Saturday, October 2, 2010

नर्सरी र्‍हाईम्समागचं (दु:खद) सत्य!

प्रतिक्रिया: 
मी जेव्हा नर्सरी टीचरचा कोर्स केला तेव्हा नर्सरी र्‍हाईम्स अर्थात इंग्रजी बडबडगीते / बालगीते शिकणं अनिवार्यच होतं. मी लहान असताना जी इंग्रजी बालगीतं गायली होती, तीच आता आपण लहान मुलांसोबत गायचीत, त्यांना शिकवायचीत हा विचारच खूप मजेशीर होता. पण जसंजसं एक एक पारंपारिक नर्सरी र्‍हाईम माझ्या नजरेखालून जाऊ लागलं, तसंतसं माझ्या लक्षात आलं की या गीतांमधे कुठेही एखाद्या आनंदी किंवा प्रेरणात्मक घटनेचा उल्लेख नाहीये. उलट, बरीचशी नर्सरी र्‍हाईम्स एखाद्या दु:खद ऐतिहासिक घटनेवर आधारितच आढळली.

उदाहरणार्थ, हम्प्टी डम्प्टी हे नर्सरी र्‍हाईम पहा ना!

हम्प्टी डम्प्टी सॅट ऑन अ वॉल,
हम्प्टी डम्प्टी हॅड अ ग्रेट फॉल;
ऑल द किंग्स हॉर्सेस अॅरन्ड ऑल द किंग्स मेन,
कुडन्ट पुट हम्प्टी डम्प्टी टुगेदर अगेन

मला वाटलं होतं किंवा मला लहानपणापासून असंच चित्र दाखवलं गेलं होतं, की ही एक अंड्यावरची मजेशीर कविता आहे. हम्प्टी डम्प्टी नावाचं अंडं एकदा भिंतीवर बसतं पण ते खाली पडतं आणि अंडं खाली पडल्यावर काय होणार? ते फुटतं! आणि फुटलेल्या अंड्याला पुन्हा कुणीही जोडू शकत नाही किंवा पहिल्यासारखं करू शकत नाही. हा छान संदेश आहे. या गाण्यातून लहान मुलांना शब्दोच्चारांचं ज्ञान तर मिळतंच शिवाय रोजच्या आयुष्यातील एक वस्तुस्थिती माहित होते की अंडं जर हातातून खाली पडलं तर ते फुटेल आणि फुकट जाईल. हाच संदेश देण्यासाठी हम्प्टी डम्प्टी र्‍हाईम बनवलं गेलं आहे, हा माझा समज कायम राहिला असता पण मी सहज म्हणून इंटरनेटवर आणखी काही पारंपारिक नर्सरी र्‍हाईम्स मिळतात का यासाठी सर्फिंग करत होते आणि मला लक्षात आलं की बरीचशी पारंपारीक नर्सरी र्‍हाईम्स ही दु:खद ऐतिहासिक घटनेचा आधार घेऊन त्या काळात गाणी म्हणून तयार केली गेली आणि नंतर ती नर्सरी र्‍हाईम्स म्हणून लोकप्रिय झाली.

या सर्फिंगमधेच मला हम्प्टी डम्प्टीच्या पार्श्वभूमीचा शोध लागला:
हम्टी डम्प्टी ही एक अवाढव्य तोफ होती, जी १६४८ साली अमेरिकन नागरिकांनी लढल्या गेलेल्या युद्धात वापरली गेली होती. एका चर्चच्या भिंतीवर विराजमान केलेली ही तोफ आपल्या अवाढव्यपणामुळे तिथे फार काळ टिकू शकली नाही. ती खाली पडली आणि तिचे तुकडे झाले, त्यामुळे ती पुन्हा कधीही न वापरण्याच्या लायकीची झाली.

ही एकच कथा; हम्प्टी डम्प्टी बद्दलच्या इतरही दंतकथा आहेत. यातील खरी कुठली आणि खोटी कुठली, हे ठरवणं कठीण. पण हम्प्टी डम्प्टी ही अंड्यावरची कविता आहे असं जरी गृहीत धरलं तरी शेवटी अंडं फुटतं हे दु:खद सत्य आहेच या कवितेत.

अशीच काहीशी कथा आहे, लंडन ब्रिज इज फॉलींग डाऊन, लिटल मिस मफेट, जॅक अ‍ॅन्ड जिल यासारख्या पारंपारिक नर्सरी र्‍हाईम्सची. मी इथे दोन व्हिडीओ पोस्ट करतेय. त्यात बर्‍याचशा नर्सरी र्‍हाईम्समागचं दु:खद ऐतिहासिक सत्य स्पष्ट करून सांगितलं आहे.
तशा सर्व मराठी नर्सरी र्‍हाईम्ससुद्धा काही सुखांत सांगणार्‍या नसतात:

चांदोबा चांदोबा भागलास का, लिम्बोणीच्या झाडामागे लपलास का
लिम्बोणीच झाड़ करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी
मामाच्या वाड्यात येउन जा, तूप रोटी खाउन जा
तुपात पडली माशी, चांदोबा राहिला उपाशी