Monday, April 19, 2010

सरोगेट अॅडव्हर्टायझिंग

प्रतिक्रिया: 
सरोगेट मदर हे शब्द ज्यांनी ऐकले असतील त्यांना सरोगेट अॅडव्हर्टायझिंग म्हणजे काय, याचा नक्की अंदाज आला असणार. सरोगेट मदर म्हणजे काय तर गर्भाशय भाड्याने देणं. सरोगेट अॅडव्हर्टायझिंगचा प्रकारही थोडासा तसाच आहे. बाजारात काही उत्पादनं अशी असतात, ज्यांची विक्री होऊ शकते पण त्यांच्या सार्वजनिक जाहिराती करण्यासाठी कायद्याने बंदी असते. उदाहरणार्थ मद्य, सिगारेट इ. अशा उत्पादनांसाठी कंपनी सरोगेट अॅडव्हर्टायझिंग या मार्गाचा अवलंब करते. निराळ्या शब्दांत सांगायचं तर आपल्या विशिष्ट उत्पादनाची थेट जाहिरात न करता, त्या उत्पादनाच्या वेष्टनाच्या रंगांशी किंवा नावाशी मिळत्याजुळत्या आपल्या दुस-याच उत्पादनाची जाहिरात करणे, हा प्रकार सरोगेट अॅडव्हर्टायझिंग म्हणून ओळखला जातो.

अजय देवगणची बॅगपाईपर सोडाची ही जाहिरात पाहिली आहे कधी? हा आहे सरोगेट अॅडव्हर्टायझिंगचाच एक प्रकार. या जाहिरातीमधे "खूब जमेगा रंग, जम मिल बैठेंगे तीन यार. आप, मै और बॅगपाईपर.... " आणि मग हळूच हसत "सोडा!" असं म्हणताना अजय देवणगला खरोखरंच बॅगपाईपर सोडा अभिप्रेत आहे की बॅगपाईपरचं निराळंच उत्पादन, हे सुज्ञ आणि जाणकार व्यक्तींना लगेच कळतं. आता या जाहिरातीत पहा. ’वैकिट्टेन्था परिपाडी" असं म्हणत हा दाक्षिणात्य नट वेफर्सची जाहिरात करतो आहे पण ’ओरिजिनल चॉईस’ असं नाव असलेले वेफर्स बाजारात किती प्रमाणात उपलब्ध आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.
अशा प्रकारच्या जाहिराती म्हणजे एका दगडात दोन पक्षीच म्हटलं पाहिजे. उत्पादन काय आहे, हे ग्राहकाला माहित असल्यामुळे ग्राहक जाहिरात पहाताच उत्पादन विकत घेण्यास प्रवृत्त होतो शिवाय कोणत्याही नियमाचा भंग न करता ग्राहकापर्यंत उत्पादनाची जाहिरात पोहोचवता येते. सरोगेट अॅडव्हर्टाइजेस फक्त मद्य किंवा सिगारेट यांच्याच असतात असं नव्हे, तर काही औषधांच्या जाहिरातीही सरोगेट अॅडव्हर्टायझिंगमधे येऊ शकतात. मात्र ग्राहकाला जर कंपनीच्या सर्व उत्पादनांची माहिती नसेल, तर अशा जाहिरातींमुळे कधीकधी गैरसमज निर्माण होण्याचीही शक्यता असते.

काही पान मसाले, सिगरेट, मद्य यांच्या जाहिरातींना कायद्याने बंदी असल्याने त्यांना सरोगेट अॅडव्हर्टायझिंगशिवाय पर्याय नाही. शिवाय या कंपन्या आपल्या मूळ उत्पादनासाठी ज्या निराळ्या उत्पादनाचा आधार घेतात, त्या उत्पादनाचीही त्यांना थोडीफार निर्मिती करावी लागते. मात्र या जाहिराती बनवताना काळजीपूर्वक बनवाव्या लागतात. एखाद्या वाक्यामुळे, अगदी एखाद्या शब्दामुळेही जर मूळ उत्पादन या जाहिरातींमधे आलं तर या जाहिरातींवर बंदी येऊ शकते. क्वचित प्रसंगी त्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येते.

