Friday, November 19, 2010

हंगामा - पान ६

प्रतिक्रिया: 
शिरपती सकाळी गुत्त्यावर जाण्यासाठी म्हणून जो बाहेर पडला, तो अजून घरी आला नव्हता. त्याची बायको लक्षुमी त्याला शोधायला बाहेर पडली. शिरपती एका ठिकाणी दोन घरांच्या मधल्या भागात पडून होता. अंगावर ओरबाडल्याच्या खुणा, जागोजागी खरचटलेलं.... असं वाटत होतं की त्याची कुणाशी तरी मारामारी झाली असावी. लक्षुमीने त्याला आधार देऊन उठवलं. शिरपती अजूनही नीट शुद्धीवर आला नव्हताच. शेवटी लक्षुमीने गावातल्याच दोन पोरांच्या जोडीने शिरपतीला घरी नेलं आणि घरगुती उपचार केले. शिरपती शुद्धीवर आल्यावर आपली कुणाशी मारामारी झाली हे त्याला आठवतंच नव्हतं.

जानकोबाच्या बाबतीतही असंच घडलं. मळ्यावरची थोडीफार कामं आटोपून तो गुत्त्यावर जाण्यासाठी निघाला आणि वाटेत त्याला हरी सुतार भेटला. दोघे ग्लासाचे दोस्त, एकत्रच गेले गुत्त्यावर. पण काय झालं कोण जाणे, हरी सुतार करंगळी दाखवून जो बाहेर गेला तो आलाच नाही परत. त्याला पहायला म्हणून जानकोबा बाहेर पडला तर त्याच्या डोक्यात कुणीतरी टणक वस्तू मारली. जानकोबा तिथेच चक्कर येऊन कोसळला. त्याला घरी सोडायला गेलेल्या लोकांनी सांगितलं की हरी सुतारालाही जबरदस्त मार लागला आहे. त्याला कुणीतरी पाय धरून ओढलं आणि तो इतक्या जोरात पडला की उठताच येईना. हळूहळू सगळ्या गावालाच या प्रकाराची दहशत बसली.

दारुच्या रूपाने सटवाईने प्रवेश केलाच होता, आता भुताटकीसुद्धा आली असं जो तो म्हणू लागला. पण या भुताटकीचा अनुभव सर्वांनाच येत होता असं नाही. तगडे बापये, जे कामंधंदा सोडून करकरीत तिन्हीसांजेला तुकाजीच्या गुत्त्यावर जात, त्यांनीच ही भुताटकी अनुभवलेली. तुकाजीला काही अजून या भुताटकीचा अनुभव आला नव्हता. ’गावात बाहेरून कुणी चोर शिरले असावेत, त्यांनीच हे काम चालवलं असावं कारण नशापाणी केलेल्या माणसाला लुबाडणं जास्त सोपं असतं,’ असं त्याला वाटलं. पण एके दिवशी ’भुताटकीने’ तुकाजी आणि धनाजीलाही जन्माची अद्दल घडवली.

दारूचा गुत्ता जरी धनाजीच्या नावावर असला तरी भट्टी चालवत होता तुकाजीच. त्याला साथसंगत करणारे लोक तिथे येऊन जाऊन असत. गावात भुताटकीमुळे निर्माण झालेली दहशत आपल्या धंद्यावर तर परिणाम करणार नाही ना, अशी भिती तुकाजीने त्यांच्याकडे बोलून दाखवली. कारण स्वस्तात दारू मिळते म्हणून आजूबाजूच्या गावातील माणसंही या गावात येऊ लागली होती. धंद्याला बरकत येत असतानाच या भुताटकीमुळे गावाबाहेरून आलेल्या लोकांना त्रास होऊ लागला होता. एक जण धड जाऊ शकत नव्हता.