Tuesday, November 23, 2010

हंगामा - पान ७

प्रतिक्रिया: 
“गावात ज्ये चाललंय, त्येला भुताटकी म्हनत्यात, हे तुला पटतं का?” तुकाजीने विलासला प्रश्न केला.
“मला नाय वाटत ही भुताटकी हाय. गावातलाच आसन कुनीतरी.” विलासने म्हटलं.
“गावातला? छ्या! नाय नाय...” दादू म्हणाला.
“त्येच म्हन्तो मीबी! गावातल्या मानसापाशी आशी जिगर नाय. ह्ये काम गावाभायीरच्याच कुनाचंतरी हाय.” राघू टेबलावर जोरात हात आपटत म्हणाला.

तेवढ्यात बाहेर कसला तरी जोराचा आवाज झाला म्हणून ते चौघे बाहेर आले. पहातात तो भट्टीवर दारू गाळणारा सदा वाकडा-तिकडा पडला होता. नाकातून रक्ताची धार लागलेली, कपडे फाटलेले, विस्फारलेले डोळे कुणावर तरी रोखलेले, शरीर थरथर कापतंय आणि तोंडाने काहीतरी बडबडत होता. चौघे त्याच्याकडे धावले. आजूबाजूची माणसंही कामं टाकून त्याच्या दिशेने धावली. सदाभोवती माणसांचं कोंडाळं झालं. सदा अजूनही तोंडाने काहीतरी बडबडतच होता. दादूने झटकन पुढे होऊन त्याच्या तोंडाजवळ कान नेला.

“ब्‍.... ब्‍.... ब्‍.... ब्‍....” सदा काय बडबडत होता ते दादूला कळतच नव्हतं. तो वैतागून जमावाला म्हणाला. “अरे, ह्ये ब्येनं लई घाबरल्यालं दिसतंय. याला डागदरकडं नेऊया चला.”

चार जण सदाला उठवायला पुढे झाले आणि अंगात वारा भरल्याप्रमाणे सदा ताडकन उठून बसला. दोन्ही हात डोक्यावर गच्च दाबून तो ओरडला, "भू... भूऽऽत... भ्भूऽऽत..."

सदा काय ओरडला हे लोकांच्या डोक्यात शिरेपर्यंत सदा आपल्या घराच्या दिशेने सैरावैरा पळत सुटला होता. नाही म्हटलं तरी या प्रकाराने सगळेच घाबरले होते. तुकाजीने ओरडून सर्वांना पुन्हा कामाला लागायला सांगितलं पण मनातून कुणाचीच तिकडे थांबायची इच्छा होत नव्हती. प्रत्येकालाच आपल्या घरी जाण्याची ओढ लागली होती.

"तुला सांगतो पतंग्या, ही भुताटकीच हाय." किशा कॅनमधे दारू ओतता ओतता कुजबुजत म्हणाला.
पतंग्याने चमकून किशाकडे पाहिलं. भितीने त्याचे हात थंड पडले होते.
"खरं सांगतोस रं किश्या?" पतंग्यानेही कुजबुजतच विचारलं.
"मंग काय! आरं, या तुकाजीरावाच्या चांडाळ चौकडीचा इस्वास बसत न्हाय पण आत्ता सदाला पायलंस ना! कसा चळाचळा कापत व्हाता तो. आपलीबी हीच गत व्हायची गड्या." किशा धास्तावलेल्या स्वरात म्हणाला.
"गप रं! उगा घाबरवू नगंस. काय नाय होत. चल, कामाला लाग. नायतर नायतर तो तुक्या येईल वरडत पुन्ना." पतंग्याने मनातील भिती घालवण्यासाठी किशाला दम भरला आणि तो जायला वळला. एक क्षण थांबून त्याने पुन्हा किशाला हाक मारली.
"अं... किशा, रातच्याला घरी जाताना माह्यासाठी थांब बरं का! संगतीच जावू."
किशा समजल्यासारखं हसला आणि निघून गेला.