Sunday, September 5, 2010

ब्लॉगिंग आणि कॉपीराईट संरक्षण

प्रतिक्रिया: 
काल शनिवार दि. ४ सप्टेंबर २०१० रोजी सकाळ माध्यम समुहाने खास ब्लॉगर्ससाठी आयोजित केलेली व्हिडीओ कॉन्फरन्स ही ब्लॉगिंग विश्वासाठी एक महत्त्वाची घटना म्हणावी लागेल. मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, जळगाव आणि बेलापूर या ठिकाणांहून उत्सुक ब्लॉगर्सनी गर्दी केली होती. ब्लॉगर्सना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईच्या सायबर गुन्हा शाखेतर्फे सहायक पोलिस आयुक्त संजय जाधव तर पुण्याहून कॉपीराइट क्षेत्रातील ऍड. सारंग खाडिलकर, बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) क्षेत्रातील ऍड. मंगेश काळे उपस्थित होते. ब्लॉगर्सकडून विचारलेला कुठलाही प्रश्न अनुत्तरीत न ठेवता या तीनही तज्ञांनी अगदी सविस्तर उत्तरे दिली.

इंटरनेट हे माध्यम आता समाजातील सर्व स्तरातील लोकांना माहित असलं तरी त्याचा कसा उपयोग करून घेतला जावा याबाबत बरीच अनभिज्ञता दिसते. ब्लॉगिंग विश्व अजूनतरी बाल्यावस्थेत आहे. त्यात मराठी ब्लॉगविश्व तर अगदीच लहान. पण या लहानग्या विश्वातसुद्धा साहित्यचो-या होण्याचे प्रकार सुरू झाले. सुरूवातीला दुर्लक्ष केल्यामुळे ती वृत्ती बळावलीदेखील. साहित्यचोर तसं पाहिलं तर दोन प्रकारचे असतात - १. चोरी करण्याचा उद्देश न बाळगता चोरी करणारे २. चोरीच्याच उद्देशाने चोरी करणारे. पहिल्या प्रकारच्या चोरांना ’शहाण्याला शब्दाचा मार’ या म्हणीनुसार समजावून सांगितलं की त्यांनाही आपली चूक लक्षात येते पण दुस-या प्रकारच्या चोरांपासून मात्र सावधच रहावं लागतं. पण वर उल्लेख केलेल्या तज्ञांच्या मते चोरी ही कोणत्याही प्रकारची असो, शेवटी ती चोरीच असते आणि ती होऊ नये म्हणून आधी ब्लॉगर्सनीच खबरदारीची पावले उचलली पाहिजेत. या तज्ञांनी जी माहिती दिली, ती केवळ ब्लॉगर्सच नव्हे तर इंटरनेट वापरणा-या प्रत्येक सामान्य व्यक्तीला उपयोगी पडेल, अशी महत्त्वाची माहिती होती.

एक ब्लॉगर म्हणा किंवा सर्वसामान्य इंटरनेट वापरकर्ता म्हणा, इंटरनेटचा वापर करताना आपण काही सोशल नेटवर्कींग साईटना सामिल होतो पण ती सेवा पुरवणा-या साईटच्या नियम व अटी (Terms and Conditions) वाचलेल्या असतात का? मला अटी मान्य आहेत असं लिहिलेल्या पर्यायासमोरच्या रिकाम्या चौकोनात बरोबरची खूण करून आपण मोकळे होतो आणि मग आपल्या खाजगी माहितीचा त्या साईटकडून गैरवापर झाला तर त्या साईटची बदनामी करतो पण मुळात त्या साईटच्या नियम व अटींमधेच ही अट समाविष्ट केलेली असते की एकदा तुम्ही अमूक माहिती आम्हाला दिलीत की त्या माहितीचा आम्ही तमूक कारणासाठी वापर करू शकतो, हे आपण त्या नियम व अटी न वाचताच मान्य केल्यामुळे कळत नाही. अगदी ब्लॉगिंग सुरू करतानाही आपण ब्लॉगिंगसाठी असलेल्या नियम व अटी न वाचताच पुढे जातो. ही माहिती वाचणं खरं तर खूप कंटाळवाणं असतं पण ते जितकं कंटाळवाणं असतं, त्याहीपेक्षा ते महत्त्वाचं असतं, हे आपण कधी लक्षातच घेत नाही.

