Wednesday, July 21, 2010

मोनालिसाला कुठे होत्या भुवया?

प्रतिक्रिया: 
“भुवया एवढ्या रंगवून यायला ही काय नाटक कंपनी वाटली का तुला?” बाईंनी तिरसटपणे विचारलं.

अनिताला आता या प्रश्नाचाच कंटाळा आला होता. वर्गावर नवीन शिक्षक आले आणि त्यांनी अनिताला पाहिलं की त्यांचा पहिला प्रश्न असाच काहीतरी असायचा. खरंतर अनिताची यात काहीच चूक नव्हती. गोरी गोरी, सोनेरी कुरळ्या केसांची अनिता शाळेच्या निळ्या पांढ-या गणवेशातसुद्धा बाहुलीसारखी दिसायची. तिच्या घा-या डोळ्यांमधे कधी धूर्तपणाची झलक आम्हाला दिसलीच नाही. उलट मित्रमैत्रीणींना पाहिल्यावर तिच्या डोळ्यात जी चमक यायची ती पहायला मला खूप आवडायचं. पण अनिताला पहिल्यांदा पहाणा-या कुणालाही जे खटकायचं ते म्हणजे तिच्या आयब्रो पेन्सिलने काळ्याभोर केलेल्या भुवया!

अनिताला लहानपणापासूनच भुवयांवर अगदी विरळ केस होते. जे काही थोडेफार होते, ते सोनेरी रंगाचे होते, त्यामुळे तिला भुवया नसल्यासारख्याच होत्या. ती काही विकृती नव्हती की अनुवांशिकतेमुळे आलेला रोगही नव्हता. तिला भुवया नव्हत्या, दॅट्स ऑल! तिने त्यासाठी डॉक्टरांचा सल्लाही घेतला होता पण त्यांनीच लहानपणी ट्रिटमेंट सुरू न करण्याबद्दल सांगितलं होतं. त्यामुळे अनिताच्या आईवडिलांनी पुढे काही हालचाल केली नाही. भुवया नसलेला तिचा चेहेरा कुणालाच पहावायचा नाही, त्यामुळे आयब्रो पेन्सिलने काळ्या केलेल्या भुवयांमुळे तिच्या चेहे-यात जरा चांगला बदल झालेला वाटायचा. फक्त मुळातच भुवया नसल्याने तिने कितीही फिकट पेन्सिल फिरवली तरी ती गडदच वाटायची एवढाच काय तो मायनस पॉईंट.

शाळेतल्या जुन्या शिक्षकांना, आमच्यासारख्या जुन्या मित्रमैत्रीणींना अनिता भुवया काळ्या का करते हे माहित होतं पण काही नवीन मुली आणि मुलांसाठी तो चेष्टेचा विषय ठरायचा. त्यातच नवीन आलेल्या शिक्षकांकडून बोलणी खावी लागली की बिचारी खट्टू होऊन मधल्या सुटीत एकटीच बसून रहायची. डबासुद्धा खायची नाही. नंतर शिक्षकांना कळलं की ते पुन्हा काही तिला विचारायचे नाहीत पण हे असं सारखं सारखं विनाकारण अपमानित होणं कुणाला आवडेल?

त्यादिवशी सुद्धा बाईंनी असं विचारल्यावर अनिताने खाली मान घातली पण ती स्पष्टीकरण देत होती.

“बाई... मला ना भुवया नाहीत म्हणून...”

“आं? भुवया नाहीत?” बाईंनी न कळल्यासारखं पुन्हा विचारलं.

बाईंच्या या प्रश्नासरशी वर्गातली नवीन मुलं मुली फिदीफिदी हसू लागली. अनिताने खुन्नसने त्यांच्याकडे बघितलं.

“एऽऽ, गप्प बसाऽ. काय म्हणतेयंस तू? तुला भुवया नाहीत?” बाईंना अजूनही ती जे म्हणाली त्यावर विश्वास बसला नव्हता. मला वाटतं, अनिताइतकाच अनिताच्या जुन्या मित्रमैत्रीणींनाही या प्रश्नाचा उबग आला असावा. अनिताच्या बाजूला बसलेली सुवर्णा मोरे ताडकन उभी राहिली.

“हो बाई, तिला भुवया नाहीत. जन्मापासूनच नाहीत. नसतात कुणाकुणाला. त्याच्यावर आत्ता उपचार करता येणार नाही म्हणून ती पेन्सिल फिरवते भुवयांवर. नाही फिरवली तर हे हसणारे आणखीन हसत रहातील. मग ती शाळेत यायची बंद होईल...”

फिदीफिदी हसणारी तोंड बंद झाली होती. बाई शांतपणे अनिताकडे बघत होत्या. अनिता आणि सुवर्णा दोघी खाली मान घालून उभ्या होत्या. अनिताच्या डोळ्य़ांतून खाली पडलेला अश्रूचा थेंब बाईंनी पाहिला होता. त्यांनी त्या दोघींना खाली बसायला सांगितलं. बाईंचा तास खरंतर मराठीचा पण त्यांनी त्या दिवशी आम्हाला इतिहास शिकवला.

