Friday, July 23, 2010

मॅन्युअल कोण वाचणार??

प्रतिक्रिया: 
सध्या फोटोग्राफी शिकायला सुरूवात केली आहे. त्यासाठी आवश्यक असलेली एक लेन्स मी मागवून घेतली. एका आकर्षक चामड्याच्या बटव्यात छानपैकी पॅक केलेली ती लेन्स उघडल्यावर टप‍कन आतलं बहिर्गोल भिंग माझ्या हातात आलं. नशीब!... पलंगावर बसले होते. खुर्चीत बसलेली असते, तर... नको! कल्पनाही करवत नाही.

तर, ते भिंग हातात आल्यावर कुतुहलाने मी ते भिंग हातात घेऊन सर्व लहान लहान वस्तू कशा मोठ्या मोठ्या दिसतात, ते पाहून लहान मुलासारखं कौतुक करून घेतलं. मग मोठं झाल्याची जाणीव झाली आणि लेन्सकडे मोहरा वळवला. एका बाजूचं झाकण काही निघता निघेना. असं जाम घट्ट बसलं होतं की एकवेळ मुरंब्याच्या बरणीचं झाकण सुद्धा चटकन निघालं असतं. बराच वेळ त्याच्याशी झटापट केल्यावर मला ज्ञानप्राप्ती झाली की लेन्सच्या इतर भागांसारखं हे झाकण धातूचं नसून रबराचं आहे, फिरकीचं नाही. मी ते झाकण उचकलं आणि अलगद माझ्या हातात घेतलं. सर्व पार्ट्स सुटे सुटे केले आणि आता सर्व लेन्स व्यवस्थित बघितल्याचं समाधान मला मिळालं.लेन्स संपूर्ण उघडून झाली. आतलं अंतर्गोल भिंग निरखून झालं. बहिर्गोल भिंगासारखीच त्याच्यातूनही मजा मजा बघून झाली. आता त्यात काही नाविन्य उरलं नव्हतं म्हणून मी ती लेन्स पुन्हा पॅक करायला घेतली. हरे राम!! पुन्हा झटापट आली. पार्ट सुटे करताना कुठला पार्ट कुठून काढला हे कुठे पाहिलं होतं मी?! पुन्हा वीस मिनिटं मारामारी केल्यानंतर एकदाची लेन्स मी व्यवस्थित बसवली... असं मला वाटलं. खातरजमा करून घेण्यासाठी पुन्हा पार्ट्स सुटे करावे असं वाटत होतं मला पण म्हटलं पुन्हा विसरले तर आणखी वीस मिनिटं मारामारी. मी असेम्बल्ड केलेली लेन्स खोक्यात ठेवण्यासाठी खोका उचलला आणि त्यातून बाहेर पडलं मॅन्युअल... ज्यात लेन्स कशी उघडावी, कशी बसवावी, कशी वापरावी याची सऽऽर्व माहिती दिलेली होती. हं! काही गोष्टी शिकण्यासाठी मॅन्युअल वाचणं आवश्यक असतं तर!बरं झालं, घरात दुसरं कुणी हे पहायला नव्हतं म्हणून! नाहीतर माझा फोटो काढण्यालायक झालेला तीच लेन्स कॅमेर्‍याला लावून टिपला गेला असता. हे हे!!