Wednesday, April 21, 2010

नेहरू सायन्स सेंटर - वैज्ञानिक चमत्कारांची खाण

प्रतिक्रिया: 
आठवीत की नववीत असताना कधीतरी पाहिलेलं सायन्स सेंटर, मनामधे एक वेगळीच जागा निर्माण करून गेलं होतं. निरनिराळ्या उपकरणांच्या माध्यमातून शिकवलेलं सामान्य विज्ञान, स्वर, स्पर्श यांच्या अनुभवाची प्रात्याक्षिकं करून पहाताना तीन तास कसे निघून गेले ते कळलंच नाही. बाहेर आल्यावर आपण इतका वेळ एक वेगळ्याच विश्वात वावरत होतो असं वाटायला लागलं. तिथे पुन्हा जाण्याची वारंवार इच्छा व्हायची पण कालपर्यंत ते कधी जमलं नाही. काल मात्र तडकाफडकी मी सायन्स सेंटरला जायचं ठरवलं आणि मला पुन्हा एकदा तोच वेगळ्या विश्वात गेल्याचा अनुभव आला.

खाली मी काही फोटो टाकले आहेत, त्यातील कुठल्याही फोटोवर क्लिक केलंत तर फोटो मोठया आकारात पहायला मिळेल.केवळ शाळकरी मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांनाही माहित नसलेल्या कितीतरी वैज्ञानिक गोष्टी या सायन्स सेंटरमधे पहायला मिळतात. म्हणूनच असेल कदाचित ही लहान मोठी वैज्ञानिक उपकरणं हाताळताना लहान मुलांइतकीच मोठ्या माणसांचीही उत्सुकता ओसंडून वहात होती. वरवर पहाता सामान्य वाटणा-या गोष्टींमधे दडलेलं वैज्ञानिक सत्य उलगडून पहाताना मोठेही लहान झाल्यासारखेच वाटत होते.विविध वैज्ञानिक चमत्कारांचा खजिना आहे, हे सायन्स सेंटर म्हणजे. आता हेच पहा ना, या खालच्या चित्रात माझा फोटो दिसतोय तुम्हाला? माझ्यामागे काही विविध संगीत वाद्य ठेवलेली दिसतायंत? ती खरीखुरी नाहीतच मुळी! ती आहे आभासी वास्तविकता.
सायन्स सेंटरमधे या प्रयोगासाठी एक छोटीशी रूम बनवली आहे. ही रूम रिकामी आहे. तिथे आत गेलं की समोर एक दूरचित्रवाणी संच लावलेला असतो. त्यात तुम्हाला स्वत:चं आरशात जसं प्रतिबिंब पडतं, तसं प्रतिबिंब दिसतं आणि आजूबाजूला ही संगीत वाद्य. रूमच्या बाहेरून कुणी पाहिलं तर बघणा-याला वाटेल की आपण वेड्यासारखे हातवारे करतोय पण प्रत्यक्षात तुम्ही त्या संगीत वाद्यांपैकी कुठल्यातरी वाद्याला हात लावत असता. या प्रकाराबद्दल खूप रोचक माहिती तिथे लिहून ठेवली आहे. मी त्याचाच फोटो काढला. या खालच्या चित्रावर टिचकी दिलीत तर एक मोठा फोटो उघडेल. त्यात या आभासी वास्तविकतेचा उपयोग कशाकशासाठी होऊ शकतो, याची माहिती दिली आहे.केवळ संगीत उपकरणंच नव्हेत, तर आपल्या रोज ज्या भाज्या, झाडं पहातो, ती कशी उगवतात, म्हणजे कंदभाज्या, फळभाज्या यातील फरक जाणून घेण्यासाठी तिथे असा देखावा करण्यात आला आहे. तुम्ही काचेसमोर उभे राहिलात की हाताजवळच बटणं सापडतील. बाजूला निरनिराळ्या भाज्यांची चित्रं आहेत. तुम्ही ज्या भाजीच्या चित्राचं बटण दाबल, ती भाजी कशी उगवते याचं तुम्हाला छोटंसं प्रात्याक्षिक पहायला मिळतं.उदा. कांदे, मुळा या भाज्या जमिनीखाली उगवतात. जर तुम्ही मुळ्याच्या बाजूचं बटण दाबलत तर जमिनितून मुळा वर येताना दिसतो.अशा छोट्या छोट्या प्रात्याक्षिकांतून लहान मुलांना सामान्यज्ञान तर मिळतंच पण प्रात्याक्षिकामुळे ही माहिती कायमची स्मरणात रहाते. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचं ज्ञान जगात जास्त उपयोगी पडतं, असं म्हणतात. आपल्याकडच्या शिक्षणपद्धतीमधे बदल हवा अशी मागणी होत असताना, या सायन्स सेंटरमधील काही छोट्या छोट्या लो बजेट प्रात्याक्षिकांसाठी प्रत्येक शाळेने आपल्या प्रयोगशाळेतही खास जागा ठेवावी असं मला वाटतं. सायन्स सेंटरमधेसुद्धा काही दुरूस्तींची गरज आहे असं वाटतं. काही उपकरणांची बटणं चालत नाहीत. त्यामुळे तो नेमका काय प्रयोग आहे, हे कळलं नाही. शिवाय तिथल्या प्रसाधनगृहातील उग्र दर्प मंदपणे संपूर्ण सेंटरभर दरवळत होता, त्यामुळे बाजूच्या कॅफेटेरियामधे काही खावंसं वाटलं नाही.

