Wednesday, September 15, 2010

दबंग - जुगारात लागलेला जॅकपॉट

प्रतिक्रिया: 
सलमान खानचा वॉन्टेड किंवा विरगती ज्यांनी पाहिला आहे, त्यांना या चित्रपटात सलमानने काही वेगळं केलंय असं वाटणार नाही. पण त्रिमितीत न बसणारे फाईट सीन किंवा न कळत चेहेर्‍यावर हसू आणणारे संवाद यांच्यामधे सलमानची लिमिटेड अ‍ॅक्टींग सुद्धा सुसह्य होते. त्याचं दुडक्या उड्या मारणं, जमिनीवरून कमीत कमी पाय उचलत नाचणं, मुन्नीचं आयटम नाचगाणं आणि जोडीला सोनाक्षी सिन्हा सारखी चक्क अभिनेत्रीचं बनण्याचं पोटेन्शियल ठासून भरलेली नायिका यांच्यामुळे दबंग बघणीय झाला आहे.

चित्रपटात घडणारे प्रसंग केवळ बिहारसारख्याच ठिकाणी घडू शकतात असे आहेत. चित्रपटाची कथाही अत्यंत सुमार आहे. या एकाच कथेत अनेक फाटेदेखील आहेत. कथेला फुटलेला प्रत्येक फाटा आपापल्या दिशेने जातो आणि एका विविक्षित वळणावर पुन्हा मुख्य कथानकाला येऊन मिळतो. मात्र चित्रपटात एका फाट्याची दुस-यासोबत कुठेही गुंतागुंत केलेली नाही, या स्टाईलमधेच दबंगचं यश दडलेलं असावं.

चुलबूल पांडे हा एक रॉबिनहूड स्टाईलचा पोलिस अधिकारी आहे. ज्याच्या कारवायांमुळे खलनायक छेदीसिंगला वारंवार अडचणी येत रहातात. पांडेचा काटा काढण्यासाठी छेदी निरनिराळ्या शक्कल लढवतो पण त्याला यश लाभत नाही. सरतेशेवटी तो पांडेला मारून टाकण्यासाठी जी क्लृप्ती लढवतो ती त्याच्याच अंगाशी येते. इतकाच कथानकाचा जीव आहे. पण त्याला उपकथानकांचा खुराक देऊन दबंगची पटकथा तयार झाली आहे.

सलमान खानला अभिनय करता येतंही असेल, तरी त्याने तो या चित्रपटात न करण्याचा शहाणपणा केला आहे. फॉर्मल कपड्यांवर रेबॅनचा गॉगल लावलेला मिशिवाला सलमान रूबाबदार दिसतो. चित्रपटात शेवटी शर्टलेस सलमान आहेच. सोनू सूदचा चेहेरा खलनायकाचा नाही, मात्र त्याच्या अभिनयातून त्याने खलनायक छेदीसिंग चांगल्या रितीने उभा केला आहे. सोनाक्षी सिन्हाला चक्क अभिनय करता येतो. ही मुलगी पुढे मागे डोळ्यांत निरनिराळ्या रंगाच्या लेन्स घालून अभिनय करेलही पण तिने कमीत कमी संवादात आपल्याला अभिनय करता येतो, हे दाखवून दिलं आहे. मुख्य म्हणजे ती नवखी वाटत नाही. चित्रपटात तिचा वावर अत्यंत सुखद आहे. तरूणांच्या भाषेत सांगायचं तर ती बायको मटेरियल दिसते. विनोद खन्नाचा बाप म्हणजे वॉन्टेड मधून उचलून इथे चिकटवल्यासारखा वाटतो. डिंपल कपाडीया अजूनही तरूण दिसते, तिच्या वाट्याला आलेला रोल तिने चोख केला आहे. अरबाज खान, अनुपम खेर इ.चा अभिनयही ठिकठाक. चित्रपटातील गाणीही सुंदर आहेत.

चित्रपट पहाताना डोकं बाजूला ठेवायचं, हे ट्रेलर पाहूनच समजतं. त्यामुळे मनाची तशी तयारी करून गेल्यानंतर चित्रपट आवडण्यासाठी जे जे मटेरियल लागतं ते सर्व चित्रपटात सापडतं. दबंग म्हणजे निडर आणि दबंग सारखा चित्रपट बनवून निर्माता दिग्दर्शकाने खरंच खूप मोठं धाडस केलं आहे असं म्हणावं लागेल. ज्या प्रकारे चित्रपटाला प्रतिसाद मिळतो आहे, ते पाहून या जुगारात त्यांना जॅकपॉट लागला आहे असं म्हणायला हरकत नाही.सौजन्य: एरॉस एन्टरटेनमेन्ट