Wednesday, June 2, 2010

या जोडप्याला आहेत एकोणीस मुलं!

प्रतिक्रिया: 
सुनेला डोहाळे लागलेले असतानाच बायकोलाही डोहाळे लागले तर? ऐकताना थोडं विचित्र वाटतं नाही? आपल्याकडे एक मूल सांभाळता सांभाळता आईवडीलांचा जीव मेटाकुटीला येतो, तर मग विचार करा, जर या एकाच्या जागी एकोणीस मुलं सांभाळायला लागली, तर काय होईल त्या आईवडीलांचं? ही नुसती कल्पना नाही, तर प्रत्यक्ष घटना आहे.

अमेरिकेमधील आरकेन्सा राज्यात रहाणा-या जिम आणि मिशेल डगर या दाम्पत्याला एक नाही दोन नाही तर तब्बल एकोणीस मुलं आहेत! मुलं ही देवाची देणगी आहेत असं समजून जिम आणि मिशेल या दोघांनी आजपर्यंत एकोणीस मुलांना जन्म दिला आहे. देवाचीही त्यांच्यावर कृपादृष्टी आहे असं म्हणायला हरकत नाही कारण इतक्या मुलांचं संगोपन करायचं तर आर्थिक बाजू भक्क असणं खूप गरजेचं आहे. जिम आणि मिशेल हे दोघेही रिअल इस्टेट एजंट आहेत. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या भरभरटीला सुरूवात झाली आणि आजपर्यंत इतक्या मुलांना वाढवण्यासाठी त्यांना कशाचीही उणीव भासलेली नाही.

पण अमेरिकेसारख्या प्रगत देशात राहून सुद्धा इतक्या मुलांना जन्म देण्यामागे काय कारण असेल? जिम आणि मिशेलचं लग्न झालं तेव्हा जिम होता एकोणीस वर्षांचा आणि मिशेल होती सतरा वर्षांची. लग्न झाल्यावर इतक्याच मूल नको असा विचार करून मिशेल डगरने गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करण्यास सुरूवात केली पण गोळ्या घेऊनसुद्धा तिला गर्भधारणा झालीच आणि दुर्दैवाने गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळेच तिचा गर्भपातही झाला. त्याच वेळेस मिशेलने निश्चय केला की यापुढे गर्भनिरोधक गोळ्या कधीही घ्यायच्या नाहीत. पण आपल्या निश्चयामुळे इतकं मोठं कुटुंब बनेल, असं खुद्ध मिशेललाही त्यावेळेस वाटलं नसेल. भारतामधे वाढत्या लोकसंख्येमुळे आर्थिक व्यवस्थेवर होणारा दुष्परिणाम पहाता कुटुंबनियोजन आवश्यकच आहे. बहुसंख्य स्त्रिया व पुरूष गर्भधारणा टाळण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर करतात. अमेरिकेत अजून कुटुंबनियोजनाचे कायदे कडक झालेले नाहीत. त्यामुळे घराचं असं गोकुळ होणं तिकडे गौरवास्पद समजलं जातं.

 
 
मात्र मुलांना जन्म देणं आणि मुलाचं संगोपन करणं यातला फरक मिशेल आणि जिम या दोघांनाही चांगलाच ठाऊक आहे. "एकोणीस मुलं आहेत, कुणाला जास्त वेळ द्यायचा, मुलांचा खर्च भागवायचा तर दोघांनी नोकरी करायला हवी म्हणून मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही", असली कारणं मिशेल आणि जिमने दिली नाहीत. उलट रिअल इस्टेट सारखा व्यवसाय दोघांनीही सांभाळून त्यांनी आपल्या मुलांना उत्तम आयुष्य व चांगले संस्कार दिले आहेत.

काही महिन्यांपूर्वीच या कुटुंबातील दोन मोठ्या मुलांनी अपघातात जखमी झालेल्या एका लहान मुलीचा जीवही वाचवला. योगायोग म्हणजे या मुलीला त्याच हॉस्पिटलमधे दाखल केलं गेलं, ज्या हॉस्पिटलमधे डगर कुटुंबातील सर्वात लहान मुलगी म्हणजे जोसीचा जन्म झाला. अरे हो! आणखी एक गंमत म्हणजे मिशेल आणि जिमने आपल्या सर्व मुलामुलींची नावे इंग्रजी जे या आध्याक्षरावरूनच ठेवलेली आहेत. हे डगर कुटुंब सगळ्या अमेरिकेला ठाऊक आहे. युट्यूबवर नुसतं Dugger Family हे शब्द टाकलेत तर तुम्हाला चिक्कार व्हिडीओज बघायला मिळतील. या कुटुंबाची स्वत:ची एक साईटसुद्धा आहे. http://www.duggarfamily.com/ असं या साईटचं नाव आहे.

आपल्या परंपरा नि संस्कृती वेगळी, त्यांच्या परंपरा नि संस्कृती वेगळी. डगर कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा जॉश याची बायको ऍना जेव्हा गर्भवती होती तेव्हा जॉशची आई म्हणजेच मिशेल डगरदेखील गर्भवती होती. आपल्याकडे सुनेला ज्यावेळी डोहाळे लागतायंत त्याच वेळी बायकोलाही डोहाळे लागले तर, डोहाळे जाऊ देत, जग काय म्हणजे याचा विचार आपण आधी करू.