Tuesday, May 11, 2010

जागून ज्याची वाट पाहिली - मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई २०१०

प्रतिक्रिया: 


२५ मार्चला मुंबईमधे दुसरा ब्लॉगर्स स्नेह मेळावा भरवूया असा रोहनचा बझ्झ आला तिथून ते ९ मे या दिवशी ब्लॉगर्स मेळावा प्रत्यक्षात पार पडेपर्यंतचा एक एक दिवस माझ्या स्मरणात राहील असाच आहे.

मेळावाच्या कल्पनेला सर्व ब्लॉगर्सची संमती होती. ही योजना कशी काय अंमलात आणायची याची चर्चा करता करता मी या मेळाव्याच्या कामाशी केव्हा एकरूप झाले, हे मलासुद्धा कळलं नाही. मी, रोहन आणि महेंद्रदादा सकाळी ऑनलाईन भेटलो की वेड्यासारखे एकमेकांना ईमेल करत असू. एकदा का कीबोर्डवर कडकड आवाज सुरू झाला की तो पुढचे दोन तास थांबत नसे. लहानातील लहान उणीवसुध्दा राहू नये म्हणून आम्ही अक्षरश: दोन दोन तास एकाच गोष्टीची चर्चा करत असायचो. त्यातही पुन्हा उत्सुक ब्लॉगर्स आणि वाचकांची ईमेल्स इनबॉक्समधे येऊन थडकायची. त्यांनाही सवडीने उत्तरे देत होतो.

एक एक ब्लॉगरचं नाव जसं नोंदवलं जात होतं, तसं तसं आमच्या डोक्यावरचं जबाबदारीचं ओझं वाढत चालल्याची जाणीव होत होती. ’सगळं व्यवस्थित होईल ना’, अशी राहून राहून काळजी वाटत होती आणि ते साहजिकच होतं. कारण आम्ही ३०-३५ ब्लॉगर्सचा अंदाज घेऊन कामाला सुरूवात केली होती आणि नोंदणीचा आकडयाने ८० चा टप्पा गाठला होता. मग पुन्हा काही बदल काही नव्या गोष्टींची आवश्यकता यावर चर्चा असं करता करता एक एक काम तडीस लावत गेले आणि हा, हा म्हणता मेळाव्याचा दिवस उजाडला सुद्धा.

९ तारखेला साडेतीन वाजता दा.सा.वा.ला पोहोचले तेव्हा तिथे केलेली खुर्च्यांची रचना, व्यासपिठाची रचना, पोडियम हे सर्व पाहून मनातील काळजी थोडी कमी झाली. मी ’हुश्श’ म्हणत खुर्चीवर जेमतेम बसले असेन, तोच सुभाष इनामदार, कृष्णकुमार प्रधानकाका, भारत मुंबईकर, सचिन उथळे पाटील हजर झाले. सचिनने मेळाव्यासाठी फलक तयार करूनच आणला होता. कसे आभार मानू मी या पोराचे? “तुला बॅनर बनवून देतो,” असं म्हटल्यानंतर या मुलाने मला चक्क अर्ध्या दिवसात तयार बॅनरचे फोटो पाठवले! मीसुद्धा सचिनची फॅन आहे, असं मी म्हणू शकते आता. भारतने तर आल्या आल्या “ताई काय काम आहे सांग”, असं विचारलं. तेव्हाच लक्षात आलं की आपण आयोजक असलो, तरी आपल्यापेक्षा जास्त उस्ताह यांनाच आहे. त्यांना थोडंफार काम समजावून होत नाही तोच महेंद्रदादासुद्धा आले. त्यांनाही सभागृहात निटनिटकेपणे मांडलेल्या खुर्च्या पाहून बरं वाटलं. इतक्यात सुहासचा एस. एम. एस. आला की मेगा ब्लॉग मुळे ट्रेन्स उशीराने आणि कमी वेगात धावतायंत. थोड्या वेळापूर्वी कमी झालेला काळजीचा पारा पुन्हा वर चढला पण नाही! एक एक ब्लॉगर आत येताना दिसले आणि काळजी हळू हळू कमी कमी होत गेली.

इतक्या ब्लॉगर्सचं लेखन आपण वाचतो, कितीतरी वाचक आपल्याला प्रतिक्रिया देतात, वैयक्तिक ईमेल्स लिहितात, त्या सर्वांना भेटण्याचा उत्साह प्रत्येक ब्लॉगर आणि वाचकाच्या मनात काठोकाठ भरून असलेला दिसत होता. कित्येक ब्लॉगर्स एकमेकांना नुसतं नावाने ओळखत होते, फोटोही पाहिलेला नाही तर काही ब्लॉगर्सचे नुसतेच फोटो पाहिलेले, त्या सर्व ब्लॉगर्सनी एकमेकांना पाहिलं. ब-याच जणांना एकमेकांना पाहून आश्चर्याचे धक्के बसले. मीही त्यातली एक. कारण आल्हाद महाबळ या ब्लॉगरच्या एकूण लेखनशैलीवरून हे लेखक किमान पस्तीशीचे असावेत असा मी कयास बांधला होता आणि माझ्यासमोर उभा असलेला एक पोरगेलसा तरूण माझ्या सर्व कल्पनांना छेद देत होता. प्रत्येकाच्या चेहे-यावर असेच कौतुकमिश्रीत आश्चर्याचे, आनंदाचे, भाव उमटत होते. ब्लॉगर्स ज्या प्रकारे एकमेकांशी ओळखी करून घेत होते, ते पाहूनच हा मेळावा यशस्वी होणार याची खात्री वाटायला लागली.

