Monday, September 20, 2010

मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१० - काही सुधारणा व बदल

प्रतिक्रिया: 
नमस्कार,

’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०’ ला साहित्यरूपी प्रतिसाद मिळण्यास सुरूवात झाली आहे. त्याचबरोबर काही वाचक व ब्लॉगर मित्रांनी व्यक्तीश: ईमेल्स करून हा अंक दर्जेदार व्हावा यासाठी महत्त्वाच्य सूचना व मौलिक सल्ले दिले आहेत. त्या सर्व वाचक व ब्लॉगर मित्रांची मी अत्यंत आभारी आहे.

सूचना व सल्ल्यांमधे ’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०’ साठी जी नियमावली व अटी तयार करण्यात आल्या आहेत, त्यात साहित्य पाठविण्याच्या शब्दमर्यादेमधे शिथिलता आणावी ही प्रमुख मागणी आहे. तसेच, काही बाबींची जाहीर माहिती व बदल करण्यात यावे असेही सुचविण्यात आले आहे. या सूचना व सल्ल्यांवर संपादन सहाय्य समितीसोबत विचारविनीमय करून ’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०’ साठीच्या नियमावली व अटींमधे बदल करण्यात आले आहेत.

’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०’ साठी साहित्य पाठविताना शब्दमर्यादेचे जे बंधन होते, ते पूर्णत: काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय नियम व अटी अद्ययावत करण्यात आल्या आहेत. त्या वाचण्यासाठी येथेयेथे क्लिक करा. यापूर्वी मोगरा फुलला दीपावली अंक २०१० ची जी घोषणा करण्यात आली होती, त्यात नियम व अटींची लिंक दिलेली आहे, ती लिंकदेखील सुधारित नियमावली व अटींनुसार अद्ययावत (अपडेट) करण्यात आली आहे.

साहित्य पाठविण्याची मुदत वाढवून दि. २० ऑक्टोबर २०१० अशी करण्यात आली आहे. तरीदेखील अंकात सहभाग देऊ इच्छिणार्‍यांनी पूर्वी घोषित केलेल्या मुदतीमधे (११ ऑक्टोबर २०१० पर्यंत) साहित्य पाठविल्यास अधिक चांगले. साहित्य पाठविताना mogaraafulalaa@gmail.com या ईमेल आय.डी. वरच पाठवावे.

आणखी एक नम्र विनंती - साहित्य पाठविण्यासाठी कृपया केवळ मंगल फॉन्ट (देवनागरी - बराहा, गमभन, क्विलपॅड तत्सम) चा वापर करावा. आकृती, शिवाजी तत्सम फॉन्टमधील लेखन ब्लॉगवर दृश्यमान होत नाही. त्यामुळे असे साहित्य पुन्हा मंगल फॉन्टमधे टंकलिखित करून मग ते ब्लॉगवर प्रकाशित करणे यात वेळ आणि शक्ती या दोन्हीचा अपव्यय होतो. अशा प्रकारचं साहित्य आतापर्यंत चार वेळा नाकारावं लागलं आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

साहित्य पाठविताना ईमेलमधे सुरूवातीलाच खालील जाहीरनामा जोडणे अनिवार्य आहे. या जाहीरनाम्यामुळे आपण जे साहित्य पाठविता आहात, ते ’मोगरा फुलला दीपावली अंक २०१०’ मधे प्रकाशित करण्यासाठी आम्हाला अनुमती देत आहात, हे स्पष्ट होईल.


जाहीरनामा

मी, ____________________________________________________
असे घोषित करतो/करते की, ’मोगरा फुलला दीपावली अंक २०१०’ साठी पाठवलेले साहित्य पाठविण्यासंबंधीचे सर्व नियम व अटी मी वाचले आहेत आणि ते मला मान्य आहेत. या ईमेलद्वारे ’मोगरा फुलला दीपावली अंक २०१०’ या अंकासाठी पाठविलेले खालील साहित्य (विनोद, कोडी आणि उखाणे याव्यतिरिक्त) मी स्वत: निर्मिलेले आहे आणि 'मोगरा फुलला दीपावली अंक २०१०’ या अंकात प्रसिद्ध करण्यासाठी मी ते पाठवित आहे. या अंकात ते प्रसिद्ध करायला माझी अनुमती आहे.


_________________________________
(नाव)


हा जाहीरनामा कॉपी करून घेण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे.

तेव्हा आपलेही साहित्य येऊ द्या.

धन्यवाद.

आपली स्नेहांकित,
कांचन कराई
संपादक
मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०