना दारू पाजली होती दारू! कळतंय का काही? अरे माकडं आहेत ती! त्यांना दारू पाजली तर ती काय करणार?”

"हंगामा!" कुणीतरी बोललं.

"कळलं? चल आता, तुक्या. स्वत:सोबत मोठ्या भावालाही अडकवलंस तू." इन्स्पे. जमदाडे म्हणाले.

तुकाजीने खाली मान घातली. गावात येता जाता माकडांची चेष्टा करण्यासाठी तो माकडांच्या अंगावर दारूची रिकामी बाटली फेकायचा. त्याचं पर्यावसान अशा प्रकारात होईल हे त्याला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. त्याच्या मते भुताटकीचे प्रकार करणारा धनाजीरावांच्या हितशत्रूंपैकी कुणीतरी होता. सुटकेचा शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने इन्स्पेक्टर जमदाड्यांसमोर हात जोडले.

"अवो सायेब, आयच्यान सांगतो. म्या भट्टी चालिवली पन त्या रामचंद्राला म्या हातबी लावला नाय. आवो म्या त्येला बगीतल्यालंच न्हाय तर." तुकाजी काकुळतीला येऊन सांगत होता पण जमदाड्यांनी त्याचं काही न ऐकता त्याला पुढे ढकलला.

हातात बेड्या घातलेले धनाजी आणि तुकाजी, सोबत इन्स्पेक्टर, तीन हवालदार आणि मागे गावकरी अशी सगळी वरात निघाली. जीपमधे बसल्यावरही तुकाजीच्या मनात एकच प्रश्‍न घोळत होता, "रामचंद्राला कुणी मारहाण केली असेल?" गावाच्या वेशीपाशी येताच जीपवर काहीतरी खळ्ळक्‌न फुटल्याचा आवाज आला. ड्रायव्हरने जीप थांबवून बाहेर पाहिलं. "बाटली!" तो उद्गारला. धनाजी खाऊ का गिळू अशा नजरेने तुकाजीकडे पहात होता. तुकाजीने काही खालची मान वर केली नाही.

इकडे तालुक्याच्या सरकारी हॉस्पिटलमधे प्लॅस्टरमधे हात घेऊन बसलेल्या रामचंद्राला दौलती सांगत होता, "म्या फकस्त पंधरा यीस दारूच्या बाटल्या सांडवत येशीपासून भट्टीपर्यंत नेल्या व्हत्या. पन माकडं दारूच्या वासानं पगलं होऊन एवडं काय करतील आसं काय मला वाटलं न्हवतं. नशीब! माह्यासोबत आनखी दोन जन व्हते म्हून, नायतर मलाबी झाली असती… भुताटकीची बाऽऽधा."

त्याचं बोलणं ऐकून रामचंद्र जोरात हसला पण त्याच्या जबड्याला कळ लागली. कळ सहन करता करता तो म्हणाला, "दौलती, म्या तुला माझ्या तोंडावर जास्त मारायला सांगितलं व्हतं, तर तू तोंडावर कमी मारलंस आन्‌हात तेवडा फॅक्चर करून ठिवलास बग."

दौलती खिदळत म्हणाला, "आता मला काय माहित फॅक्चर व्हईल ते? म्या फकस्त जोरात पिरगाळला व्हता. पन या हातामुळंच धनाजीसंग तुकाजीलाबी आत धाडायची सोय झाली का न्हाई?

रामचंद्राने मान डोलवत दुसर्‍या हाताने दौलतीला टाळी द्यायला हात उचलला पण समोरून धावत येणार्‍या कमळी आणि तिच्या सासूला पाहून तो नुसताच कण्हत राहिला.
समाप्त