Saturday, September 18, 2010

काळी जादू

प्रतिक्रिया: 
नाव ऐकूनच मनात चर्रर्र होतं. रस्त्याच्या कडेला असलेल्या एकुलत्या एका झाडाखाली एक कापलेला कोहळा, त्याच्यावर हळद-कुंकू, अबीर, गुलाल तर मस्ट किंवा चार रस्ते जिथे येऊन मिळतात तिथे एक नारळ फोडून टाकलेला किंवा भाताची पिंडं, त्यावर तेच ऑल टाईम फेवरिट अबीर-गुलाल, काळे तीळ टाकून रस्त्याच्या मधोमध टाकलेलं, गेला बाजार खिळे टोचलेलं नि हळद कुंकवात माखलेलं लिंबू तर कुठेच गेलं नाही. अहो, भल्याभल्यांची हिम्मत होत नाही जवळ जाऊन पहायची आणि जे असल्या गोष्टी मानत नाहीत म्हणून जवळ जाऊन पहातात, त्यांच्याकडे बाकीचे भेदरलेल्या चेहेर्‍याने बघतात. पिंपळाचं झाड, तिठा म्हणजे तीन रस्ते येऊन मिळणारी जागा अशा जागा या काळ्या जादूचं अस्तित्व दाखवणार्‍या हुकमी जागा. कुणी याला करणी म्हणतं, कुणी अघोरी प्रयोग, कुणी आणखी काही पण उद्देश एकच - आपल्या हेतूपूर्तीसाठी अद्वितीय अशा शक्तीचा वापर करणं!

पण खरंच ही जादू अस्तित्त्वात असते का? की रस्त्यात आपल्याला जसं तिचं भयाण रूप दिसतं, तसंच ते ज्याचं वाईट व्हावं असं वाटतं त्यालाही दिसावं आणि त्याच्याही मनात चर्रर्र होऊन आत्मविश्वास डळमळीत व्हावा, इथपर्यंतच या जादूची व्याप्ती असते? मी स्वत: हे असलं काही खरं असतं असं मानत नाही पण किस्से मात्र भरपूर ऐकलेले आहेत. भानामती हा प्रकार काळ्या जादूचीच एक शाखा आहे की आणखी निराळं काही आहे, हे मला माहित नाही पण त्या प्रकाराबद्दल सुद्धा बरंच ऐकून आहे. मी वर काही दिलेली उदाहरणं मवाळ वाटावी असेही काही काळ्या जादूचे नमुने असतात. या अघोरी प्रकारांमुळे उद्देशपूर्ती होते की नाही हे ज्यांना अनुभव येत असेल, त्यांनाच माहित पण दोन गोष्टी मात्र नक्की! एक म्हणजे लोकं सहजासहजी या अघोरी प्रकाराच्या मागे लागत नसावेत आणि दुसरं म्हणजे जे ही गोष्ट व्यवसाय म्हणून करतात, ते भरपूर कमवत असणार.

काल परवाच मी भिती नावाची पोस्ट लिहिली. आयुष्यात असलेली असुरक्षितता, अनिश्चितता यांना माणूस कुठेतरी त्रासून जातो आणि मग भिती वाटू लागते. सगळं घर प्रकाशाने उजळलेलं असताना एखादीच खोली काळ्यामिच्च अंधाराने भरून गेलेली असावी तशी ही भिती मनाच्या एका कोपर्‍यात घर करून बसते. आपले प्रामाणिक प्रयत्न सुरू असतानाही यशाची माळ आपल्या गळ्यात न पडता दुसर्‍याच्या गळ्यात पडली की हा त्रास आणखी वाढतो. परिणामी ईर्ष्या, मत्सर निर्माण होतो. पण कधी कधी आपलं ताट भरलेलं असतानादेखील दुसर्‍याबद्दल उगीचच वाईट भावना मनात गर्दी करू लागतात. या भावनांना कुविचारांचं खतपाणी मिळत गेलं की, "एक वेळ माझं चांगलं झालं नाही तरी चालेल पण त्याचं वाईट झालं पाहिजे," ही आसुरी इच्छा मनात निर्माण होते आणि दुर्दैवाने ही इच्छा सफल झाली, तर त्यातून मिळणार्‍या विकृत आनंदावरच काही माणसं समाधान मानतात आणि काही माणसं केवळ दुसर्‍याचं वाईट करण्यासाठी काळ्या जादूच्या मागे लागून आपल्या आसुरी इच्छेच्या छोट्याशा किड्याला अजगराचं रूप देतात.

मी लहान असताना एकदा एक खिळे टोचलेलं लिंबू घरी आणलं होतं. आई पराकोटीची घाबरली होती. तिने मला ते लिंबू लांब फेकायला लावलं. मग आंघोळ, देवापुढे दिवाबत्ती करणं इ. प्रकार झाले. "खिळे टोचून लिंबू का फेकून देतात? चांगलं सरबत करता आलं असतं..." पुढचं मला बोलता आलं नाही कारण मातोश्रींच्या हाताचं आणि माझ्या गालाचं ताबडतोब स्नेहसंमेलन भरवण्यात आलं होतं. मागाहून मला सर्व सांगण्यात आलं. "असलं काही केल्यामुळे जर आपल्याला हवं ते मिळणार असेल, तर कुठल्याही गोष्टीसाठी कष्ट करायची गरजच काय?" असा प्रश्न मला त्यावेळेला पडला. अर्थात, स्नेहसंमेलनाचा अनुभव ताजा असल्याने मी तो प्रश्न मनातल्या मनातच विरू दिला. पण मला अजूनही या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही.

असं म्हणतात की जो काळ्या जादूचा वापर करून दुसर्‍याला त्रास देऊ पहातो, त्याच्यावरच ही जादू उलटू शकते, म्हणजे सैतानही मदत करण्याआधी देवाचं भय दाखवतो तर! पण मला वाटतं, समजा ही जादू अस्तित्वात असलीच तरी तिला ’काळी जादू’ म्हणण्यापेक्षा नुसतीच जादू म्हटलं तर काय होईल? शेवटी ज्याच्या हातात ही शक्ती आहे, तो तिचा वापर कसा आणि कुठल्या कारणासाठी करतो यावर त्या शक्तीचा चांगला वाईटपणा अवलंबून आहे, असं नाही का वाटत तुम्हाला?