Tuesday, August 31, 2010

बॅड आयडीया!

प्रतिक्रिया: 
मैथिलीने घरात प्रवेश केला. आईचं लक्ष नाहिये असं पाहून ती हळूच बाथरूममधे शिरली. भुवईवर दाबून धरलेला रुमाल काढून तिने जखम पाहिली. जखम लहानशीच होती पण वेदना खूप होत होत्या. रक्त टिपण्यासाठी तिने भुवईवर दाबून ठेवलेला रूमालही चांगलाच लालभडक झाला होता. जंतूनाशक औषधाने जखम स्वच्छ करता करता मैथिली स्वत:वरच रागावली आणि पुटपुटली.

“बॅड आयडिया!”

मैथिलीची बारावीची परिक्षा संपली आणि वडिलांनी तिला कबूल केल्याप्रमाणे मोबाईल घेऊन दिला. तिच्या ब-याच मैत्रीणींच्या हातात मोबाईल आला होता. त्यांच्याकडे पाहिलं की मैथिलीचं लक्ष आपोआपच आपल्या रिकाम्या हातांकडे जायचं.

पण वडिलांनी तिला नवीन मोबाईल घेऊन दिला पण काही अटींवर. “जास्त बोलायचं नाही, एका जागी बसून बोलत जा, सारखे एस. एम. एस. करायचे नाहीत, घरात आल्यावर मोबाईल बंद,” अशा आईबाबांच्या अटी मान्य केल्यावरच मैथिलीला मोबाईल वापरण्याची परवानगी मिळाली.

मोबाईल हातात येताच तिच्या कल्पनांना जणू पंखच फुटले. “आपण कमवायला लागल्यावर याहीपेक्षा चांगला फोन घ्यायचा,” असा विचार करून मैथिली टि.व्ही. वर दाखवल्या जाणा-या मोबाईल कंपन्यांच्या जाहिरातींवरही लक्ष ठेवून असायची. त्यातच तिला ही जाहिरात दिसली

"वॉक ऍन्ड टॉक – व्हॉट ऍन आयडीया!"

फोनवर एका जागी बसून बोलल्याने कितीतरी अमूल्य वेळ वाया जातो. त्यापेक्षा जर चालता चालता मोबाईलवर बोलण्यास सुरूवात केली तर आपलं चालणंही होतं आणि बोलणंही! म्हणजे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेला चालण्याचा व्यायाम आपसूकच केला जातो.

“अरे वा! चांगली आयडिया आहे की! कुणालाच हे कसं सुचलं नाही बरं?”

मैथिली या जाहिरातीने चांगलीच प्रभावित झाली होती. उद्यापासूनच या प्रयोगाला सुरूवात करायची असं तिने ठरवलं. जाहिरातीच्या प्रभावात आईवडिलांनी काळजीपोटी घातलेली अटही ती विसरून गेली. आठवडाभर हा प्रकार सुरळीत सुरू होता.

पण हळूहळू मैथीलीच्या लक्षात आलं की हे वॉक ऍन्ड टॉक, वाटतं तितकं सोपं नाहिये. कारण आजूबाजूला कुणाला धक्का लागेल का, रस्त्यावरून एखादं वाहन येतंय का, याची काळजी करता करता आपण काय बोलतोय इकडेही लक्ष रहात नाही. शिवाय चालता चालता बोलण्याने आपल्या बोलण्याच्या गतीनुसार कधीतरी आपला चालण्याचा वेगही वाढतो आणि बोलताना दम लागतो. मैथिलीने ही आयडीया बाद करायचं ठरवलं.

नेमकं त्याच दिवशी मैथिलीला कॉलेजला जायला उशीर झाला. पटापट आवरून मैथीली बस स्टॉपवर पोहोचली तर नेहेमीची बस केव्हाच निघून गेलेली.

“काय करावं?”... मैथीलीने शेवटी आज रिक्षा करून जायचं ठरवलं पण हात दाखवल्यावर एक रिक्षा येईल तर शपथ! तितक्यात तिचा मोबाईल वाजला.

“मैथिली, कुठायंस तू? मी केव्हाची इथे गेटजवळ उभी आहे. येतेयंस ना?” मैथिलीची मैत्रीण सुरूची तिला फोनवर विचारत होती.

“हो, येतेय. अगं उशीर झाला....” बोलता बोलता मैथिलीने एका रिक्षाला हात केला. ती रिक्षा काही थांबली नाही पण मैथिलीचा हात पाहून पलिकड्च्या बाजूने एक रिक्षा थांबलेली मैथिलीने पाहिली.

“डी.एन. पाटीऽऽल?” मैथिलीने ओरडून विचारलं. “हां? अगं तुला नाही.... रिक्षावाला....” मैथिली मधेच सुरूचीला म्हणाली. तिकडे रिक्षा ड्रायव्हर मैथिलीला खूण करून ’याच दिशेच्या शॉर्टकने रिक्षा घेऊन जाईन,’ असं सांगत होता. मैथिलीने त्याला ’थांब थांब’ अशी खूण केली. एकीकडे मोबाईलवर बोलता बोलता रिक्षा पकडावी असा विचार करून मैथिली रस्ता ओलांडण्यासाठी फुटपाथवरून खाली उतरली.

सुरूचीशी बोलताना तिला येणा-या जाणा-या गाड्यांकडे पहायचंही भान नव्हतं. ती पुढे जात असतानाच तिच्या उजव्या बाजूने एक रिक्षा सुसाट पळत आली. मैथिली प्रसंगावधान राखून मागे सरकली पण त्या रिक्षाला बाहेरच्या बाजुने लावलेल्या आरशाने मैथिलीच्या डोळ्यावरचा चष्मा उडाला आणि तिच्या भुवईवर चांगलाच फटका बसला. मैथिली खाली कोसळली. तिच्या हातातून मोबाईलही खाली पडला.

“ए, दिसत नाही का?” बस स्टॉपवर उभ्या असलेल्या एका काकांनी ओरडून रिक्षावाल्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण रिक्षा निघून गेली. चूक त्या रिक्षावाल्याची थोडीच होती? हळूहळू मैथिलीभोवती गर्दी जमा झाली. मैथिली आपल्या इवल्याशा रुमालाने गळणारं रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत होती. कुणीतरी तिला पाणी दिलं. पण भुवईवरच्या जखमेपेक्षाही आपण किती मोठ्या प्रसंगातून वाचलो याचा ताण मैथिलीच्या डोक्यावर जास्त होता. डॉक्टरकडे जाण्याचं नाकारून मैथिलीने सरळ घरची वाट धरली.

बाथरूममधून बाहेर पडणा-या मैथिलीला पाहून आई चकित झाली. तिच्या कपाळावरची जखम पाहून तर तिच्या चेहे-यावरचे हावभावच बदलले.

“अगं, मैथिली! हे काय झालं? आणि घरात कधी आलीस तू?”

मैथिलीने आईला घडला प्रकार सांगितला, अर्थातच वॉक अँड टॉकचा उल्लेख टाळून! पण तिने मनाशी पक्कं ठरवलं, ही वॉक अँड टॉकची आयडिया एकदम कुचकामी आहे. मोबाईलवर बोलत असताना फक्त बोलायचं.

"डोन्ट वॉक व्हेन यू टॉक!"

टीप: हा लेख देवकाकांच्या ’हिवाळीअंकामधे’ गुरुवार ३ डिसेंबर २००९ रोजी सर्वप्रथम प्रकाशित झाला होता. तो मी इथे पुन:प्रकाशित करत आहे.