सायन्स सेंटरला गेले पण ओडेसी शो काही पहाता आला नाही. पुढच्या वेळेस नक्की पहाण्याचा मानस आहे. सेंटरमधे बरीच लहान मुलं एका बसमधून आली होती. ती शाळेची सहल वाटत नव्हती. प्रायव्हेट सहल असावी कारण मुलांसोबत त्यांचे आईवडीलही होते. सर्व कानडी वाटत होते. मी सेंटरमधून बाहेर पडल्यावर त्यांच्यापैकी एक दोन पालकांना बाहेरच्या जिन्यावर बसलेलं पाहिलं. त्यांच्यापैकी एका महिलेने मला कानडीत काहीतरी विचारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या एकूण अवतार पाहून मी त्यांच्याकडे आधी दुर्लक्श केलं पण त्या महिलेचा चेहेरा पाहून लक्षात आलं की ही भाषेची अडचण आहे. मग मी पुन्हा तिला विचारलं की काय हवंय? तेव्हा तिने खुणा विचारलं की हे सेंटर किती वाजता बंद होईल? तिचा मुलगा की मुलगी केव्हापासून आत आहे, बाहेर यायचं नावच घेत नाही. मग मीसुद्धा तिला खुणा करून सांगितलं की सेंटर सहा वाजता बंद होईल, तेव्हा सर्व बाहेर येतीलच. तुम्ही दरवाजाजवळ उभ्या रहा म्हणजे तुमच्या मुलाला तुम्ही पटकन गाठू शकाल. तिला ते समजलं असावं कारण ती तोंडभरून हसली. मनात आलं की जेव्हा भाषा नव्हती, तेव्हा माणूस एकमेकांशी खुणेच्याच भाषेत बोलायचा. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मनुष्याने आधी खुणांची भाषा आणि मग निरनिराळ्या भाषा शोधून काढल्या हाही एक वैज्ञानिक चमत्कारच नाही का?

ब-याच जणांचा गैरसमज होतो की नेहरू सायन्स सेंटर म्हणजे वरळीला नेहरू तारांगणाच्या बाजूला असलेली उंच गोल पांढरी इमारत. माझाही असाच गैरसमज झाला होता, त्यामुळे आधी तिथे गेले पण नंतर कळले की ते नेहरू सेंटर आहे, जिथे नेहरूंचा जीवनपट छायाचित्रांच्या स्वरूपात पहायला मिळतो. ते एक म्युझियम आहे. जिथे भारताच्या प्राचीन संस्कृती आणि इतिहासाची सविस्तर वर्णने पहायला मिळतात. सर्व माहिती इंग्रजी व हिंदी मधे लेखी सुद्धा आहे. मी ते म्युझियमही पाहून आले. मी ज्या सायन्स सेंटरबद्दल लिहिलं आहे, ते नेहरू विज्ञान केंद्र हे महालक्ष्मी स्टेशनच्या अलिकडे, डॉ. इ. मोझेस रोडवर, गांधी नगरच्या जवळ आहे.

