Tuesday, November 16, 2010

मराठी कॉर्नर एक मराठी फोरम

प्रतिक्रिया: 
खास मराठी भाषिकासांठी उपलब्ध असलेल्या अनेक वेबसाईट्स आज आंतरजालावर उपलब्ध आहेत. काही वेबसाईट्सवर तर सदस्यांना विचारांची देवाणघेवाण करता येते. मायबोली, मनोगत, किंवा उपक्रम ही काही उदाहरणं आहेत. याच साईट्ससारखी आणखी एक साईट आंतरजालावर मराठी भाषिकांसाठी रूजू झाली आहे जिचं नाव आहे मराठी कॉर्नर एक मराठी फोरम.

साईटच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की ही साईट केवळ मराठी भाषिकांसाठी आहे म्हणून इतर भाषांचा अपमान करणे वा इतर भाषांचा तिरस्कार करणे हा या साईटचा उद्देश नाही. तर मराठी ब्लॉगिंगची व्याप्ती लक्षात घेता, मराठी ब्लॉगर्सनी एका छताखाली येऊन विचारांचे आदान प्रदान करावे व आपल्या ब्लॉगिंगला अधिकाधिक समृद्ध करावे हा या साईटचा उद्देश आहे.

मराठी कॉर्नरच्या चालक मालक सौ. पल्लवी कुलकर्णी म्हणतात, की त्यांची ही साईट मराठी ब्लॉगर्सच्या व्हर्च्युअल स्नेहनसंमेलनासाठी अतिशय योग्य अशी साईट आहे कारण इथे ब्लॉगर्सना गप्पा गोष्टी करता येतील, दोन क्षण आनंदात घालवता येतील मात्र कुठल्याही प्रकारच्या राजकीय, जातीय वा अश्लील लेखनाला या साईटवर जागा मिळणार नाही! ही वेबसाईट आहे त्यामुळे निर्मिती व देखरेखीचा खर्च भरून काढण्यासाठी गुगलतर्फे पुरवल्या गेलेल्या नाममात्र जाहिराती इथे लावल्या गेल्या असल्या तरी ही साईट संपूर्णत: हौशी मराठी व्यक्तींसाठी बनवलेली आहे.


मराठी ब्लॉगर्सना या साईटचं सदस्य विनामूल्य मिळू शकतंच शिवाय त्यांच्या ब्लॉगवर लेखन करता करता ते या साईटवरही एखादा लेख प्रसिद्ध करू शकतात. इतकंच नव्हे, तर मराठी कॉर्नरवर लवकरच "तुमचा ब्लॉग जोडा" हा विभाग सुरू केला जाणार आहे. ज्यात मराठी ब्लॉगर्स आपला ब्लॉग जोडू शकतात. या विभागात ब्लॉग जोडला गेला की ब्लॉगवरील नोंदी मराठी कॉर्नरवर दिसण्यास सुरूवात होईल. अर्थात ज्यांना ही सुविधा हवी असेल, केवळ त्यांचेच ब्लॉग इथे जोडले जातील.

इंटरनेटवर हल्ली साहित्यचोरीचं प्रमाण वाढलं आहे, हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. तरीदेखील साहित्यचोरीला आळा बसावा म्हणून चालक सौ. पल्लवी कुलकर्णी काही उपाययोजना करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार मराठी कॉर्नरवरील प्रत्येक लेख बारकाईने वाचला जातो. चोरीचे लेख प्रसिद्ध केले जाणार नाहीत, याची त्या पुरेपूर काळजी घेणार आहेत. मात्र तरीही दुर्दैवाने असा एखादा लेख प्रकाशित झाला आणि कुणाला त्यावर आक्षेप असेल, तर त्या व्यक्तीने वैयक्तीक संदेश पाठवल्यास त्याची गांभिर्याने दखल घेतली जाईल.

साईट सुरू होऊन काही दिवसच लोटले आहेत पण या साईटवर निरनिराळ्य़ा सदरांतर्गत लेख प्रकाशित होऊ लागले आहेत. फेसबुकवरही या साईटचं पान आहे. तिथल्या चाहत्यांची संख्या आत्ताच ५६ वर गेली आहे. तर असा हा मराठी कॉर्नर एक मराठी फोरम पहायचा असेल तर इथे क्लिक करा आणि आवडला असेल, तर सदस्यही व्हा!