Tuesday, April 13, 2010

इंटरनेटसोबत माझा पहिला दिवस

प्रतिक्रिया: 
इंटरनेट या गोष्टीबद्दल मी पहिल्यांदा ऐकलं ते वर्तमानपत्रातील एका विचित्र बातमीमुळे. पूजा भट्ट...काय म्हणता? तुम्हाला आठवत नाही ही नटी?.. अहो ती नाही का, जिला बरेच चांगले चांगले चित्रपट आणि हिरोही मिळाले पण एकाही चित्रपटात तिने अभिनय कश्शाशी म्हणून खाल्ला नाही, तीच ती. महेश भट्टांची कन्यका... तर पूजा भट आणि तत्सम समकालीन नट्यांचे (?!) चेहेरे आणि पाश्चिमात्य मॉडेल्सचं शरीर यांच्या फोटोंचं बेमालूम मॉर्फिंग करून, नवे फोटो इंटरनेटच्या एका साईटवर टाकण्यात आले होते. ती बातमी वर्तमानपत्रात छापून आली तेव्हा इंटरनेटची भारताला नुकतीच ओळख होत होती.

वर्तमानपत्रातून त्या दिवशी इंटरनेटबद्द्ल जे काही वाचलं त्यामुळे हे कळलं की या गोष्टीचा चांगल्या गोष्टींसाठीही उपयोग होऊ शकतो पण हे प्रकरण जरा महागातलं आहे. टेलीफोन, कॉम्प्युटर, ए.सी. आणखीही ब-याच महागड्या साधनांची याला गरज असते. तेव्हा इंटरनेट आपला गाव न्हाई सखे, हे तर शिरिमंताचे खेळ, असं म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण मी बारावीची परिक्षा दिल्यानंतर इंटरनेट म्हणजे नेमकं काय, त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात कसा होऊ शकतो, या विषयांवरच्या एका चर्चासत्राला गेले होते. तिथे इंटरनेटची जितकी माहिती सांगितली गेली, त्यावरून एक लक्षात आलं की हे इंटरनेट लवकरच आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनणार आहे.

इंटरनेटचा वापर कसा आणि कुठे करावा याबद्दल जी काही त्रोटक माहिती मिळाली होती, त्याच्या आधारावर एका सायबर कॅफे मधे गेले. ’एका तासाचे पन्नास रूपये’ असा बोर्ड आत शिरल्या शिरल्या वाचायला मिळाला. पन्नास रूपये घालवण्याच्या कल्पनेने मला घाम फुटला होता. त्या काळी एका तासाला पन्नास रूपये घालवण्याची चैन माझ्या पर्सला परवडण्यासारखी नव्हती. माझी पन्नास रूपयांची नोट ज्या पर्समधे होती, ती पर्सच तेव्हा मी पन्नास रूपयांना विकत घेतलेली होती. पण इंटरनेट जाणून घेण्याची उर्मी काही स्वस्थ बसू देत नव्हती, शिवाय आतल्या ए.सी. च्या गारव्याने त्या घामाची नावनिशाणी पार पुसून टाकली होती.

एका काचेच्या दारामागून एका मुलाने बाहेर येऊन सांगितलं की अर्धा तास थांबावं लागेल. माझी त्यालाही तयारी होती पण इथेच गडबड झाली. बाहेर माझ्यासारखेच बरेच जण वाट बघत बसले होते. आतला गारवा, कॉम्प्युटरवरच्या स्पिकर्सवर वाजणारं मंद संगीत, रूम फ्रेशनरचा सुगंध या सगळ्याने मला जाम नर्व्हस व्हायला झालं आणि माझा असा गैरसमज झाला की बहुधा ’एका तासाचे पन्नास रूपये’ म्हणजे ’वेटींग पिरियड’सुद्धा त्यातच धरला जात असणार. "अरे बापरे! मला तर अर्धा तास थांबायचंय. म्हणजे वाट बघायचे पंचवीस रूपये आणि आत जाऊन ’इंटरनेट बघायचे पंचवीस रूपये?? हे त्या सेमिनारमधे सांगितलं नव्हतं." माझ्या उत्साहाचा पारा एका क्षणात खाली आला. फुकट वाट बघण्याचे पैसे कशाला द्यायचे, असा विचार करून मी तिथून सटकायचा निर्णय घेतला पण माझ्या आजूबाजूला बरीच गर्दी होती. बाहेर पडताना कुणी पाहिलं आणि आता जाऊन त्या मुलाला सांगितलं की ही पैसे न देताच गेली म्हणून तर? आता काय करावं? मग मी एक शक्कल लढवली. "एक्सक्यूज मी..." मी माझ्या बाजूच्याच मुलाला म्हटलं. "मला एक महत्त्वाचा फोन करायचाय. त्या मुलाने बाहेर येऊन माझ्याबद्दल विचारलं ना, तर सांगा की बाहेरच फोन करायला गेली आहे." त्या मुलाने याच्यावर होकारार्थी मान डोलावली आणि मी तिथून पळ काढला. या गोष्टीनंतर तब्बल तीन महीने मी इंटरनेट या गोष्टीचं नाव काढलं नाही. नंतर जेव्हा कळलं की सायबर कॅफेमधे गेलं तर वाट बघण्याचे पैसे द्यायचे नसतात, तेव्हा इंटरनेट शिकण्याचा माझा हुरूप वाढला, हे सांगायला नकोच.