असं म्हणतात की एक कायदा निघाला की त्यापासून वाचण्यासाठी हजार पळवाटा तयार होतात. दुस-याच्या खांद्यावर आपली बंदूक ठेवून लक्ष्यभेद करण्यासाठी सरोगेट अॅडव्हर्टायझिंग हा प्रकार सर्रास वापरला जात असला तरी या जाहिरातींकडे कायद्याचं बारीक लक्ष असतं. शेवटी जी उत्पादनं मनुष्यजीवीताला हानी पोहोचवू शकतात, त्यांचीच अप्रत्यक्ष जाहिरात या अॅडव्हर्टायझिंगमधून होत असते.

11 comments:

 1. अरे वा.. मस्तच माहिती दिलीत... तरी मी म्हणत होतो.. हे दारु वगैरेच्या जाहिरातीत अशा का दाखवतात... आता कळालं!

  ReplyDelete
 2. या प्रकाराला सरोगेट अॅडव्हर्टायझिंग म्हणतात हे माहीत नव्हतं. पण या प्रकाराला आळा बसु शकत नाही, कारण हे कायद्याच्या चौकटीतच येतं.

  ReplyDelete
 3. हि ट्रिक तर माहित होती पण त्याचं नाव आता कळलं....

  ReplyDelete
 4. छान माहिती आहे. दारूची जाहिरात करता येत नाही, मग त्या सारखी दिसणारी किंवा त्या नावाच्या सोड्याची जाहिरात करा. हे म्हणजे मी तुला मारल्या सारखं करतो, तू रडल्या सारखं कर.. असा प्रकार आहे.

  रशियन सिक्रसी म्हणतात अशा प्रकाराला :)

  ReplyDelete
 5. दिपक,
  दारूची जाहिरात करायला कायद्याने बंदी आहे. त्यामुळे या मार्गाने ती जाहिरात केली जाते. पूर्वी मलाही हा प्रकार कळायचा नाही.

  आनंद पत्रे,
  कायद्याच्या चौकटीत राहून अशा जाहिराती दाखवल्या तर कुणी काहीच करू शकणार नाही.

  आनंद,
  ही ट्रिकच आहे आणि अतिशय यशस्वीरित्या वापरली जातेय. या प्रकाराला सरोगेट अॅडव्हर्टायझिंग हे नाव मला सार्थ वाटतं.

  महेंद्रदादा,
  मुळात दारू बनवणारे सोडासुद्धा बनवतातच त्याशिवाय त्यांना अशा जाहिराती बनवता येणारच नाहीत. खरं तर जिथे सरकारने जाहिरात न करता दारू, सिगारेट विक्रिला परवानगी दिली आहे, यातच काय ते आलं. अशी उत्पादनं जाहिरात न करता सुद्धा चालतात

  ReplyDelete
 6. छान माहिती आहे. या प्रकाराला सरोगेट अ‍ॅडव्हर्टायझिंग म्हणतात हे माहित नव्हतं.

  ReplyDelete
 7. kanchan, very nice info! Didn't know it was called surrogate advt. Thanks! :)

  ReplyDelete
 8. चांगल निरीक्षण आहे तुमच...खरच एक कायदा निघाला की त्यापासून वाचण्यासाठी हजार पळवाटा तयार होतात

  ReplyDelete
 9. हेरंब,
  मलाही माहित नव्हतं. नव-याशी या विषयावर बोलताना त्याच्याकडून नाव समजलं.

  अरुंधती,
  पहिल्यांदा जेव्हा हे नाव ऐकलं, तेव्हाच लक्षात आलं की या नावाचा अर्थ काय असू शकतो. मग थोडं गूगल सर्चसुद्धा केलं.

  देवेंद्र,
  आपल्याकडे इतक्या गोष्टींसाठी कायदा तोडून मोडून वापरला जातो की सरोगेट अॅडव्हर्टायझिंग हा प्रकार त्यामानाने खूप सौम्य वाटावा.

  ReplyDelete
 10. धन्यवाद. यूट्यूबवर या नावाने सर्च केलात तरी बरेच व्हिडिओ सापडतील पहाण्यासाठी.

  ReplyDelete