Tuesday, May 25, 2010

नेट सेफ बॅंकींग – क्रेडीट कार्डला उत्तम पर्याय

प्रतिक्रिया: 
कोणत्याही प्रकारची ऑनलाईन खरेदी करायची म्हटली, तर क्रेडीट कार्ड हे मस्ट होऊन जातं. ऑनलाईन खरेदीसाठी इतरही पर्याय उपलब्ध आहेत पण बहुतांशी लोक सोयिस्कर म्हणून क्रेडीट कार्डचा वापर करणं पसंत करतात. खरंतर आपल्या बॅंकेच्या बचत खात्यात पुरेसे पैसे असतात पण केवळ ऑनलाईन व्यवहाराला डेबिट कार्ड चालत नाही म्हणून आपल्याला एकतरी क्रेडीट कार्ड बाळगावं लागतं.

मात्र क्रेडीट कार्डच्या व्याजाचे अवाजवी दर, उधारी भरण्याचं लक्षात न रहाणे किंवा वेळेवर संपूर्ण पैसे चुकता न करता येणे, यासारख्या अडचणींमुळे क्रेडीट कार्डवरची थकबाकी वाढतच जाते आणि पर्यायाने क्रेडीट कार्ड कॅन्सल करावं लागतं. त्यानंतरही फोन, ईमेल्स, पत्रव्यवहार, कधीतरी प्रत्यक्ष वसूली करणारे पाठवून क्रेडीट कार्डच्या थकबाकीची आपल्याला जाणीव करून दिली जातेच. मग वाटायला लागतं की उगाच ह्या फंदात पडलो. क्रेडीट कार्डची थकबाकी भरून आपण मनाशी ठरवतो की “पुन्हा क्रेडीट कार्ड वापरायचं नाही.” पण ऑनलाईन खरेदीच्या साईट्स बघताना एखादी मर्यादित साठा असलेली वस्तू विकत घेण्याचा मोह आपल्याला आवरत नाही आणि मग आपल्या पैशाच्या पाकिटातलं क्रेडीट कार्ड हळूच आपल्याला खुणावू लागतं.हे चक्र जोपर्यंत आपण थांबवणार नाही, तोपर्यंत असंच चालू रहाणार आहे. मग यावर काही उपाय नाही का? पुरेसे पैसे खात्यात असतानाही केवळ नाईलाज म्हणून पांढरा हत्ती पोसावा तसं क्रेडीट कार्ड बाळगण्यापेक्षा एखादं तात्पुरतं क्रेडीट कार्ड मिळालं तर? अहो, हल्ली मुलीसुद्धा शे-दीडशे रूपयांच्या छान छान चपला दोन-तीन महिने वापरणं पसंत करतात. पैसेही वसूल होतात आणि नवीन फॅशनच्या चपलांची हौस दर तीन महिन्यांनी भागवून घेता येते! मग क्रेडीट कार्ड्सुद्धा तात्पुरतं, हवं तेव्हा वापरून विसरून जाता यावं असं नको का?

तर, असं क्रेडीट कार्ड उपलब्ध आहे. एच.डी. एफ. सी. बॅंकेच्या ऑनलाईन बॅंकींग करणा-या खातेधारकांना नेट सेफ बॅंकींग हा पर्याय निश्चितच माहित असेल. हे कार्ड तयार करण्यासाठी तुम्हाला एक युझरनेम व पासवर्ड तयार करावा लागतो. ही अतिशय चटकन पार पडणारी प्रक्रिया आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डाचा वापर करून एक तात्पुरतं क्रेडिट कार्ड तयार करता येतं. या क्रेडीट कार्डाचा उपयोग अगदी तस्साच करायचा असतो, जसा तुम्ही सामान्य क्रेडीट कार्डचा करता. या नेट सेफ क्रेडीट कार्डची वैधता म्हणजेच व्हॅलिडिटी मात्र केवळ २४ तासांपुरतीच असते. तुम्हाला हव्या त्या रकमेचं क्रेडिट कार्ड तुम्ही स्वत: तयार करू शकता. रक्कम जास्त असेल तर या तात्पुरत्या क्रेडिट कार्ड्च्या वापरानंतर उरलेली जादा रक्कम, पुन्हा तुमच्या बचत खात्यात वळती केली जाते.भारतात सर्वात प्रथम HDFC या बॅंकेने नेटबॅंकींग सोबत हा पर्याय द्यायला सुरूवात केली. त्यापाठोपाठ आय.सी.आय.सी.आय. बॅंकेनेही या कल्पनेला उचलून धरलं. आणखी किती बॅंक्स ही सुविधा देतात हे मला अजून शोधायचंय. मात्र क्रेडिट कार्ड्साठी अर्ज करा, त्यातून बाद व्हा, पुन्हा अर्ज करा आणि एकदा कार्ड मिळालं की वर सांगितलेल्या न थांबणा-या चक्रात अडकून पडा, यापेक्षा काही मोजकेच ऑनलाईन व्यवहार करणा-या माझ्यासारखीला हे नेटसेफ क्रेडिट कार्ड म्हणजे के वरदान आहे. असं नेटसेफ क्रेडिट कार्ड वापरायला मिळाल्यामुळे मी माझ्या जुन्या क्रेडीट कार्डला टाटा केलंय, हे तुम्हाला सांगायला नकोच.