Wednesday, December 8, 2010

हंगामा - पान ९

प्रतिक्रिया: 
तरीदेखील सदाला मांत्रिकाच्या मारापासून वाचवण्यासाठी सदाची बायको धीर एकवटून आपल्या सासूला म्हणाली, "आत्या, याच्यापरिस त्यांला डागदरकडं निऊया की."

सदाच्या आईने हे ऐकलं मात्र! मांत्रिकापेक्षाही तिचा चेहेरा रागीट दिसू लागला. ती सदाच्या बायकोच्या अंगावर खेकसली, "गप बस! ज्यात कळत न्हाई त्यात बोलू नगंस, कमळे. माझा एकुलता एक प्वोरगा हाय त्यो."

आपण पुढे तोंड चालवलं तर काय होणार हे कमळीला माहीत होतं, ती काही न बोलता पुढचा तमाशा उघड्या डोळ्यांनी पहायला तयार झाली.

"ह्येला आता घिऊन चला." मांत्रिकाने आज्ञा सोडली तशी पाच सहा जणांनी सदाचं मुटकुळं उचलून त्याच्या घरात एका कोपर्‍यात नेऊन ठेवलं. मांत्रिकाने सर्वांना बाहेर जायला सांगितलं. आता घरात फक्त मांत्रिक, सदा, त्याची आई, बायको आणि त्याचा लहान मुलगा एवढेच उरले. मांत्रिकाने घराचं दार लावून घेतलं. मांत्रिकाने स्वत:च्या पोतडीतून एक लोखंडाची सळई काढली.

"इस्तव पेटवा," त्याने पुन्हा हुकूम सोडला. पण कमळीच्या मनात चलबिचल होत होती. सासूचं आणि मांत्रिकाचं ऐकावं की नवर्‍याला वाचवावं... तिला काहीच कळत नव्हतं.

"एऽ! ऐकलं न्हाईस का? जा, इस्तव पेटीव." सासूचा आवाज कानावर पडला तशी कमळी नाईलाजाने स्वयंपाकघराकडे वळली. इतक्यात बाहेर कुणाची तरी चाहूल लागली. सदाचं नशीब जोरावर असावं.

"सदानंदराव, ओ सदानंदराव!" बाहेरून हाक आली. आवाजावरूनच कमळीने ताडलं की हा तिचा भाऊ रामचंद्र आहे. ती क्षणाचाही विलंब न करता धावतच घराबाहेर गेली. बाहेर कमळीचा दादा हसतमुखाने कुणाच्या तरी बाहेर येण्याची वाट पहात होता. कमळीला बाहेर आलेलं पाहून त्याला आनंद झाला पण तिच्या चेहेर्‍यावरचे भाव पाहिल्यानंतर काही तरी निराळंच घडतंय याची त्याला लगेच कल्पना आली.

"का गं, कमळे? भरल्या घरात हा काय अवतार करून बसलीयास?" त्याने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. इतक्या दिवसांनी भाऊ दिसला, तोही अशा दिवशी. कमळीला आपलं दु:ख आवरता आलं नाही. ती हमसाहमशी रडू लागली.

"अगं काय बोलशील तरी? निसतीच डोळं गाळाया लागलीस तर तुज्या मनातलं समजाया म्या काय मांत्रिक हाय व्हय?"

कमळीची मान संतापाने ताडकन वर झाली.

"तू कशाला मांत्रिक व्हतोयंस? आत चल, सगळा तमाशा दिसंल तुला." असं म्हणून कमळीने रामचंद्राला आत येण्यासाठी इशारा केला.