Friday, September 3, 2010

साचा

प्रतिक्रिया: 
तुम्ही सकाळी नेहेमीप्रमाणे उठता. नेहेमीप्रमाणे तयारी करून ऑफीसला जाण्यासाठी बाहेर पडता. रोजचे ओळखीचे चेहेरे दिसतात. काही अनोळखी चेहेरही दिसतात. त्यातलाच एक अनोळखी चेहेरा तुम्हाला टक लावून पहात रहातो. त्या चेहे-यावर कोणतेही भाव नाहीत. पण तुम्हाला थोडं अवघडल्यासारखं वाटतं खरं. तुम्ही पुढे निघून जाईपर्यंत तो अनोळखी चेहेरा तुमच्या नजरेला नजर देतच रहातो. तुम्हाला या नजरभेटीचं कारण उमगत नाही. "असेल कुणीतरी वेडा," असं मनाशी म्हणून तुम्ही पुढे जाता.

बसस्टॉपवर तुम्ही काही काळ रेंगाळल्यावर असाच एक अनोळखी चेहेरा तुमच्या समोरून निघून जातो. बघण्याची पद्धत तशीच. चेहे-यावर कोणतेही भाव नाहीत पण नजर तुमच्या नजरेत ठाम मिसळलेली. आता मात्र तुम्ही दोन सेकंद विचारात पडता. "कदाचित आज मी जरा जास्तच अ‍ॅट्रॅक्टीव्ह दिसत असेन" - तुम्ही स्वत:चीच समजूत काढता आणि समोर आलेल्या बसमधे चढता. तिकीटाचे पैसे देता देता तुम्ही तो प्रसंग विसरूनही गेलेला असता.

बसमधून उतरल्यावर तुम्ही ऑफीसच्या दिशेने चालू लागता. आता पुन्हा तुम्हाला तसाच अनुभव येतो. रस्त्यातून जाणारे येणारे बहुतांश अनोळखी चेहेरे तुमच्या चेहे-याकडे टक लावून पहात असतात. इथे तुम्ही खरे विचारात पडायला लागता. रस्ता संपतो, ऑफिसची बिल्डींग येते. तुम्ही लिफ्टमधे शिरता. लिफ्टमधेही तोच प्रकार. जेमतेम आठ माणसं मावतील इतकी ती ऑफीसची लिफ्ट पण त्यातही चार जण तुमच्या चेहे-याकडे टक लावून पहात असतात. आता तुम्हाला थोडी थोडी भितीसुद्धा वाटतेय पण तुम्ही तसं चेहे-यावर न दाखवता पटकन ऑफिसमधे शिरता.

दारातून आत शिरल्या शिरल्या ऑफीसचा प्यून मांजर आडवं गेल्यासारखा आडवा येतो. तोही तुमच्या चेहे-याकडे टक लावून पहात रहातो. आता मनातली भिती झटकून टाकण्यासाठी तुम्ही प्यूनच्या अंगावर खेकसता, "काय आहे?? तोंड काय बघत रहातो.... कामं करायला नकोत यांना..." प्यून काही न बोलता निघून जातो पण तुमच्या मनातील उत्सुकतायुक्त भिती अजून गेलेली नाही. तुम्ही तुमच्या क्युबिकलमधे शिरण्याआधी सर्वप्रथम ऑफीसच्या बाथरूममधे घुसता आणि आरशासमोर उभे रहाता.

तुम्हाला आश्चर्याचा धक्का.... बसत नाही पण तरिही तुम्हाला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत रहातं की, "माझ्या तोंडावर तर काहीच लागलेलं नाही. मी रोजच्याप्रमाणेच दिसत आहे. मग आजच इतकी लोकं माझ्याकडे टक लावून का पहात होती?" तुम्हाला उत्तर मिळत नाही. तुम्ही पुन्हा स्वत:ला आरशात निरखून पहाता, स्वत:शीच हसता आणि बाहेर येऊन तुमच्या कामाला सुरूवात करता.

वर सांगितलेल्या घटनांमधे एक साचेबद्ध जगणारा ’तुम्ही’ आहे. रोज घडणारी गोष्ट, एकदा घडते तेव्हा गंमतीशीर घटना वाटते, दुस-यांदा घडते तेव्हा योगायोग वाटतो पण जेव्हा वारंवार घडत रहाते तेव्हा.... त्या ’तुम्ही’चा साचाच मोडून जातो. आपलंच काहीतरी चुकलंय असं त्याला वाटू लागतं.

आपल्या आयुष्याचाही आपण एक साचा बनवून घेतलेला असतो. आपल्या व आपल्या कुटुंबाच्या अडी-अडचणी, प्रश्न, शंका, उत्तरं ही सगळी त्या ठराविक साच्यातूनच आलेली असावीत अशी आपली अपेक्षा असते. या साच्याबाहेर एखादी गोष्ट, मग ती कितीही क्षुल्लक का असेना, घडली की आपण बावरून जातो. साचा आपल्याला मोडायचा नसतो. मग शक्य नसतानाही आपण आपल्या व आपल्या कुटुंबाच्या याच अडी-अडचणी, प्रश्न, शंका, उत्तरं त्या साच्यात मावतील अशी बसवतो. भले कितीही तडजोड करावी लागली तरी चालेल पण साचेबद्ध आयुष्यच जगायचं असं आपण ठरवून ठेवलेलं असतं.

पण कधी विचार केला आहे का, नेहमीच्या साच्यामुळे आपण त्या साच्याबाहेर घडू शकणा-या कितीतरी मौल्यवान आणि महत्त्वाच्या संधी गमावून बसतो. कधी कधी साच्याबाहेर पाहिलं तर आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून जाताना दिसतं.