Sunday, August 22, 2010

साहित्यचोरांनो सावधान!

प्रतिक्रिया: 
बोक्या सातबंडेच्या प्रकरणानंतर जर अजूनही काही साहित्यचोरांना असं वाटत असेल की अशा प्रकारे त्यांचं नाव इंटरनेटवर जाहिर केल्याने त्यांना काही फरक पडत नाही. नवी ओळख तयार करून त्यांना आपले जुनेच उद्योग सुरू ठेवता येतील, तर त्यांनी वेळीच सावध झालेलं बरं. निरनिराळ्या ब्लॉग्स व साईट्सवरून माहितीपूर्ण लेखांची चोरी करायची आणि स्वत:चा असा आगळावेगळा ब्लॉग किंवा साईट तयार करण्याचं त्यांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. उलट तुरूंगाची हवा खावी लागेल.

साहित्यचोरीची पुराव्यांसकट संपूर्ण बातमी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केल्यानंतर मला ईसकाळचे वृत्त सह समन्वयक (News Co-ordinator) श्री. अभिजीत थिटे यांनी संपर्क केला. अभिजीत थिटे हे स्वत: एफ फाईव्ह डॉट इन नावाची वेबसाईट चालवतात. त्यांच्या स्वलिखित ’तो बाप असतो’ या कवितेची अनेकवेळा चोरी झाली. मूळ चोराचे नावही कळेना त्यामुळे त्यांना खूप मन:स्ताप झाला. माझ्या ब्लॉगवरील साहित्यचोर - बोक्या सातबंडे हा लेख वाचल्यावर त्यांनाही या प्रकरणात लक्ष घालावंसं वाटलं आणि त्यांनी इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आणि कॉपीराईट संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात काम करणा-या अॅंड. सारंग खाडिलकर यांच्याकडून ब्लॉगर्ससाठी कॉपीराईट संदर्भात अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त माहिती मिळवली. अॅीड. खाडिलकर हे कॉपीराईट तज्ज्ञ आहेत. त्यांच्याकडून मिळालेली सर्व माहिती श्री. थिटे यांनी मला ईमेल करून पाठवली, ती मी इथे सर्व ब्लॉगर्ससाठी जशीच्या तशी देत आहे. साहित्यचोरांनीदेखील यावरून आपली नजर फिरवून योग्य तो बोध घ्यावा:

१. आपण निर्माण केलेल्या कुठल्याही गोष्टीवर आपलाच हक्क असतो. आपण तो जोपर्यंत कोणाला देत नाही, तोपर्यंत त्यावर कोणीही अधिकार सांगू शकत नाही.

२. लेखन किंवा मांडलेली कल्पना ही त्या लेखकाची निर्मिती असते. त्यामुळे त्याचा न सांगता वापर केल्यास तो गुन्हाच ठरतो.

३. ब्लॉग किंवा साइटवर लिहिल्या गेलेल्या गोष्टीही लेखकाच्याच मालकीच्या असतात. त्यानं त्यासाठी त्याची बुद्धी खर्च केलेली असते. त्यामुळे ब्लॉग किंवा साइटवरचं लेखन लेखकाची परवानगी न घेता वापरणं हाही गुन्हाच.

४. तुमच्या ब्लॉगवरचं लेखन तुम्हाला क्रेडिट न देता किंवा तुमची लिंक न देता वापरलं जात असेल, तर वापरणारा दोषी ठरतो.

५. तुमच्या ब्लॉगवरचं लेखन तुम्हाला क्रेडिट देऊन आणि तुमची लिंक देऊन वापरलं असलं आणि त्यासाठी तुमची पूर्वपरवानगी नसली, तरीही वापरणारा दोषी ठरतो.

६. तुमच्या ब्लॉगवरचं लेखन दुसऱ्याला वापरायचं असेल, तर तुमची पूर्वपरवानगी घ्यायलाच हवी.

७. अशी चोरी झाल्याचं उघडकीला आल्यास आपण जवळच्या पोलीस चौकीत तक्रार नोंदवू शकतो. ज्याच्या विरुद्ध कॉपीराइटच्या भंगाची तक्रार नोंदविण्यात आली आहे, अशा व्यक्तिला तत्काळ अटक करण्याचे आणि त्याचा संगणक जप्त करण्याचे अधिकार पोलिसांकडे आहेत.

८. त्या व्यक्तीने ऑफिसमध्ये बसून हे कृत्य केले असेल, तर त्याचा कार्यालयीन प्रमुखही सहआरोपी म्हणून गणला जातो.

९. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ती मूळ कल्पना किंवा मूळ लेखन तक्रारदाराचे नसून माझे आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारीही आरोपीवरच असते.

१०. वाङ् मय चौर्य करणाऱ्याने जर त्याच्या ब्लॉगमध्ये किंवा साइटमध्ये फेरफार करून ते मागील तारखेला प्रकाशित केले, तरी त्याची नोंद त्या साइटकडे असतेच. उदा. ब्लॉगरविषयीची माहिती गूगलकडे मिळते. आणि सायबर सेल त्या कंपनीकडून ती सारी माहिती मागवू शकतात. आपण आपल्या ब्लॉगवर, साइटवर किंवा मेल अकाउंटवर जे काही करत असतो, त्या साऱ्याची नोंद असतेच असते. आणि ती सारी पोलिसांना मिळते.

११. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार कॉपीराइटचा भंग करणाऱ्याला जी कमीत कमी शिक्षा आहे, ती द्यावीच लागते.

१२. लेखनाप्रमाणे आपण काढलेली छायाचित्रे, व्हिडिओ हेदेखील सुरक्षित आहेत.

१३. या साऱ्या गोष्टी सहजतेनं डाऊनलोड करता येत असल्या, तरी त्या डाऊनलोड करून वापरण्याचा हक्क कोणालाही नाही. मूळ कर्त्याची परवानगी असल्याशिवाय आपण एखादी गोष्ट फक्त डाऊनलोड करून घेणं, (वैयक्तिक उपयोग. डेस्कटॉपवर लावण्यासाठी इ.) हादेखील गुन्हाच आहे. (गाडी बाहेरच होती, म्हणून घेऊन गेलो, हे जसं चालत नाही, तसंच हेही चालत नाही.)

१४. सोशल नेटवर्कींग साइटसवर जाताना आपण त्यांच्या अटी न वाचताच अॅग्री म्हणून पुढे जातो. तसं करू नये. बऱ्याचशा सोशल नेटवर्कींग साइटवर ज्या अटी असतात, त्यापैकी यावर प्रसिद्ध होणाऱ्या साऱ्या गोष्टींचा ती साइट हवा तसा उपयोग करू शकते, अशीही एक अट असते आणि आपण ती मान्य करतो... अर्थात या साइटस त्याचा गैरवापर करत नाहीत, ही गोष्ट सोडा... पण दुसरा एखादा करू शकतो. त्यामुळे कोणत्याही साइटच्या अटी नक्की वाचाव्यात.

१५. एखाद्याने विविध ब्लॉगवरून ब्लॉगकर्त्याच्या परवानगीशिवाय घेतलेला मजकूर वापरून साइट तयार केली आणि तिचा पैसे कमावण्यासाठी उपयोग केला, तर या गुन्ह्याला आणखी कडक शिक्षा आहे. दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेत वाढ होते.

१६. हे सारे गुन्हे फौजदारी आहेत.

तर मग साहित्यचोरांनो, पोलिस मला हात लावू शकत नाहीत अशी दर्पोक्ती करून कराल का पुन्हा चोरी ?

ब्लॉगर मित्रांनो,

वर दिलेली माहिती सर्वांनी शांतचित्ताने वाचा व समजून घ्या पण समजा दुर्दैवाने तुमच्या साहित्याची चोरी झालीच तर?

तर खबरदारीचे उपाय मी माझ्या ब्लॉगवाले या ब्लॉगवर साहित्यचोरी या लेखमालिकेअंतर्गत लिहून ठेवले आहेत. त्यातील युक्त्यांचा वापर करा. ही ब्लॉगवालेची जाहिरात आहे असं समजा हवंतर पण त्यातील युक्त्या सहज, सोप्या आणि पुरावा म्हणून उपयोगी पडणा-या आहेत. आणखी काही उपयुक्त लेख मी त्या मालिकेमधे समाविष्ट करण्याचा अवश्य प्रयत्न करेन. आपले प्रश्न, शंका, सूचना येऊ द्यात. आपण सर्व त्यातूनच शिकणार आहोत.

ब्लॉग साहित्याच्या चोरी प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन त्यासाठी उपाययोजना शोधणा-या श्री. अभिजीत थिटे यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच अॅीड. सारंग खाडिलकर यांनी ब्लॉगर्ससाठी अत्यंत महत्त्वाची माहिती पुरवून ब्लॉगर्सची एकप्रकारे मदत केली आहे; मी त्यांचीही आभारी आहे.

कॉपीराईट संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास कॉपीराईट ऑफीस या संकेतस्थळावरील माहिती वाचावी.

बोक्या सातबंडे प्रकरणाचा संक्षिप्त उल्लेख मराठी ई-सकाळच्या बातमीमधे केला गेला. चोराचं नाव जाहिर न करण्यामागे हेतू हा आहे की त्याने यापासून धडा घेऊन आपले चोरीमारीचे उद्योग सोडून द्यावेत. खाली दिलेल्या संक्षिप्त बातमीवर कुठेही टिचकी दिलीत तर ईसकाळच्या मूळ दुव्यावर जाऊन ती बातमी वाचता येईल.

'माहितीचोरां'चा करा मुकाबला

ब्लॉगर्सनी ब्लॉगवर प्रसिद्ध केलेल्या माहितीचा परस्पर व्यावसायिक कारणांसाठी किंवा ही माहिती स्वतःच्या नावावर खपविण्याचे प्रकार वाढले आहेत. या संदर्भात दाद कोणाकडे मागायची? याची माहिती नसल्याने ब्लॉगर्स दुर्लक्ष करतात; परंतु हा कॉपीराईटचा भंग असून, यात शिक्षा होऊ शकते, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ब्लॉगर्सना दिलासा मिळणार असून, या "माहितीचोरांना' पकडणे सोपे जाणार आहे.