Monday, February 21, 2011

हंगामा - पान १३

प्रतिक्रिया: 
सदाच्या घरून रामचंद्र आवेशात घराच्या बाहेर पडला खरा पण पुढे कसं काय करायचं हे काही त्याने ठरवलेलं नव्हतं. काही अंतर पुढे गेल्यावर तो थांबला. त्याच्या डोक्यात विचारचक्र गतीने फिरत होतं. हा प्रकार भुताटकीचा नाही, हे त्याला कळून चुकलं होतं. पण दारूच्या नादी लागलेल्या गावकर्‍यांना अद्दल घडायलाच हवी होती आणि तुकाजीलासुद्धा. त्याच्याच दारूच्या भट्टीमुळे गावात दारू पाण्यासारखी वाहू लागली होती. जर भट्टी आणि गुत्ता बंद झाला तर "भुताटकी"देखील आपोआपच थांबणार होती. या समस्येवर कायमचा उपाय कसा करावा याचा रामचंद्र विचार करत होता.

सर्वात प्रथम त्याच्या डोक्यात विचार आला तो पोलिस तक्रार करण्याचा. पण धनाजीरावाने पोलिसांचे हातही बांधून ठेवले असणार याची त्याला कल्पना होती. केवळ रामचंद्राच्या विनंतीवरून भट्टी बंद करण्यासाठी गावात पोलिस येणं शक्य नव्हतं. त्यातून तो गावाबाहेरचा माणूस होता. काही केल्या रामचंद्राला उपाय सुचत नव्हता. वैतागून त्याने डोक्याला बांधलेला फेटा काढून हातात घेतला आणि तो डोकं खाजवू लागला. त्याला एक नामी युक्ती सापडली.

"आस्सं! काट्यानेच काटा काडला पायजे." तो स्वत:शीच म्हणाला आणि त्याने चुटकी वाजवली. पुढे काय करायचं याचं चित्र त्याच्या डोळ्यांसमोर स्पष्ट होतं. आता फक्त त्याने ठरवलं होतं तसं सगळं जुळून यायला हवं होतं. त्याने लगबगीने पाऊलं उचलली. सुदैवाने गावाबाहेर पडल्या पडल्या एका फटफटीवाल्याने त्याला आपली मागची सीट देऊ केली त्यामुळे तो लवकर गावी पोहोचला. सर्वात आधी त्याने गावातल्या डॉक्टरला सदाच्या गावी धाडला.

सदासाठी डॉक्टर पाठवल्यावर त्याला सर्वात आधी आठवण झाली ती आपल्या जिगरी दोस्ताची - दौलतीची. तो तसाच दौलतीकडे गेला. त्याला सर्व परिस्थिती समजावून सांगितली. आपला बेतही समजावून सांगितला. दौलतीला ती कल्पना भयानक आवडली.

"लई सुपिक डोकं तुजं गड्या!" दौलतीने हसत मनापासून रामचंद्राला दाद दिली. पण रामचंद्र हसला नाही. तो गंभीर होता. या कामात स्वत:चाच काय पण इतर कुणाचाही जीव त्याला धोक्यात घालायचा नव्हता आणि तो जे करणार होता त्याच्या परिणामांवरच त्याचा पुढचा बेत अवलंबून होता.

"दौलती, कसंबी करून आज रातच्यालाच ह्ये काम उरकलं पायजे." रामचंद्र म्हणाला.
"काम हुईल पन तुजं काय गड्या?" दौलतीने काळजीने प्रश्न केला.
"कायतरी मिळवायचं तर कायतरी गमवावंबी लागतंच." रामचंद्र म्हणाला.
"आरं पर तुज्या जीवावर बेततंय ह्ये." दौलती म्हणाला.
"ठावं हाय. पन म्या फकस्त माज्या भनीसाटी न्हाई करत ह्ये. गावातल्या समद्या बाया माज्या आया-भनीच हाईत. आशी भुताटकी उदगावात आली त्ये चांगलंच झालं पन हे जास्त दिस चाललं तर भुताटकी म्हंजी काय व्हतं हे समद्यांलाच कळंल पन आवरायला भारी भारी पडंल. आत्ताच बंदुबस्त क्येला पायजे." रामचंद्राने एक सुस्कारा सोडला. "चल, म्या निगतो. सांगितलेलं समदं लक्षात हाये ना तुज्या?"

दौलतीने होकारार्थी मान डोलावली. त्याच्या पाठीवर थोपटत रामचंद्र म्हणाला, "माजी समदी मदार आता तुज्यावर हाय गड्या."

"काळजी करू नगंस. म्या तुला सबुत दिलाय." दौलती म्हणाला. रामचंद्र त्याच्या निरोप घेऊन घराबाहेर पडला.