Monday, November 15, 2010

हंगामा - पान ४

प्रतिक्रिया: 
रखमाने पुढे काही बोलायला तोंड उघडलं, तेवढ्यात धोंडीबा आपला तोल सावरत उठला. इतका वेळ तो एका कोपर्याडत अंथरलेल्या कांबळ्यावर दारूच्या अंमलाखाली निपचीत पडून होता पण बहुधा त्याने सगळं ऐकलं असावं.

“तिच्याXXX त्या मास्तरड्याच्या!” तो दोन्ही हात झटकत बिट्ट्याच्या जवळ गेला आणि त्याचा दंड ओढत म्हणाला, “चल... चल, बगू मला तुजा मास्तर काय म्हन्तो त्ये. चल...”

बापाचा अवतार पाहून बिट्ट्या आधीच रडकुंडीला आला होता. त्यात त्याचा दंड जास्तच जोरात पकडला गेल्याने त्याने तिथेच भोकाड पसरलं. बिट्ट्याला रडताना पाहून रखमा मधे पडली. तिने कसाबसा पोराचा दंड धोंडीबाच्या तावडीतून सोडवून घेतला. पण धोंडीबा ऐकायला तयार नव्हता. त्याने तिलाही ढकललं आणि तो बिट्ट्याचा हात धरून बाहेर पडला. रखमा पुन्हा त्याच्या मागे गेली आणि तिने बिट्ट्याचा हात सोडवून घेतला. आता तिच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. एक तर रोज धोंडीबा दारू पिऊन घरातच पडून रहायचा. घरात दोन वेळच्या खाण्याची मारामार होऊ लागली होती पण धोंडीबाने दारूसाठी घरातील एक-दोन वस्तू विकायलाही मागे पुढे पाहिलं नव्हतं. रखमा बिचारी जे मिळेल ते काम करून घरात चार पैसे आणायची त्यातही धोंडीबा हात मारायचा. अशाने बिट्ट्याच्या शाळेची फी थकेल नाहीतर काय? बिट्ट्याचा हात धोंडीबाच्या हातातून सोडवताना ती जोरात ओरडली.

“कुटं नेता त्येला?! पैकं हाईत... हाईत पैकं? पैशाबिगर मास्तर त्येला घ्येनार बी नाय आन्‍ उगाच तुमाला बी कायतरी बोलंल. तुम्हाला कशाची सुद न्हाई र्‍हायलेली म्हून आमालाबी कशाची लाज न्हाई आसं वाट्टं का काय तुमास्नी?”

हे ऐकल्यावर धोंडीबाचं डोकं आणखीन फिरलं. त्याने बिट्ट्याचा हात सोडून रखमावर हात उगारला. आधीच रखमा रोजरोजच्या कटकटीला कंटाळली होती. तिने ताड्क न धोंडीबाचा हात वरच्यावर पकडला.

“बास झालं! आता मी आन्‍ माजा पोरगा घरात न्हाई थांबनार.” तिने धोंडीबाचा हात हिसडा देऊन सोडला आणि बिट्ट्यासोबत तिने गावाबाहेरचा रास्ता धरला. इकडे धोंडीबा निरर्थक बडबड करत अंगणातच झोपला.

गावाची वेस जसजशी जवळ येत गेली तसतसा रखमाच्या रागाचा पारा खाली येत गेला. मोठ्या निर्धाराने घराबाहेर पड्ली होती ती. पण आता तिच्या मनात विचार येत होते. “जाऊन जानार कुटं? भावाकडं? त्यो किती दिवस सांबाळंल? नंतर?... बिट्ट्याचं काय? आनि... धनी...?”