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लॉगर्सनी आपलं लेख कॉपीराईट करून घेणं आवश्यक आहे पण ते अनिवार्य नाही. ब्लॉगर्सना आपले लेख सुरक्षित ठेवण्यासाठी काय काय माहित असायला हवं, याची माहिती मी आधीच एका पोस्टमधे दिलेली आहे. ईसकाळ समूहाचे वृत्त सह समन्व्यक श्री. अभिजीत थिटे यांनी ऍड. सारंग खाडिलकर, बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) क्षेत्रातील ऍड. मंगेश काळे यांच्याकडून मिळालेली माहिती मला ईमेल केली होती मी ती जशीच्या तशी साहित्यचोरांनो - सावधान! या शिर्षकाअंतर्गत पोस्ट केली आहे. इच्छुकांनी जरूर वाचावी.

ब्लॉगर्सनी खबरदारी घेण्यासाठी करण्यच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे गुगल अॅलर्टचा वापर करावा. या अॅnलर्टमुळे आपल्या ब्लॉगवरील कोणता भाग कॉपी होऊन कुठे पुन:प्रसिद्ध होतोय हे ईमेलद्वारे कळू शकतं. तसंच आपण वाचकांसाठी ज्या RSS फीड तयार करतो, त्या संपूर्ण न ठेवता शॉर्ट ठेवाव्या व त्यात आपली कॉपीराईटची नोटीस आवर्जून टाकावी. इतर खबरदारीचे उपाय मी ब्लॉगवाले या ब्लॉगवर दिलेले आहेतच. त्यातील कॉपी पेस्ट विरोधक कोडमाऊसचं राईट क्लिक अकार्यक्षम करणा-या कोडच्या वापराला तर तज्ञांनीही अनुमोदन दिलं. ज्याला चोरी करायचीच असते तो करतोच पण हे खबरदारीचे उपाय वापरल्याने चोरी करण्याच्या उद्देशाला आळा नक्कीच बसतो.

ब्लॉगर्सनी भरपूर प्रश्न विचारले. कॉन्फरन्ससाठी नियोजित वेळ दोन तासांची होती म्हणून, नाहीतर ब्लॉगर्सच्या प्रश्नांना अंत नव्हता. सकाळ माध्यम समुहाने ब्लॉगर्ससाठी ही कॉन्फरन्स आयोजित करून समस्त ब्लॉगिंग विश्वाला पाठींबा व मदतीचा हात दिला आहे. त्यांचे आभार मानावे तितके कमीच. तज्ञ मंडळी ऍड. सारंग खाडिलकर, ऍड. मंगेश काळेसहायक पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी आपला अमूल्य वेळ या कॉन्फरन्ससाठी दिलाच पण ब्लॉगर्सच्या कुठल्याही प्रश्नाला त्यांनी न कंटाळता उत्तरं दिली. इतकंच नव्हे तर ब्लॉगर्सकडून आलेल्या काही सूचनांवरही त्यांनी विचार केला व भविष्यात या सूचना गृहीत धरून आणखी काही उपाययोजना करता येईल का, हे पहाण्याचेदेखील आश्वासन दिले.

आज ब्लॉगर्सविश्वात विषयांमधे फारशी विविधता दिसत नसली, तरी भविष्यात मात्र प्रत्येक क्षेत्रातील माहितगार व्यक्तीला ब्लॉगिंगद्वारे आपले ज्ञान जगासोबत वाटून घ्यावेसे वाटेल, इतकी ताकद ब्लॉगिंगमधे नक्कीच आहे. ब्लॉगिंगवर यशस्वीतेचा कळस चढण्याआधी त्याचा पाया मजबूत असणं आवश्यक आहे. सकाळ माध्यम समुहाने आयोजित केलेल्या या व्हीडिओ कॉन्फरन्समुळे ब्लॉगिंगचा पाया मजबूत होण्यास निश्चितच मदत झाली आहे.