Saturday, November 6, 2010

हंगामा - पान १

प्रतिक्रिया: 
तसं उदगाव हे शहरापासून तुटलेलं. शहरीपणाचा स्पर्श जवळजवळ न झालेलंच. गावात वीज आली असली तरी प्रत्येकाला ते परवडत नव्हतं म्हणून बर्‍याच घरांमधे अजूनही रॉकेलच्या चिमण्या टिवटिवताना दिसायच्या. पण गावात वैशिष्ट्य खूप. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे गावाचं नाव - उदगाव. या गावची माती उदीसारखी राखाडी रंगाची; अशी माती इतर कुठल्याच गावात दिसायची नाही म्हणून या गावाला उदगाव हे नाव पडलं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे गावाच्या वेशीभोवती लावलेली फळझाडं. ती कुणाची होती, माहित नाही. गावात प्रत्येकाकडेच कसण्यापुरती थोडीफार जमीन होती पण त्या कुणीच... की त्यांच्या बाप-आजोबांनीही ही फळझाडं लावल्याचं त्यांना स्मरत नव्हतं.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या फळझाडांवर मुक्काम ठोकून असणारी माकडं. माकडांच्या चित्कारांनी सतत गजबजलेली ही फळझाडं म्हणजे उदगावा्ची संरक्षक भिंतच म्हणा ना! माकडं अशी वस्ताद की गावातला माणूस बरोबर ओळखायची, त्याच्या वाटे कधी जायची नाहीत पण बाहेरून कुणी पाहूणा आलेला दिसला, तर त्याने गावात पाऊल ठेवेपर्यंत हैराण करून सोडायची. चावाबिवायची नाहीत ही माकडं पण बाकी त्रास काय कमी असायचा? पाहुण्यांचे केसच ओढ, कपड्यांची बॅग हिसकावून घे... पाहूणा रिकाम्या हाताने आलेला दिसला तर ही माकडं सरळ त्याच्यासमोर उभी रहात आणि ’दे’ असा हात पसरून पाहूण्याला गावात शिरण्यासाठी लाच मागून घेत. सुरूवातीला कुणाला कळायचं नाही पण नंतर नंतर लक्षात आलं की गावात नवीन येणार्यात माणसाच्या हातात काही नसलं तर ही माकडं काही ना काहीतरी मागून घेऊन जातातच. तेव्हापासून उदगावात येणारा प्रत्येक नवीन माणूस सोबत येतानाच या माकडांसाठी काही ना काही खायला घेऊन यायचा.

गावकरीही माकडांना काही ना काही खायला देत असत, त्यांच्या दृष्टीने माकड म्हणजे मारूतीचं दुसरं रुप. वेशीवरच्या मारूतीच्या देवळातला माकडांचा मुक्त संचार गावकर्यां च्या समजूतीत भरच टाकायचा. उदगावात जशी चांगली माणसं होती, तशीच वाईट माणसं सुद्धा होती. काही पारावर बसून शिळोप्याच्या गप्पा मारायची तर काहींना गावतल्याच आयाबहीणींची छेड काढण्यात धन्यता वाटायची. काही शिक्षणासाठी १० मैल चालत जाऊन तालुक्याच्या शाळेत शिकायचे तर काही गावातल्याच घरातील ऐवजावर डल्ला मारायचे. काहींना आधुनिक तंत्रज्ञानाची ओढ होती तर काही ‘जुन्याच वाटांनी जाऊ’ असं म्हणत आधुनिकतेला मागे ढकलत होते.