Wednesday, September 15, 2010

तकिया कलाम

प्रतिक्रिया: 
मस्त नाव आहे ना? बोलताना मधेच एखादा शब्द ’आपला’ म्हणून पेरायचा, त्याला तकिया कलाम म्हणतात. तकिया कलाम हे विशेषण खरं आलंय ते उर्दू भाषेतून. अशा प्रकारे एखादा शब्द वारंवार वापरण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे. खरंतर या गोष्टीला पद्धत म्हणणंच चूक आहे कारण बहुतांश आपल्या सर्वांना तकिया कलाम वापरायची सवय असली, तरी कुणी जाणूनबुजून याची पेरणी करत नाही. अगदी सहजपणे घडतं ते.

काही लोकं पहा, बोलता बोलता ’आय मिन’ असं मधेच म्हणतात आणि मग पुढे बोलायला लागतात किंवा ’अॅयक्च्युअली’ हा शब्द वापरतात. कधी कधी तर एखादा अर्थपूर्ण शब्दसुद्धा तकिया कलाम म्हणून प्रत्येक वाक्यासोबत वापरल्याने निरर्थक वाटतो. उदा. बेसिकली. जाऊ दे चल किंवा एनी वे.या शब्दांमुळे वाक्याचा अर्थ बदलतो किंवा वाक्यात काही मोठी भर पडते असं नाही पण बोलता बोलता पुढे तो शब्द जोडला की बोलण्यासाठी थोडी श्वास घ्यायला मोकळीक मिळते आणि तरीही पुढचं बोलताना सुसंगत पणा जाणवतो. अर्थात, ही आपली भावना झाली. तेच वाक्य किंवा तसंच वक्त्यव्य करताना समोरची व्यक्ती कदाचित दुसरा तकीया कलाम वापरू शकते किंवा कदाचित वापरणारही नाही.

तकिया कलाम जवळपास प्रत्येकाच्याच संवादाचं अविभाज्य अंग बनला आहे. इच्छा असो वा नसो, तोंडात एखादा शब्द असा काही बसून राहीलेला असतो ना की सहज कधीतरी तो बाहेर पडतोच. थोडक्यात सांगायचं तर फेवरिट कोट्स. तकिया कलाम म्हणून वापरलेले शब्द हे व्यावहारिक शब्दच असतात असं नाही बरं का! देवाचं नाव घेणं हाही काही जणांचा तकिया कलाम असू शकतो. पण तकीया कलाम हे मुळात आपल्या संवादाला बळकटी आणण्यासाठीच वापरले जातात. आपण जे काही बोलू ते समोरचा ऐकेलच याची शाश्वती नसली की बहुधा हे तकिया कलाम सहजगत्या पेरले जातात. आता तकिया कलाम ला आपला प्लस पॉईंट म्हणायचं की मायनस पॉईंट हा ज्याचा त्याचा प्रश्न पण या शब्दांच्या उश्या जर वापरल्या नाहीत तर आपलं बोलणंच पूर्ण होत नाही. मग, तुमच्याकडे आहेत की नाही असे काही तकिया कलाम?