20 comments:

 1. वाह कांचन, लय धम्माल केलीस म्हणजे :)
  मी नाही गेलो खरच तिथे, पण तुझ्यामुळे माझा साइन्स सेंटरच्या बिल्डिंगचा पत्ता तरी कळला, नाही तर मी ती गोल इमारतच मानायचो साइन्स सेंटर..धन्यू :)

  ReplyDelete
 2. हेहे मलाही असच वाटायच. आता जाऊन येतो. रविवारी असत का उघड.

  ताई धन्स.

  ReplyDelete
 3. सुहास,
  मला कित्येक वर्षं हा गैरसमज होता. काल मी तिकडे जवळजवळ वीस वर्षांनी गेले, सगळे संदर्भ सुरूवातीला चुकतच होते पण आत गेल्यावर बरोबर लक्षात आलं.

  सचिन,
  सायन्स सेंटर सर्व रविवारी सुरू असतं.

  ReplyDelete
 4. कांचन ताय चांगली मजा केली हाय....फोटू पण मस्त आहेत!!

  ReplyDelete
 5. मनमौजी,
  हो ना! माझा तर पाय निघत नव्हता तिथून पण भूक लागली होती नि तिथे खाता येत नव्हतं म्हणून बाहेर पडले.

  ReplyDelete
 6. मुंबईचं माहित नाही, पण कोलकात्याला सायंस सिटी पाहीली होती, खुप मस्त होती ती पण... मुंबईला नेहरु सायंस सेंटरला जरुर भेट देईन...

  ReplyDelete
 7. मस्त पोस्ट कांचन...
  नेहरु सायन्स सेंटरला आम्ही सगळे मावस बहीण-भाउ मिळुन जायचो. जुनी विमानं, रेल्वे इंजिन ठेवलेले आहेत त्यात चढायचो. तिथल्या गार्डन मधे पाणी भरणाऱ्या बायकांचे दोन पुतळे एकमेकांपासुन बऱ्याच अंतरावर ठेवलेले आहेत. एकीच्या तोंडातुन बोललं कि दुसरीच्या कानातुन ऎकु येतं. खुपश्या मुंबईकरांना या सेंटरबद्दल माहित नाही याचं वाईट वाटतं.

  ReplyDelete
 8. कांचन,
  इतके वर्ष मुंबईत आहोत पण कधि सायन्स सेंटर पहायचा योग आला नाही. तु काढलेले फोटो पाहून उत्सुकता वाढली आहे. माहिती मस्त दिली आहेस.

  ReplyDelete
 9. amhi lahan aslya pasun Parel la maushi kade aalo ki Science center la sagali mawas bhawanda ha plan tharalela...Science center chya baherchi baag pan awadichi hoti..tithe kahi jhade pranyasarkhi kapali aahet pan fakt eka golatun pahile kich ti purna distat nahi tar wegle wegle tukade te pan mast aahe ani mukhya center tar kai mastach aahe...pan last mi tithe mostly 2000 madhe gele tevha awastha barich kharab watali...hya weli bhacharanna gheun jaiin jamala tar....

  ReplyDelete
 10. तू दिलेले फोटो पाहून मला आधी वाटलं तू कलकत्त्यात येऊन गेलीस की काय? कारण इथं बिर्ला सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क आहे आणि अगदी अशीच रचना आहे. अनेक जुन्या-नव्या गोष्टी (विमानं-इंजिनंवगैरेसहीत) तिथं ठेवल्या आहेत. शिवाय अलिकडं सायन्स सिटी झालंय ते वेगळं. पण तिथं जुन्या antique वस्तू नाहीत.

  विवेक.

  ReplyDelete
 11. आनंद,
  आत्ताच विवेकच्या कमेंटमुळे कळलं की कोलकत्यालाही सायन्स सिटी आहे. मुंबईचं सायन्स सेंटर १९८५ साली सुरू झालंय. कोलकत्यात केव्हा सुरू झालंय माहित नाही.

