Wednesday, August 4, 2010

अशीही एक पार्टी!

प्रतिक्रिया: 
कॉल सेंटरमधे काम करत असताना ब-याच छोट्या मोठ्या पार्ट्या, फंक्शन्स, बॅश इ. इ. पहायला मिळाले. कदाचित अशा पार्ट्यांना जाण्याचा अनुभव नसावा म्हणून किंवा अशा पार्ट्यांना जाणं हा माझा पिंडच नसावा म्हणून असेल पण या पार्ट्यांमधे कधी मन रमलं नाही. सिगारेटच्या धुराने, मद्याच्या वासाने आणि कर्णकर्कश संगीताने झपाटलेलं वातावरण, त्यात चढाओढ लागल्यासारखं एकमेकांच्या वरताण शिरा ताणून हाका मारून आपल्या मित्रांना बोलवायचं... अंहं! मला जमलंच नाही ते कधी. पण याचा अर्थ ते वातावरण वाईट होतं असा घेण्यापेक्षा मीच स्वत:ला त्या वातावरणात कधी अ‍ॅडजेस्ट करू शकले नाही असा घेईन. प्रत्येकाला हवं तसं वागण्याची मुभा आहेच ना शेवटी!

रेव्ह पार्टी, बॅश म्हटलं की मला आठवत आमच्या ऑफिसवाल्यांनी केलेली पिकनिक पार्टी. माझ्या सुदैवाने मी त्या पार्टीला नव्हते आणि दुर्दैवाने ती पार्टी चुकवून मी ज्या कार्यक्रमाला गेले होते, तो ऐन वेळी रद्द झाला. आशा भोसले संगीत रजनीचा कार्यक्रम पुण्यात आयोजित झाला होता. मी मारे फोनाफोनी, कुरीयर, बॅंक ट्रॅंझॅक्शन असे सगळे प्रकार करून पुढच्या रांगेतलं तिकिट मिळवलं होतं. पुण्यात कुणाला तिकिटासाठी सांगावं असं कुणी ओळखीचं नव्हतंच त्यावेळी. ऑफीसची पार्टी चुकवून पहिल्यांदाच एकटी पुण्याला गेले. त्यासाठी आईची बोलणी खाल्ली. बाबांचे फोनवर फोन यायचे, त्यांना शांतपणे उत्तर दिली. हॉटेलमधे रूम बुक केली. संध्याकाळी कार्यक्रमाच्या ठिकाणी अगदी वेळेवर पोहोचले. पण हाय रे दैवा! ऐनवेळी पावसाने घात केला. त्या दिवशी पाऊस असा काही बरसला की कार्यक्रम तर रद्द झालाच पण मला त्याच रात्री पुन्हा ठाण्याला परतणंही कठीण होऊन बसलं. नाईलाजाने ती रात्र मला हॉटेलमधेच काढावी लागली. कार्यक्रम पाहून त्याच रात्री पुन्हा ठाण्याला परतायचं असा विचार करून मी दुस-या दिवशीची सुटी मी घेतलेलीच नव्हती. दुपारी घरी पोहोचल्यावर संध्याकाळी ऑफिसला जाण्याइतका उत्साह नव्हता. घरी गेल्यावर जी झोपले ती थेट रात्री नऊला जागी झाले.

ऑफिसमधे येणार नसल्याचा फोन केलेला नव्हता त्यामुळे दुस-या दिवशी कामावर जाताना ही धाकधूक मनात होतीच की "आता काय होईल. टी. एल. काय बोलेल. मेमो देतात की काय? मॅनेजर काय ऐकवेल?" आश्चर्याची गोष्ट म्हणजे तसं काहीच झालं नाही. मी स्वत:च स्पष्टीकरण द्यावं म्हणून टी.एल. कडे गेले तर, "मी काही विचारलं तुला? जा, हरकत नाही." इतकंच आणि त्याला न झेपणा-या कमालीच्या शांततेने त्याने म्हटलं आणि मला जायला सांगितलं. मी आश्चर्याने फक्त चक्कर येऊन पडायचीच बाकी होते. पण नंतर मला मैत्रीणीकडून जी हकीकत समजली, तेव्हा मला त्याच्या शांततेचं आणि ऑफिसमधल्या शांत वातावरणाचं गुपित समजलं. ही संपूर्ण हकीकत मी माझ्या मैत्रीणीच्या तोंडून ऐकलेली आहे. मी त्याची साक्षिदार अजिबात नाही.