“लिओनार्डो द व्हिन्सी हा एक जगप्रसिद्ध चित्रकार होऊन गेला, तुम्हाला सर्वांनाच माहित असेल. त्याचं प्रसिद्ध चित्र मोनालिसा पाहिलं आहे कुणी?” बाईंनी सर्वांना विचारलं.

“बाई, इतिहासाच्या पुस्तकात आहे ते चित्र!” मागच्या बाकावरून कुणीतरी ओरडलं.

“आहे? काढा पाहू इतिहासाचं पुस्तक.”

बाई मराठी ऐवजी इतिहासाचं पुस्तक का काढायला सांगतायंत, हेही कुणाच्या डोक्यात आलं नव्हतं. भराभर प्रत्येकाच्या दप्तरातून इतिहासाचं पुस्तक, मोनालिसाचं चित्र ज्या पानावर आहे, ते पान निघालं. बाईंनी समोरच्या बाकावरून एकाचं पुस्तक आपल्या हातात घेऊन मोनालिसाचं चित्र सर्वांना दाखवलं.

“हे मोनालिसाचं चित्र. नीट निरखून पहा. तिच्या हास्याची तुलना कुठल्याच स्त्रीच्या हास्याशी होऊ शकत नाही असं म्हणतात. तिचं हास्य म्हणजे एकमेवाद्वितीय. प्रत्येकाला तिचं हास्य निराळं भासतं. सुंदर स्त्री असं वर्णन केलेल्या या स्त्रीच्या चित्रामधे काही दोष जाणवतो का तुम्हाला?”

सगळेजण ते चित्र निरखत राहिले. मग माना नकारार्थी हलल्या.“मोनालिसाला भुवया नाहीत.” बाईंनी एवढं म्हणायचा अवकाश! पुन्हा माना पुस्तकात गेल्या आणि वर्गातली कुजबुज वाढतच गेली. काहीजण मोनालिसाचा फोटो बघून अनिताकडे बघत होते. काहीजण बाईंकडे बघत होते. बाईंची नजर सगळ्या वर्गावर फिरत होते. थोड्या अवकाशानंतर बाईंनी डस्टर दोन-तीन वेळा टेबलावर आपटलं. वर्गात पुन्हा शांतता पसरली.

“काय कळलं तुम्हाला यातून?” बाईंनी आपली रोखलेली नजर तशीच ठेवून सगळ्या वर्गाला प्रश्न विचारला. उत्तर आलं नाही, तसं बाईंनी स्वत:च बोलायला सुरूवात केली.

“मोनालिसामधला हा दोष तुम्हाला दिसला नाही कारण तुमची मोनालिसाच्या चित्राची ओळख झाली, तीच मुळी एक सुंदर चित्र, जगप्रसिद्ध कलाकाराचं जगप्रसिद्ध चित्र अशी. मग त्यात दोष कसा असणार नाही का? त्याकाळी भुवया काढायची फॅशन होती की तिला खरंच भुवया नव्हत्या हे मला माहित नाही पण या चित्रात तिला भुवया नाहीत आणि जोपर्यंत कुणी सांगत नाही, तोपर्यंत आपल्याला हे लक्षात येत नाही. बाळांनो, मनुष्यातील गुणांआधी त्याच्यातील दोष शोधणं हा मनुष्यस्वभाव आहे पण याचा अर्थ आपण गुणांकडे डोळेझाक करायची असा होत नाही. कुठल्याही व्यक्तीमधील दोष आधी कळले, तर त्याच्यातील गुण काय आहे, हे सुद्धा शोधण्याचा अवश्य प्रयत्न करा. शारिरिक सौंदर्य हे तत्कालिक असतं, अस्थायी असतं. पण तुमच्या वागण्य़ातून आचरणातून जे सौंदर्य निर्माण होतं ते चिरकाल टिकणारं असतं, हे लक्षात ठेवा. आपल्या सौंदर्याच्या स्तुतीपेक्षा एक व्यक्ती म्हणून हे जग आपला आदर करेल असं वागा.”

बाई मग सावकाश अनिताजवळ गेल्या आणि म्हणाल्या, “अनिता, तुझ्या चेहे-यावर भुवया नाहीत, हा तुझा दोष नाही पण त्याचा न्यूनगंड तू बाळगणं हा मात्र दोष होऊ शकतो. आपल्यातील उणीवांचा न्यूनगंड बाळगण्यापेक्षा त्यावर मात करून पुढे जा. मोनालिसासारखंच लोक तुलाही भुवया नाहीत हे विसरून जातील.”

अनिताने त्यानंतर कधीही आपल्या भुवयांवरून आय-ब्रो पेन्सिल फिरवली नाही.