Friday, February 18, 2011

हंगामा - पान १२

प्रतिक्रिया: 
"आरं ये. काय नाय झालंय तुज्या बा ला. एकदम मस्त हाय त्यो. ये चल." रामचंद्राने पुन्हा बोलावल्यावर मात्र विकास पुढे झाला. रामचंद्राकडून बिस्किटांचा पुडा, खेळणं घेतल्यावर त्याची भिती थोडीशी कमी झाली. सदाच्या अंगावरचे वळ बघून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने हळूच सदाला हात लावला. सदाने चटका बसल्यासारखा हात बाजूला केला.

"बा, लई दुकतं का रं?" त्याने सदाला विचारलं.
"हां, थोडं दुकतंय. आधीच भुताटकी वार, त्यात मांत्रिक बाबाचा मार..." सदाने वैतागून एक सुस्कारा सोडला.

पण विकासला सदाच्या वाक्याची मोठी गम्मत वाटली. त्याने वळून रामचंद्राला म्हटलं, "मामा, आत्ता बा बोलला ना, आमचं मास्तरबी आसंच कायतरी म्हनत्यात. म्हंजी... आमच्या वर्गात एक पोरगा हाय, दिलीप नावाचा. त्यो लई खोड्या काडतो मुलांच्या. आनि कंदी घरला येताना जर एकटा-दुकटा पोरगा त्याच्या हातात सापडला ना, तर त्याचीच धुलाईच होते. मग दुसर्‍या दिवशी दिलीपला छड्या मारताना मास्तर म्हनत्यात, "आधीच मरतुकडं त्यात मध्ध पिलाय."

रामचंद्राला त्याचं वाक्य ऐकून हसू आलं. तो हसू आवरत म्हणाला, "आरं इकास, तसं न्हाई ते. तुझं मास्तर म्हनत आसतील, "आधीच मरकट त्यात मद्य प्यायला", रामचंद्र एका एका शब्दावर जोर देत म्हणाला. "आमीबी साळंत असताना ऐकली होती ही म्हन."

"आधीच मरकट त्यात मद्य प्यायला!" विकासने स्वत:शीच ते वाक्य म्हटलं पण त्याला त्याचा अर्थ काही कळला नाही. त्याने रामचंद्राला विचारलं, "पन म्हंजी काय रं मामा? आधीच मरकट..." विकास गोंधळला होता.

रामचंद्राने त्याला समजावलं. "आरं बाळा,… मरकट म्हंजी माकाड आनि मद्य म्हंजी दारू. म्या काय म्हनलो, "आधीच मरकट त्यात मद्य प्यायला"… म्हंजी… माकाड कसं आसतं?... गावाच्या येशीवरची माकडं कशी हायत सांग? अशी कुनाला तरास देत न्हाईत. पन पावना दिसला की...! आता जर पावन्याकडं काय नसलं आनि त्याने एखांद्या माकडाला दारू दिली तर काय व्हईल?"

"बाबौ! हंगामाच की!" विकासने तोंडावर हात ठेवत म्हटलं. तो नुसत्या कल्पनेनेच चकीत झाला होता. त्याला हसू आवरत नव्हतं.

विकासकडे पहाता पहाता रामचंद्राच्याही चेहेर्‍यावरचे भाव बदलले. त्याने नकळत दोन्ही हात डोक्यावर ठेवले आणि तो उद्गारला, “"आरं बाबा माज्याऽ!"

डोक्यावर हात तसेच ठेवून त्याने एकदा सदाकडे पाहिलं, एकदा विकासकडे पाहिलं. मग झटका आल्यासारखा वळून त्याने सदाच्या आईचे हात धरले. "आलोच म्या," असं म्हणत रामचंद्र तसाच उठला आणि घराबाहेर पडला. सदाने दरवाजाच्या चौकटीकडे पाहिलं आणि तो आपल्या आईला म्हणाला, "साथीच्या रोगावानी भुताटकीबी येकाची दुसर्‍याला लागती का काय?"