ऑफिसमधल्या लोकांनी दोन दिवसांची ट्रीप काढली होती. जे ट्रीपला जाणार नव्हते त्यांना मात्र ऑफिसला जाण्याची सक्ती होती. माझी एक दिवसाची सुटी अर्थातच खूप आधी सॅन्क्शन झाल्याने मला ती सक्ती नव्हती. तर, ज्या दिवशी मी सकाळी पुण्याला जाण्याची तयारी करत होते, त्याच वेळी माझ्या ऑफिसमधील लोक कर्जतच्या दोन दिवसाच्या पार्टीसाठी बसमधे बसत होते. कर्जत स्टेशनपासून आता कुठेतरी एक फार्महाऊस या लोकांनी बुक केलं होतं. दुपारी थोडा आराम करून झाल्यावर प्रत्येकजण उत्साहाने नुसता सळसळत होता. हळूहळू गाणी, कोल्ड ड्रींक्स, अंताक्षरी सुरू झाली. रात्र जसजशी चढू लागली तसतसा पार्टीमधे रंग भरू लागला. काही फक्त मुलांचे, फक्त मुलींचे ग्रुप्स बनले. काही ग्रुप्समधे मुलं मुली मिळून धमाल करत होते. ज्यांना नशा करायची सवय आहे, ते कुठेतरी एका कोप-यात भुलभुलैया साजरा करत होते. रात्रीचा दीड वाजला होता. पार्टीचं परफेक्ट भारलेलं वातावरण तयार झालं होतं आणि घात झाला!

कर्कश संगीताच्या आवाजात कुठेतरी व्हाऊं व्हाऊं आवाज ऐकू येऊ लागला. आवाजापाठोपाठ पोलिसांची एक जीप आणि एक मोठी निळी व्हॅन येऊन धडकली. गाणं बंद, बोलणा-यांचे आवाज बंद, नाचणा-यांचे पाय थबकले, भुलभुलैया तर तिकडेच मातीच्या ढिगा-याखाली दबला गेला. सर्वांना त्या मोठ्या व्हॅनमधे कोंबण्यात आलं. जे त्या पार्टीत सामील न होता. झोपलेले होते, त्यांनाही त्या व्हॅनमधेच बसवलं. ट्रीपला येताना ऑफीसमधी काही उच्चपदस्थ आपापल्या कार्स घेऊन आले होते. त्यांनाही कारने पोलिस व्हॅनच्या मागोमाग यायला सांगितलं. मग पुढे जीप, मागे व्हॅन आणि त्याच्या मागे कार्स अशी सगळी वरात पोलिस स्टेशनला गेली. जो तो विचार करत होता की कर्जतमधे इतक्या आत पार्टी करत असताना पोलिसांना कळलंच कसं? त्याचाही उलगडा झाला. ज्या फार्महाऊसमधे हा गोंधळ चालला होता, त्याच्या लगतचं फार्महाऊस एका राजकीय नेत्याच्या मालकीचं होतं म्हणे आणि दुर्दैवाने त्या नेत्याची बायको आपल्या मुलांसह तिकडे दोन दिवस रहायला आली होती. रात्री दीड वाजला तरी गोंधळ थांबत नाही म्हटल्यावर तिने सरळ पोलिस स्टेशनला फोन लावला. राजकीय नेत्याचं नाव ऐकल्यावर पोलिस कसले यायचे थांबतात? सर्वांना व्हॅनमधून पोलिस स्टेशनला आणलं गेलं इतपत ठीक होतं. पण नेत्या्च्या बायकोने तक्रार केली म्हटल्यावर प्रकरण इतक्या सहजासहजी मिटणारं नव्हतं. पोलिसांचे टोमणे, ताशेरे झेलून, माफी बिफी मागून,”पुन्हा असं करणार नाही’ अशी लेखी हमी पोलिसांनी देऊन एकदाचं प्रकरण मिटलं.

पोलिसांनी रातोरात ते फार्महाऊस सोडायला सांगितलं. नसतं सोडलं तर प्रत्येकाच्या घरी फोन करून घरच्या लोकांना बोलावून घेणार होते ते. एवढा तमाशा झाल्यावर आता पार्टीचा उत्साह होताच कुणाला! त्या फार्महाऊसवर थांबण्याचाही कुणाला उत्साह उरला नव्हता. आता घरी लाज जाण्यापेक्षा सर्वांनी फार्महाऊसवर जाऊन आपलं सामान पॅक केलं आणि पुन्हा परतीच्या वाटेला निघाले. पण दोन दिवसांची ट्रीप आणि रात्रीतून घरी जायचं म्हणजे काय झाले ते घरी सांगणं आलं. सर्वजण ऑफीसमधेच आले. तिकडे कुणीच विचारणारं नव्हतं कारण सगळेच पार्टीला..! रात्रभर तिकडेच राहिले. कुणी कीबोर्डवर डोकं ठेवून झोपलं, कुणी खालच्या कार्पेटवर पथारी पसरली. सगळा दिवस ऑफिसमधे घालवून, रात्रीची शिफ्ट करून प्रत्येकजण आपापल्या घरी गेला तो देवाचे आभार मानत की एका मोठ्या संकटातून वाचलो शिवाय घरच्यांच्या शिव्या खाव्या लागल्या नाहीत.

माझी मैत्रीण हे सगळं सांगितल्यावर शेवटी म्हणाली, "आता पोलिसांची व्हॅन नुसती दिसली तरी भिती वाटते."