Wednesday, February 23, 2011

हंगामा - पान १४

प्रतिक्रिया: 
त्याच रात्री धनाजी-तुकाजीच्या हातभट्टीवर हल्ला झाला.... भुताटकीचा! भट्टीबाहेर तयार असलेले दारूचे भरलेले पिंप भुताटकीने फोडले. सगळी दारू मातीत मिसळली. भट्टीची पत्र्याची शेड कोसळली. भट्टीच्या एका बाजूला आगही लागली. सुदैवाने ते वेळीच लक्षात आलं म्हणून नाहीतर आग गावात पसरायला वेळ लागला नसता. भट्टीवर काम काम करणारे दोन-तीन कामगारही थोडेफार जखमी झाले होते. त्यांना ताबडतोब तालुक्याच्या गावच्या इस्पितळात हलवावं लागलं.

या घटनेमुळे मात्र तुकाजी पिसाळला. ही भुताटकी नाही याबद्दल त्याला खात्री होती. हे नुकसान करण्याची हिम्मत गावातल्या कुणाची नाही हे देखील त्याला चांगलं माहित होतं. मग बाहेरचा कोण आहे तो ज्याने भुताटकीचा फायदा घेऊन आपलं एवढं नुकसान केलं.... कोण आहे तो.....ज्याला या गावाच्या भल्याची इतकी पडलीय?

तुकाजीने आपल्या माणसांना कामाला लावलं. गावात बाहेरची किती माणसं आली आणि त्यांचं कुणाकडे काय काम होतं याची त्याला माहिती हवी होती. काही क्षणांतच त्याला बातमी मिळाली. भुताटकीचे प्रकार सुरू झाल्यापासून गावात बाहेरून आलेली तीनच माणसं - पहिला मांत्रिक, दुसरा रामचंद्र आणि तिसरा डॉक्टर. तिघेही एकाच दिवशी सदाच्याच घरी गेले होते. सदाला तुकाजीच्या भट्टीवर काम करतानाच भुतबाधा झाली होती. रामचंद्राने येऊन मांत्रिकाला सुद्धा पळवून लावलं होतं म्हणे आणि नंतर तो स्वत:ही निघून गेला होता. पण त्याने सदाच्या उपचारांसाठी डॉक्टर धाडला होता. बास! तुकाजीला आणखी काय पाहीजे होतं? धनाजीरावाने दिलेला सबुरीचा सल्ला धुडकावून मागचा पुढचा काही विचार न करता त्याने तडक आपली माणसं सदाच्या घरी पाठवली. तुकाजीच्या माणसांना पाहून आराम करत असलेला सदासुद्धा धडपडत अदबीने उभा राहिला.

"रामचंद्र कुटं र्‍हातो?" तुकाजीच्या एका माणसाने विचारलं.
"रामचंद्र...? त्यो कशाला पायजे तुमाला?" सदाने विचारलं.
"इचारतोय त्येचं उत्तर दे. रामचंद्र कुटं हाय.?"
"त्यो.... गेला.... त्येच्या घरला..." सदाने चाचरत उत्तर दिलं.
"कुटल्या गावचा हाय त्यो?"

तुकाजीच्या माणसाचा अवतार पाहून सदाला खरंतर या प्रश्नाचं उत्तर देण्याची अजिबात इच्छा होत नव्हती पण तो न बोलता तर त्याची धडगत नव्हती, हे त्याला चांगलं माहित होतं. त्याने रामचंद्राचा पत्ता देऊन टाकला. तुकाजीची माणसं निघून गेली तशी कमळी सदाशी तावातावाने भांडायला लागली. तिचंही बरोबर होतं म्हणा. रामचंद्र तिचा सख्खा मोठा भाऊ होता. तुकाजीची माणसं कशी आहेत, हे तिला चांगलं माहित होतं.