Thursday, November 11, 2010

हंगामा - पान ३

प्रतिक्रिया: 
दारूच्या रुपात सटवाईनेच गावामधे प्रवेश केला. दारू स्वस्तात मिळते म्हणून ओकेपर्यंत पिऊन पुरूष माणसं घरातच पडून राहू लागली. कामावर कुणी जाईना आणि त्यांच्या बायकांच्या डोळ्याचं पाणी काही खळेना! घरातला खर्च भागवायला पैसा नाही म्हणून कर्ज मागायचं तरी कुणाकडं आणि ते फेडायचं कसं? याच विवंचनेत गावच्या बायका राहू लागल्या. एके दिवशी रखमाने निर्धार केला. दहा बायकांना गोळा केलं आणि गेली सरपंचाच्या घरावर मोर्चा घेऊन.

"सरपंच, तुमच्या भावाला हे दारू भट्टीचं काम बंद करायला लावा. आमचं धनी असं घरात पडून राहू लागलं, तर आमी खायचं काय वो?" रखमाने धीटपणे प्रश्न केला.

"आरं तिच्या! कोन सांगतंय तुझ्या धन्याला घरी पडून र्‍हा म्हून आं? त्येचा तो येतो, पितो आन् घरला निगून जातो." तुकाजीने पुढे होऊन उत्तर दिलं.

"ए, तुज्यासंग बोलत नाय मी. आमच्या सरपंचासंग बोलतेय." तुक्याला समोर पाहून रखमाचं टाळकंच फिरलं.

"रखमा, लई वरडा वरडी करू नगंस." धनाजीराव गुरकावला. "तुझ्या धन्याला हितं कुनी जबरीनं आनत न्हाई. त्येचं चांगलं वाईट त्याला कळत न्हाई व्हयं? आनि येवडीच आडचन आसंल तुला पैशाची, तर आमी हाओत की!" धनाजीरावाने तिच्याकडे वरून खाली पहात म्हटलं.

रखमा काय ते समजून गेली. धनाजीरावाच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही हे तिला लक्षात आलं. तिच्या बरोबरीच्या बायकांनाही धनाजीरावाच्या असल्या बोलण्यापुढे काय बोलावं हे सुचेना. त्या मागे फिरल्या पण दारूभट्टी बंद कशी करावी याचा मात्र त्या विचार करतच होत्या. या गोष्टीला दोनच दिवस झाले आणि एक घटना घडली.

***********

रखमा तिची नेहमीची घरातली कामं घाईघाईत आटोपत होती. तिचा नवरा धोंडीबा दारू पिऊन घरातच पडून होता, तेव्हापासून घरासोबतच बाहेरची काही कामं करण्यासाठीही तिलाच धावपळ करावी लागायची. सहज तिचं लक्ष दरवाजाकडे गेलं तर दरवाजाला टेकून तिचा आठ वर्षांचा मुलगा खाली मान घालून उभा होता.

मळकट हाफ चड्डी, शर्टाचं वरचं बटण तुटल्यामुळे शर्ट एका खांद्यावरून खाली ओघळलेला, केस भुरभुरलेले आणि डोळ्य़ातलं पाणी पुसत बिट्ट्या दरवाजा टेकून मुसमुसत होता.

“काय रं बिट्ट्या? साळंतून पळून आलास व्हय रं?” रखमाने पोराला अवेळी घरात आलेलं पाहून विचारलं.

बिट्ट्याने नुसतीच नकारार्थी मान हलवली आणि बोलायला सुरूवात केली. “मास्तर म्हनत्यात, तीन महिनं झालं, साळंची फी दिल्याली न्हाई. आता पैकं दिल्याबिगर साळंत घेनार न्हाई, म्हनले मास्तर.”