वास्तविक भाषण बिषण करणं, हा माझा प्रांत नाही आणि आभार प्रदर्शनासाठी कार्यक्रम रंगात आला असताना कुणालाही केवळ भाषण ऐकण्यासाठी खोळंबून ठेवायचं, हे मला करायचं नव्हतं. म्हणून स्वागतपर प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन दोन्ही एकाच भाषणात उरकून टाकलं. खरंतर आभार प्रदर्शन हा एक उपचारच, नाहीतर आम्हाला ब्लॉगर्सकडून वेळोवेळी मिळालेले सल्ले सूचना यांच्यासाठी आभार, धन्यवाद असे शब्द खूप थिटे पडतात.

प्रत्येक ब्लॉगरने स्वत:ची ओळख करून देताना आपलं मनोगत व्यक्त केलं, त्यामुळे एक व्यक्ती म्हणून हे ब्लॉगर्स कसे आहेत, हे समजलं. काही ब्लॉगर्स आपल्या लेखनशैलीमुळे इतके प्रसिद्ध आहेत की ते व्यासपिठावर आले की समोर त्यांच्या नावाची चर्चा सुरू होत असे. सर्वात छोटा ब्लॉगर म्हणजे आर्यन केळकर याची ओळख त्याच्या आईने सौ. सोनाली केळकरने करून दिली तेव्हा सगळेच जण त्या मायलेकाकडे कौतुकाने पहात होते. छोटा ब्लॉगर मात्र महेंद्रदादांनी त्याचा चॉकलेट देऊन केलेल्या सत्कारावर खूप खूश होता.

आम्ही ब्लॉगींग का करतो, आम्हाला ब्लॉगींगमधून काय अपेक्षित आहे शिवाय आणखी कोणकोणत्या विषयांवर व का ब्लॉगींग केलं जावं, यावर प्रत्येक ब्लॉगरने मनमोकळेपणे आपलं मत मांडलं. राजा शिवाजी डॉट कॉम चे सर्वेसर्वा श्री. मिलिंद वेर्लेकर यांनीही आपल्या वेबसाईटचा परिचय करून दिला. त्यांचं काम आणि वेबसाईट्वर असलेलं ज्ञान अफाट आहे. राजा शिवाजी वाचकांसाठी खुली झाली की त्याची प्रचिती आपल्याला येईलच. प्रसन्न जोशी यांनी तर ब्लॉगवर लिहिण्यासाठी कितीतरी नवनवीन विषय उपलब्ध आहेत हे स्पष्ट करून सांगितलं. त्यावेळी ’स्टार माझा’ तर्फे भरवलेल्या ’ब्लॉग माझा’ स्पर्धेचा उल्लेख करून त्यांनी हे पटवून दिलं की स्पर्धेसाठी ज्या प्रकारच्या ब्लॉग्सची त्यांना अपेक्षा आहे, तसे अधिकाधिक ब्लॉग्स निर्माण व्हायला हवे आहेत. केवळ ब्लॉगची मांडणी चांगली असून चालत नाही, तर ब्लॉगवर आपण काय लिहितो आहोत, याचाही स्पर्धेच्या अनुषंगाने विचार केला जातो. शिवाय त्यांनी सर्व मराठी ब्लॉगर्सना आवाहन केलं की “मराठीचा हेका असण्यापेक्षा मराठीचा अभिमान बाळगून इतर भाषांमधील साहित्यदेखील आपल्या भाषांमधे आणता येईल का, या गोष्टीवरही मराठी ब्लॉगर्सनी विचार केला पाहिजे.”

मला स्वत:ला प्रसन्न जोशींचं म्हणणं पटलं. केवळ मराठीतील लेखनाचीच पुनरावृत्ती करून मराठी भाषा मोठी होणार नाही, तर इतर भाषांनाही जेव्हा ती स्वत:मधे सामावून घेईल, तेव्हा ती मोठी होईल असं मला देखील व्यक्तीश: वाटतं. मी कुठल्यातरी ब्लॉगवर प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं की “मराठीचा कड येणं ही केवळ एखाद्या राजकीय पक्षाची जबाबदारी नसून ती प्रत्येक मराठी माणसाची आहे”, पण याचा अर्थ आपण मराठी आहोत म्हणजे सर्वज्ञानी आहोत, असा कूपमंडूकासारखा विचार करण्यापेक्षा इतर भाशांमधून उपलब्ध असलेलं ज्ञान आपल्या मराठी भाषेत आणलं तर आपण कित्येक मराठी मन जोडू शकतो.

