Wednesday, November 17, 2010

हंगामा - पान ५

प्रतिक्रिया: 
धोंडीबाचा विचार मनात येतात तिच्या मनाचा बांध फुटला. कसाही असला तरी नवरा होता तिचा तो. दारूची अवदसा घरात नसती आणली तर खाऊन-पिऊन तृप्त होतं त्यांचं कुटुंब. रखमाचे पाय जड झाले. वेशीवर असलेल्या मारूतीच्या देवळाबाहेरच ती मटकन बसली. तिने बिट्ट्याला पोटाशी धरलं. बिट्ट्याही तिच्या जोडीने रडत होता.

त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूला असलेल्या झाडांवरची माकडं हळूहळू खाली आली. त्यांच्याकडे लांबूनच कुतुहलाने पाहू लागली. त्या माकडांच्यात एक माकडीणसुद्धा होती. आपल्या पिलाला पोटाशी धरून तीसुद्धा मान फिरवून रखमा आणि बिट्ट्याकडे पहात होती. रखमाचं लक्ष तिच्याकडे गेलं. तिच्यासारखंच आपणही बिट्ट्याला पोटाशी कवटाळलं आहे, हे साम्य रखमाच्या लक्षात आलं आणि ती सर्व दु:ख विसरून खुदकन हसली. दुसर्‍याच क्षणी तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी जमा झालं. पण शेवटी ती आई होती. आपल्या लहानग्या मुलासमोर रडून ती कमजोर पडू शकत नव्हती. तिने त्याच्या केसातून हात फिरवला.

“चल राजा, घरी जाऊ. तुज्या बाला येकटं ठिवलं तर आजून तसाच पडून र्‍हाईल त्यो.”

“पन आये, बा कशाला जातो ते घान दारू पियाला?”

“सटवाई हाय ती. चांगल्या चुंगल्यांला नादाला लावती. चल, आपुन द्येवाकडं मागनं मागू की ही सटवाई आपल्या गावातून पळून जाऊ दे.”

दोघं मायलेक वळले. रखमाने बिट्ट्याला देवळात पाठवलं. त्याने मारूतीला वाकून नमस्कार केला. रखमाने बाहेरून बिट्ट्याचं बोलणं ऐकलं.

“मारूतिराया, आय म्हन्ती का गावात सटवाई आली हाय. ती गावात आन् तू गावाभायीर. मंग कशी जानार ती? माजा बा रोज दारू पितो, रोज आयेला मारतो, मला बी मारतो, कामाला जात न्हाई....माज्या बाला पुन्ना पयल्यासारखा करशील का रं?”

रखमाने आपले पुन्हा पाणावलेले डोळे पुसले आणि मारूतीला बाहेरून नमस्कार केला. मागून कुणीतरी पदर ओढत असल्याचं तिला जाणवलं म्हणून तिने वळून पाहिलं तर मघाची ती माकडीण एका हातात पेरू घेऊन उभी होती आणि दुसर्याळ हाताने ती रखमाचा पदर ओढत होती. तिने हात पुढे करून रखमाला तो पेरू दिला. माकडीण आली तशी निघून गेली. तिच्या पाठोपाठ बाकीची माकडंही झाडावर निघून गेली. रखमाने बिट्ट्याला सोबत घेऊन पुन्हा आपल्या घरचा रस्ता धरला.