  गजानन,
  सायन्स सेंटरच्या आवारात पाय ठेवल्यापासूनच सगळे चमत्कार सुरू होतात. मला तर इतक्या वर्षांनी तिथे जायला मिळालं तर सर्व प्रयोग करून पहावेसे वाटत होते.

  सोनाली,
  खरंच एकदा जाऊन पहा. खूप आवडेल तुला. अगदी आर्यनलाही मज्जा वाटेल, अशा काही गंमती आहेत तिथे. कधी खूप वेळ असला नि काही काम नसलं तर अशा ठिकाणी जायचं. रिकामा वेळ सत्कारणी लागतो.

  अपर्णा,
  तो गोल तिथे अजूनही आहे. बागेतली झाडं म्हण किंवा पुतळे म्हण, पहाताना नुसताच शो वाटतं पण नंतर त्यातली खरी गोम कळते.

  विवेक,
  कोलकत्यालाही असा चमत्कार आहे हे माहित नव्हतं. कधी जर वेळ आलीच कोलकत्याला जायची तर या सायन्स सिटीला मी अवश्य भेट देईन. मुंबईच्या सायन्स सेंटरमधे जुन्या वस्तू नाहीत, जुनं तंत्र मात्र उपलब्ध आहे.

  ReplyDelete
 12. Wachun bhet dyawishi watat ahe.
  Ani he wachun mala Bangalore la alsela "Vishweshwaraiya Museum" athavla. Gelya 2.5 warshan madhye me 3 wela pahilela ahe. Ithe sudha khup baghnya sarkhe ahe. Bangalore la alis tar ya museum la nakki bhet de, tula khup awdel.

  ReplyDelete
 13. केदार, तुझ्यामुळे बंगालूरच्या म्युझियमची माहिती मिळाली. कधी तिकडे गेले तर अवश्य भेट देईन. मला अशा ठिकाणी जायला आवडतं.

  ReplyDelete
 14. kanchan ji neharu centar chi mahiti chan dili aahe.mumbai laa aalyaa nantar aawarjun pahile pahije ase thikaan aahe .mothyaa naach nahi tar lahaan mulaachyaa pan sopyaa bhashet mahiti milel .chan lekh vaachun khup mahiti milali .asech pudhe hi mahiti del chalaa .tumhi kamat busy asun sudhaa itaki chan mahiti golaa karun aamhaa vachakan pudhe chan ritine madalit tyaa baddal aaple shatshaha aabhar.

  ReplyDelete
 15. अमृत,
  कामं तर रोजचीच असतात पण असा निखळ आनंद वाट्याला आला, तर तो आपल्या मित्रपरिवारासोबत वाटून घ्यावा, असं प्रत्येकालाच वाटतं. हे सायन्स सेंटर अबालवृद्धांना आवडेल असंच आहे. मुंबईमधे पहाण्यासारखं जे काही आहे, त्यात या सायन्स सेंटरची नोंद होईल. आत गेल्यावर तास - दीड तास कसा पसार होतो हे कळतच नाही. शिवाय ऑडेसी शो आहेच.

  ReplyDelete
 16. मजा आहे... आम्हालाही कधी हे पाहण्याचा योग यावा! ;)

  ***********************************
  सुचना: हबल दूर्बिणीला २० वर्षे पूर्ण होतायेत, तेव्हा नेहरू प्लॅनेटेरिअम, मुंबई येथील "हॉल ऑफ क्वेस्ट" मध्ये हबल संबंधित २ डॉक्युमेण्ट्री फिल्म्स ESA (युरोपिअन स्पेस एजन्सी) च्या वतीने उद्या म्हणजेच दिनांक २४ एप्रिल, २०१० रोजी सकाळी ११.३० वाजता दाखविण्यात येणार आहे!

  ***********************************

  - विशल्या!

  ReplyDelete
 17. विशल्या,
  मुंबईला आलास की पहाशीलच. ते हबल दुर्बिणीचं माहित आहे पण तारांगणला एक आठवडा आधी शो बुक करून ठेवावा लागतो.

  ReplyDelete
 18. ह्म्म नक्कीच पाहीन, उत्सुकता आहे...

  ReplyDelete
 19. धन्यवाद विशाल.
  धन्यवाद, विवेक.

  ReplyDelete