Tuesday, September 14, 2010

भिती

प्रतिक्रिया: 
काय असतं भिती म्हणजे? असुरक्षितता की अनिश्चित्तता? की दोन्ही? म्हणजे बघा ना, भुताचे चित्रपट.... अंहं!... इथे तुम्ही रामगोपाल वर्माने अलिकडेच काढलेल्या वास्तूशास्त्र, फूंक असल्या चित्रपटांचा विचार करत नसाल अशी माझी अपेक्षा आहे...

तर, भुताचे चित्रपट पहाताना आपल्याला खरं तर त्या चित्रपटातील भुतापासून काहीच धोका नसतो. अहो, निव्वळ काल्पनिक गोष्टीवर तयार केलेला तो चित्रपट, ती कथाही काल्पनिक आणि त्यातलं भूतही खोटं. पण तरीसुद्धा भुताचा चित्रपट किंवा भयपट पहाताना आपल्याला भिती ही वाटतेच. पूर्वी काही भूतपटांबद्दल अशाही वंदता होत्या की हा अमूक चित्रपट, चित्रपटगृहात एकट्याने बसून पाहून दाखवला तर अमूक अमूक बक्षीस वगैरे. खरं तर अशा चित्रपटांमधे काय होणार हे आपल्याला माहित नसतं म्हणून अनिश्चिततेतून आलेली भिती मनात दाटलेली असते. तर, आपल्याच शहरात घडलेली कुठलीही वाईट घटना, दहशतवादी कारवाई ऐकली की आपण या शहरात सुरक्षित नाही, या जाणिवेतून मनात जी भावना तयार होते, ती असते असुरक्षिततेतून आलेली भिती.

"डर के आगे जीत है", असं एका जाहिरात म्हटलं आहे पण ते प्रत्येक ठिकाणी निरनिराळ्या प्रकारे खरं ठरतं. समजा, भयपट पहाताना ’हा काल्पनिक चित्रपट आहे’, हे मनावर ठसवलं तर भिती वाटणारच नाही पण मग चित्रपटाची मजा निघून जाईल, खरं की नाही? याचाच अर्थ इथे आपल्याला डर म्हणजे भिती वाटणं आवश्यक आहे, नाहीतर पैसे आणि वेळ फुकट! इथे आपल्याला भिती वाटल्याने जीत होते ती चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि प्रोड्युसरची. आपली खरं तर ती हार असते पण त्या हारमधेही जीत असतेच... चांगला भयपट पहायला मिळाल्याची! याच्या अगदी उलट गत होते ती दहशतवाद या गोष्टीतून वाटणा-या भितीची. जर आपल्याला दहशतवाद्यांची भिती वाटलीच नाही, तर काय फायदा त्यांना अशा संघटना उभारून नि आतंक माजवून? इथे आपल्याला भिती वाटणं हेच त्यांना अपेक्षित आहे आणि त्यांची अपेक्षा पूर्ण झाली की त्यांची जीत होते आणि आपली हार. यात अप्रत्यक्ष पद्धतीनेही आपली हारच असते. पण हीच भिती आपल्याला सुरक्षेचे आणि खबरदारीचे नवीन मार्गही सुचायला कारणीभूत ठरते.

नोकरीमधेही तसंच. आपल्यापेक्षा आपल्या सहकार्‍याचं काम चांगलं झालं की मनात निर्माण होते असूया पण खरी असते ती भितीच. आपण एकटे पडू, आपला टिकाव लागणार नाही या गोष्टीची. मग आणखी जोमात काम सुरू होतं. मित्राने दुसर्‍या स्त्रीची किंवा मैत्रीणीने दुस-या पुरूषाची जास्तच स्तुती केली की मनात निर्माण होते.... भितीच ती... आपण जळफळाट म्हणू... पण जिवलगाला गमावण्याची भितीच ती. मग थोडी भांडणं, लाडीगोडी, शेवट गोड आणि प्रेमाचे बंध आणखी घट्ट होतात.

पण खरं सांगा, आपलं सर्वांचं आयुष्य परफेक्ट असतं का हो? प्रत्येकाला काही ना काही हवं असतं, काही ना काही कमी पडत असतं. ते मिळवण्यासाठी स्पर्धा करावी लागते. त्यातूनच असुरक्षित, अनिश्चित अशी भावना देणा-या आपल्या असमाधानी मनाला भिती वाटायला लागते. नोकरी काय, प्रेमप्रकरण काय किंवा परिक्षेचा रिझल्ट काय... आयुष्याच्या पावलापावलावर ही भिती सावलीसारखी आपल्यासोबत असते. ती असली तर त्रास होतो पण नसली तर ऑल इज वेल असलेलं आपलं आयुष्य आपल्यालाच विचारायला लागेल... काही चुकत तर नाहीये ना! आपलं आयुष्य परफेक्ट कधीच बनत नाही पण परफेक्ट बनविण्यासाठी आपल्याला थोडी तरी भिती हवीच असते आपल्या मनात नाही?