Tuesday, November 9, 2010

हंगामा - पान २

प्रतिक्रिया: 
अशा या गावात एक दिवस एक पाहुणा आला. पाहुणा म्हटल्यावर माकडांनी सर्वात आधी त्याच्याकडून पाहूणचार घेतला, नी मगच त्याला पुढे जाऊ दिलं. हा पाहुणा होता तुकाजी पाटील. धनाजीराव पाटीलांचा सख्खा लहान भाऊ. एकदम वांड. लहानपणी तर माजलेल्या वळूसारखा नुसताच गावभर फिरायचा. आधीच वाईट संगत, त्यात आईबापाने केले नसते लाड. तो विशीचा असेल, तेव्हा त्याने तालुक्याच्या बाजारात कुणाशी तरी मारामारी केली होती म्हणे. मारामारीचं पर्यवसान खुनात झालं होतं पण धनाजीराव पाटलांच्या हस्तक्षेपामुळे शिक्षेचा कालावधी कमी झाला. १५ वर्षांची शिक्षा पाच वर्षावर आली.

शिक्षेनंतर तुकाजीला पुन्हा गावाकडेच यायचं होतं पण धनाजीराव पाटील एकदम हुशार माणूस. तो गावात आला म्हटल्यावर गावात चर्चा सुरू होणार. आपलं वजन कमी होणार. परिणाम - सरपंचपद हातातून जाणार. धनाजीरावाने त्याला बरीच वर्ष आपल्या बहिणीच्या सासरी धाडून दिला. पण तिथेही बाळाने त्याचे उद्योग सुरूच ठेवले होते. अशा लोकांना लवकरच समव्यसनी साथिदारही मिळतात. तुकाजीला बहीणीने होता होईस्तो सांभाळला. पण जेव्हा डोक्यावरून पाणी जाऊ लागलं, तेव्हा दिलं पाठवून पुन्हा धनाजीरावाकडे.

तुकाजी आला खरा पण त्याचे इरादे काही चांगले नव्हते. इतकी वर्ष सरपंचपद सांभाळत धनाजीराव पाटीलसुद्धा गबर झाला होता. त्याच्या शब्दाबाहेर जाण्याची कुणाची हिम्मत न व्हावी, एवढा दरारा त्याने पैशाच्या जोरावर निर्माण केला होता. त्यात आता भावाची साथ मिळाली. तुकाजी बाहेरून आला होता, त्यामुळे बाहेरच्या जगात चालणारे उलट-सुलट धंदे त्याला माहित होते आणि त्यातलाच एखादा धंदा आपण गावात सुरू केला, तर चांगलाच चालेल हेही त्याला कळून चुकलं होतं. विचार करकरून तुकाजीची गाडी अडली ती दारूच्या भट्टीपाशी.

"हां! हे करता येईल. न्हाईतरी गावात येकच दारूचा गुत्ता हाय, त्योबी आपलाच! आन् तिथं बाहेरून आनल्याली दारूबी जरा म्हाग इकावी लागती. दारूची भट्टी एकदा का गावात लागली का स्वस्त आनि मस्त दारूसाठी लाईन लागंन.” तुकाजीने आपला विचार मांडला.

झालं! तुकाजीच्या मनात आलं ते धनाजीरावाने मान्य केलं आणि त्याला दारूची भट्टी चालवण्यासाठी परवानगी मिळाली. ही परवानगी अर्थातच कायदेशीर नव्हती. पण कायदा त्या गावात कळत होता कुणाला? सरपंच म्हणेल तो कायदा! हा, हा म्हणता दारूची भट्टी लागली. स्वस्त आणि मस्त दारू गुत्त्यामधे सर्वांसाठी पाण्यासारखी वाहू लागली.