Friday, February 25, 2011

हंगामा - पान १५

प्रतिक्रिया: 
पिसाळलेला तुकाजी तसाच आपली माणसं सोबत घेऊन रामचंद्राच्या घरी पोहोचला तेव्हा रामचंद्र घरात नव्हताच. रामचंद्राची आई तुकाजीला पाहूनच गांगरून गेली होती. तिला धड काहीच सांगता आलं नाही. तुकाजीने त्याची माणसं तालुक्याच्या गावीही पाठवली पण रामचंद्र काही सापडला नाही.

रामचंद्र असा हवेत विरल्यासारखा गायब कसा झाला याचा विचार करतच तुकाजी पुन्हा आपल्या गावी परतला. तर गावात कधी नव्हे ते पोलिस आलेले. पोलिसांना पाहून हे प्रकरण डोईजड होत असल्याचा अंदाज तुकाजीला आला होता. त्याने सावरासावर करण्यासाठी तोंड उघडलं खरं पण धनाजीरावाने तुकाजीला डोळ्यांनीच गप्प बसण्याचा इशारा केला.

इन्स्पेक्टर जमदाडे बोलत होते, "सरपंच साहेब, तुमचं इथं या गावात काय काय चालतं हे आम्हाला कळत नाही असं नाही पण काय आहे ना, आम्ही हा विचार करतो की या गावात कुणी चांगला शिकला सवरलेला... म्हणजे तुमच्याइतका शिकला सवरलेला माणूस दुसरा नाही. तेव्हा तुमच्या उद्योगधंद्यामुळे तुम्हाला ’आत’ जाण्याची जर कधी वेळ आलीच तर गावाचं भलं बुरं कोण पहाणार ओ? आता... गावात दारूचा गुत्ता असेपर्यंत ठीक होतं. गुत्ता काय?... तालुक्याच्या गावी पाच गुत्ते आहेत. पण तुम्ही तुमच्या सरपंचपदाचा फायदा घेऊन गावात चक्क दारूची भट्टी चालू केलीत? तीही बेकायदा?..."

"पण साहेब, तुमाला तुमचा हिस्सा मिळत व्हता ना?" तुकाजीने न रहावून मधेच तोंड घातलं. धनाजीच्या चेहेर्‍यावरचे हावभाव बघण्यालायक झाले होते.

इन्स्पे. जमदाडे तुकाजीकडे पाहून वेड्यात काढावं तसे हसले. "असं बघा तुकाजीराव, हिस्सा मिळत होता आणि तो तुम्ही तुमची भट्टी चालू रहावी यासाठी देत होतात. आम्हीही तुमच्या मोठ्या बंधुराजाकडे पाहून तो घेत होतो. आणि तुम्हालाही या गावात अभय मिळालंय ते तुमच्या बंधुराजांमुळे. ते नसतील तर इथलं कुलंगी कुत्रंसुद्धा तुम्हाला विचारणार नाही."

तुकाजी पुन्हा काही्तरी बोलणार होता पण इन्स्पे. जमदाडेंनी त्याला हातानेच अडवलं. "तुकाजीराव, तुमच्या भट्टीवर जी माणसं जखमी झालीत, त्यांना तालुक्याच्या सरकारी हॉस्पिटलात ठेवलंय. त्यांच्यावर उपचार करण्याआधी अपघाताचं कारण काय देणार होतात तुम्ही? बोला? त्यांचा इलाज होतोय तो धनाजीरावांच्या शब्दावर. तुमच्या जखमी माणसांना तोंडदेखलं भेटायला तरी गेलात का तुम्ही?"

" म्या... त्यो... रा… अं.. म्या एका येगळ्याच कामात अडकलो होतो." तुकाजीने गुळमुळीतपणे उत्तर दिलं.