मात्र मला आभिमान आहे मराठी ब्लॉगर असल्याचा आणि या मराठी ब्लॉगर विश्वाची एक सदस्य असल्याचा. कोणत्याही प्रकारच्या फायद्याची अपेक्षा न करता, केवळ मातृभाषेवरील प्रेम आपल्याला मराठी भाषेत लिहायला प्रवृत्त करतं. हे प्रेम असंच कायम रहावं आणि या मराठी ब्लॉगर्स विश्वात नित्य नवीन मराठी ब्लॉगर्सची भर पडत जावी हीच देवी सरस्वतीचरणी प्रार्थना!

जरी मेळाव्यामधे कुठल्या गोष्टीची उणीव राहून नये म्हणून आम्ही प्रयत्न केले असले तरी दोन गोष्टींची उणिव मला स्वत:ला जाणवली. एक म्हणजे या वर्षी मुंबईत प्रचंड उकाडा आहे. मेळाव्याच्या दिवशी पंख्यांची हवा ब्लॉगर्सना कमी पडत होती. खासकरून मुंबईबाहेरच्या ब्लॉगर्सना मुंबईचा उकाडा असह्य झाला होता. त्यामुळे असं वाटून गेलं की हा मेळावा हिवाळ्यात भरवला असता तर आणखीनच रंगतदार झाला असता. दुसरी गोष्ट म्हणजे उपलब्ध असलेला माईक हा कॉडलेस नसल्यामुळे तो हवा तितका लांबवर फिरवता आला नाही, यामुळे ब-याच ज्येष्ठ व्यक्तींना आपल्या जागेवरून उठून माईकपर्यंत येण्यास त्रास होत होता. समस्त ब्लॉगर्सना झालेल्या या दोन गैरसोयीबद्दल मी दिलगीर आहे. पुढच्या वेळेस मेळावा भरवताना या उणिवाही रहाणार नाहीत, याची दक्षता घेईन.

अल्पोपहाराच्या बाबतीत मात्र सर्वच समाधानी दिसले. प्रत्येक ब्लॉगरकडून अल्पोपहाराबद्दल चांगलंच ऐकायला मिळालं. इतका चविष्ट मेनू पुरवल्याबद्दल मयूर कॅटरर्सचे मन:पूर्वक आभार. दुर्दैवाने अल्पोपहार दोन वेळा माझ्या पुढ्यात येऊनही मला तो चाखता आला नाही. ब्लॉगर्स आणि वाचकांच्या प्रश्नांची उत्तरं देता देता, आपल्यलाही थोडी खादाडी करायची आहे, हे मी विसरून गेले असा हा पहिलाच प्रसंग असावा. पण सर्वांच्या प्रेमाने मन इतकं तुडूंब भरून गेलं होतं की रिकाम्या पोटाची जाणीव घरी येईपर्यंत झालीच नाही.

ब्लॉगर मित्रांनो, असंच प्रेम ठेवा, असाच लोभ राहू द्या. असे मेळावे तर आपण वेळोवेळी आयोजित करणारच आहोत. पण त्या मेळाव्यामधे आणखी कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असायला हवा, याबद्दल तुमच्याकडूनही सूचना हव्या आहेत. अरे हो! फोटोंबद्दल सांगायचं राहिलंच नाही का? इथे टिचकी दिलीत तर तुम्हाला फोटोंची लिंक मिळेल. कुणीही डाऊनलोड करून घेऊ शकतं. काही ब्लॉगर्स आणि वाचकांनी माझ्याकडे उपस्थित व नोंदणी केलेल्या सर्व ब्लॉगर्सची नावं व ब्लॉगच्या नावांची यादी मागितली होती. ती मी एका स्वतंत्र पोस्ट मधे प्रसिद्ध करतेय.

हेरंब ओक याच्या उचक्यांचं सत्र या मेळाव्या दरम्यान सुरूच होतं. हा मेळावा संपता संपताना त्याच न्यू जर्सीहून फोन आला होता. जवळजवळ तासभर तरी तो सर्व ओळखीच्या ब्लॉगर्सशी गप्पा मारत होता. त्याला या मेळाव्याला येता आलं नाही म्हणून कुणीतरी त्याचा फोन स्पिकरवर टाकून तो स्पिकर माईकजवळ आणला होता. अशा त-हेने आपल्या वटवट कंसवान हे.ओ. ने मेळाव्यामधे अप्रत्यक्षरित्या का होईना पण सहभाग घेतलाच. शिवाय अपर्णा लळींगकर हीने मेळावा सुरू होण्याआधी थेट बंगळूरहून फोन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या.

पुढचा मेळावा कुठे आणि कसा भरवावा याबाबत तुमचे सल्ले खालच्या फॉर्ममधे अवश्य लिहून पाठवा.