Tuesday, December 28, 2010

हंगामा - पान ११

प्रतिक्रिया: 
आपण सदाच्या आईशी मगाशी जास्तच उद्धटपणे बोललो असं रामचंद्राला वाटलं. त्याने पुढे होऊन सदाच्या आईच्या पायावर डोकं ठेवलं.

"आरं, आरं! काय करतुयास?"
"मला माफ करा आत्या. म्या तुमच्याशी लई रागावून बोललो मघा. पन सदानंदरावांचं हाल मला बगवनात."
"आरं पोरा, मला पन तेच बगवत नव्हतं रे. भुताटकी या सोडंना. काल रातच्याला त्यानं जो तमाशा चालिवला होता, त्यो बगाया तू नव्हतास. इस्वास नसंल, तर तुज्या भनीला इच्चार." सदाची आई आपले डोळे टिपत म्हणाली. तिने कमळीला हाक मारली.

कमळी धावतच बाहेर आली. तिने आतून बोलणं ऐकलं होतं. कालचा प्रसंग तिच्याही मनात धडकी भरवणाराच होता.
"दादा, कालची रात लई वाईट होती. हे घरी आले तोच कसंतरी करू लागले व्हते. कुनालाच जुमानित न्हवते. रातभर त्येंला आमी बांधून ठिवलं होतं." कमळी सदाकडे आणि सासूकडे आळीपाळीने पहात म्हणाली.
"आस्स! मंग रातच्यालाच डागदरकडं का न्हाई नेलं?"
कमळी काही उत्तर देणार इतक्यात तिची सासूच बोलली. "रातच्याला घराभायीर जायची सोय र्हा यली न्हाय गावात… आनि डागदर कशाला? ही भुताटकी हाय."

सदाच्या आईला याच्यावर काहीतरी खरमरीत उत्तर द्यावं असं रामचंद्राला खूप वाटत होतं. पण तिची त्यात चूक नाही हे लक्षात आल्यावर त्याने हे प्रकरण वेगळ्या पद्धतीने हाताळायचं ठरवलं.

"काय सांगता? भुताटकी? तुमाला कसं कळलं आत्या?" रामचंद्राने विचारलं.
"रातच्याला त्याची हालत बगूनच म्या ताडलं का ही भुताटकी हाये." सदाची आई आत्मविश्वासाने म्हणाली.
"का रं सदा? आत्या काय म्हन्त्याती?" रामचंद्राने सदालाच विचारलं.

सदा काहीच बोलण्यच्या मन:स्थितीत नव्हता. त्याचं लक्ष कमळीच्या येण्याकडे होतं. तिला स्वयंपाकघरातून आलेली पाहून त्याला बरं वाटलं. इतकं थकल्यावर काहीतरी अन्न पोटात जाणं ही त्याची गरज होती. कमळीने आणलेला चहा आणि बटर पाहून त्याचे डोळे लकाकले.
रामचंद्रानेही ते पाहीलं. त्याने काही न बोलता सदाच्या पुढ्यात चहा आणि पाच-सहा बटर ठेवले. इतका वेळ काही न बोलता सर्वकाही पहाणार्यान सदाच्या मुलावर त्याची नजर गेली. सदाचा मुलगा विकास एका कोपर्यारत गपचूप बसून मोठ्या माणसांचं काय चालंलं आहे, हे पहात होता.

"ए, इकास. काय त्या कोन्यात बसून करतो रे? ये, इकडं ये. तुज्यासाटी काय आनलंय बग." रामचंद्राने विकासला हसून बोलावलं. विकास मात्र सदाकडे पहात पुढे जावं की न जावं या विचारात तिथेच बसून होता.