Wednesday, September 29, 2010

अल्पसंतुष्ट वृत्ती

प्रतिक्रिया: 
कॉलेजातून पास-आऊट झाल्यावर वेध लागतात नोकरीचे. मलाही कुठेतरी चांगली नोकरी मिळावी अशी इच्छा होती. पण पहिल्याच प्रयत्नात चांगली नोकरी मिळाली आणि ती आयुष्यभर चालवली असे प्रकार आता दुर्मिळ आहेत. तेच माझंही झालं. मात्र प्रत्येक नोकरीच्या ठिकाणी काही ना काही चांगलं, आयुष्यात पुढे खूप उपयोगी असेल, असं शिकायला मिळालं.

मी एका पंच मॅन्युफॅक्चरींग कंपनीत क्लार्क म्हणून काम केलं, तिकडचा एक अनुभव बरंच काही शिकवून गेला. खरं त्या कंपनीतलं क्लार्कचं काम म्हणजे नावाला क्लार्क, खर्‍या अर्थाने स्टॉक मेन्टेनर असंच म्हणायला पाहिजे. ऑईलमधे बुडवून ठेवलेले निरनिराळ्या प्रकारचे आणि आकाराचे लोखंडाचे पंच, कुणाला किती दिले, किती राहिले, किती नवीन बनवायचे याचा हिशोब ठेवणार्‍याला तुम्ही काय म्हणाल? क्लार्क? पण काही असो, स्ट्रगलिंगच्या काळात नोकरी भले कमी पगाराची असली तरी चालते पण दरमहा पगाराचं मीटर चालू राहिलं पाहिजे बॉस! त्यामुळे ही नोकरी मला चालवावीच लागत होती.

नोकरी करताना प्रत्येकालाच स्वत:ला सिद्ध करून दाखवावंसं वाटत असतं. ज्यांना पहिल्या फटक्यात अशी संधी मिळते, ते सुदैवी. पण प्रत्येक नवीन नोकरी म्हटली की प्रत्येक ठिकाणी शून्यापासून सुरूवात करायची, ऑफीसमधल्या वातावरणाप्रमाणे आपली कार्यपद्धती बदलायची आणि स्वत:ला सिद्ध करायचं हे वाटतं तितकं सोपं नाही. स्वत: बॉसच जर तुम्हाला त्यासाठी आवाहन करत असेल, तर मात्र तुम्ही संधी सोडता कामा नये. या पंच कंपनीचा मालकाने म्हणजे माझ्या बॉसनेही मला एकदा असंच बोलावून घेतलं आणि मला प्रश्न केला.

"आपल्या कंपनीची प्रगती व्हावी, असं तुला वाटत असेल, तर तू काय करशील?"

मी एक साधी स्टॉक मेन्टेनर, सॉरी.... क्लार्क. माझा बॉस मला एम.बी.ए. टाईप प्रश्न का विचारतोय हे कळेना. मी आपली माझी बुद्धी चालवून त्याला बरंच काही सांगितलं. त्यात एक मुद्दा हाही होता की कामगारांचा पगार अत्यंत कमी आहे. तो जर थोडा वाढवला तर कदाचित त्यांना प्रोत्साहन मिळाल्यासारखं वाटेल. माझ्या या प्रस्तावावर बॉसने जे उत्तर दिलं, ते खूपसं चकीत करणारं आणि बरंचसं सत्याच्या जवळपास जाणारं होतं.

"या कामगारांचा पगार जर वाढवला, तर काय होईल माहित आहे? त्यांचे दोन खाडे वाढतील." बॉसने म्हटलं.

"कसं काय?" मी.

"अगं, आत्ता यांचा पगार आहे बाराशे. महिन्याच्या चार सुट्यांव्यतिरिक्त हे लोक खाडा करताना दहा वेळा विचार करतात. कारण एक खाडा म्हणजे एक दिवसाची पगार कपात! हीच लोक उद्या त्यांचा पगार बाराशे वरून चौदाशे झाला की दोन खाडे करायला मागे पुढे पहाणार नाहीत. प्रत्येक महिन्यात यांचा कोणी ना कोणी नातेवाईक आजारी पडेल, हॉस्पिटलला जाईल किंवा आणखी काहीही कारणं देऊ लागतील हे लोक खाडा करण्यासाठी."

"असं का वाटतं तुम्हाला, सर?"

"कारण त्यांच्या दृष्टीने जर त्यांनी दोन खाडे केले तर पगार कापला जाण्यामुळे जो त्यांना तोटा होणार होता, तो तोटा वाढीव पगारामुळे आपोआपच भरून निघतोय. सोप्या शब्दात सांगायचं तर, ’दोन खाडे केले तरी आधी मिळणारा बाराशे रूपये पगार तर मिळणारच आहे ना! मग काय फरक पडतो दोन खाडे केले तर?’ ही वृत्ती त्यांच्या मनात बळावेल."

बॉस इतकं म्हणाल्यावर मीही दोन मिनीटं विचार केला. मला ते उत्तर पटलं. पण काही प्रश्न अजुन अनुत्तरीत होते.

"मग तुम्हाला काय म्हणायचंय सर, कंपनीची प्रगती व्हावी यासाठी या कामगारांची पगारवाढ करू नये की कामगारांची पगारवाढ करूच नये." मी विचारलं.

"नाही तसं नाही. बघ, ज्याला स्वत:ची प्रगती करायची असते, तो ही अल्पसंतुष्ट वृत्ती सोडून काम करतोच. पगार वाढला तरी आणि जो आहे तोच ठेवला तरी. कदाचित पगारवाढ झाल्यावर काही कामगार दुप्प्ट उत्साहाने काम करतील, पण सर्वच नाही. आत्ता सर्व एकाच रांगेत आहेत. जो स्वत:च्या कामातलं नैपुण्य़ दाखवून स्वत:ला सिद्ध करेल, त्याची पगारवाढ करायला काहीच हरकत नाही."

मी या उत्तरानंतर बॉसशी जास्त काही बोलू शकत नव्हते कारण तो माझा प्रांत नाही. पण मला बॉसने जे सांगितलं त्याचा पुढे बर्‍याच ठिकाणी प्रत्यय आला. पगार वाढला म्हणजे आपण एक दिवस जास्त आराम करू शकतो पण हाच विचार जर वेगळ्या पद्धतीने केला तर? की पगार आहे तितकाच आहे आणि वाढीव पगार सरळ बचतीमधे टाकला तर? मला माहित आहे आपल्याकडे बरेच जण म्हणतील की महिना दोनशे रूपडे वाचवून काय घडणार आहे? पण हेच दोनशे रूपडे आपल्याला नसते मिळाले तर?