25 comments:

 1. चांगली होती कल्पना...सटकायची !

  ReplyDelete
 2. हे..हे.. वेटींग चार्जेस. हा लेख क्रमशः आहे का ?
  पुर्ण नाही वाटत आहे.
  मला सुद्धा इंटरनेटची माहिती चांगल्या गोष्टी करिता नाही तर तश्या साईट्स साठी मित्रांकडुन झाली, तेंव्हा तासाचे २० रु. लागायचे.

  ReplyDelete
 3. THE PROPHET,
  धन्यवाद, त्यावेळेला दुसरं काही सुचलं नाही हो.


  आनंद पत्रे
  तशा साईटसच्या प्रसिद्धीमुळेच इंटरनेटला जास्त प्रसिद्धी मिळाली, हे खरं आहे, शिवाय नेट बदनाम झालं, गैरसमजही पसरले. लेखाचा दुसरा भाग लिहायचाय पण अजून काही ठरवलेलं नाही, म्हणून क्रमश: टाकलं नाही.

  ReplyDelete
 4. खूपच गमतीशीर किस्सा आहे. मी ऑनलाईनच होतो त्यामुळं लगेच कॉमेंट देतोय. म्हणजे बघ (चालेल ना??) तासाला ५० रुपये भरण्यापासून ते कायम ऑनलाईन पडिक (कोल्हापुरी शब्द) असण्यापर्यंत आपण प्रगती केलीय!

  बाकी असा घाम फुटण्याचा अनुभव जेंव्हा जेंव्हा बदललेल्या लाईफस्टाईलला सामोरं गेलोय तेंव्हा तेंव्हा आलाय. मॉल, शॉपिंग सेंटर्स, मॅक्डोनाल्ड/डॉमिनोज, विविध चकचकीत कार्यालयं, आणि तिथली अस्पष्ट उच्चारांत इंग्लिश बोलणारी मुलं-मुली जेंव्हा पहिल्यांदाच अनुभवली तेंव्हा बर्‍याचदा uncomfortable वाटायचं. आता सवय झालीये. आणि आपलं इंग्लिश खूपच चांगलं आहे हेही कळलंय(!)

  बर्‍याच वर्षांपूर्वी आम्ही दोघं पुण्यात एका नविनच झालेल्या पिझ्झा हाऊसमध्ये जाऊन बसलो होतो. रेट कार्ड बघून घाम फुटला आणि काय करायचं असा विचार करत शेवटी तसेच बाहेर आलो. आता अशा गोष्टी आठवल्या की स्वतःवरच हसू येतं.

  आणि त्या सुरुवातीच्या दिवसांत एक तास नेटवर बसण्यासाठी दोन-दोन तास थांबून वेळ वाया घालवण्याचा उद्योग मीही कोल्हापुरात केलेला होता.

  विवेक.

  ReplyDelete
 5. कांचन,

  कॉमेंट पोस्ट केल्यावर इथं का दिसत नाही? त्यामुळं पुन्हा पोस्ट करतोय.  खूपच गमतीशीर किस्सा आहे. मी ऑनलाईनच होतो त्यामुळं लगेच कॉमेंट देतोय. म्हणजे बघ (चालेल ना??) तासाला ५० रुपये भरण्यापासून ते कायम ऑनलाईन पडिक (कोल्हापुरी शब्द) असण्यापर्यंत आपण प्रगती केलीय!

  बाकी असा घाम फुटण्याचा अनुभव जेंव्हा जेंव्हा बदललेल्या लाईफस्टाईलला सामोरं गेलोय तेंव्हा तेंव्हा आलाय. मॉल, शॉपिंग सेंटर्स, मॅक्डोनाल्ड/डॉमिनोज, विविध चकचकीत कार्यालयं, आणि तिथली अस्पष्ट उच्चारांत इंग्लिश बोलणारी मुलं-मुली जेंव्हा पहिल्यांदाच अनुभवली तेंव्हा बर्‍याचदा uncomfortable वाटायचं. आता सवय झालीये. आणि आपलं इंग्लिश खूपच चांगलं आहे हेही कळलंय(!)

  बर्‍याच वर्षांपूर्वी आम्ही दोघं पुण्यात एका नविनच झालेल्या पिझ्झा हाऊसमध्ये जाऊन बसलो होतो. रेट कार्ड बघून घाम फुटला आणि काय करायचं असा विचार करत शेवटी तसेच बाहेर आलो. आता अशा गोष्टी आठवल्या की स्वतःवरच हसू येतं.

  आणि त्या सुरुवातीच्या दिवसांत एक तास नेटवर बसण्यासाठी दोन-दोन तास थांबून वेळ वाया घालवण्याचा उद्योग मीही कोल्हापुरात केलेला होता.

  विवेक.

  ReplyDelete
 6. Vivek,
  पडिक! हो, नेटवर अगदी पडीक असेपर्यंत आता प्रगती झाली आहे. सुरुवातीला सायबर कॅफे कमी आणि नेटचं भाडं प्रचंड यामुळे दोन दोन तास थांबणं योग्य वाटत असे. आता दहा रूपये ताशी भाडं असलं तरी आत्यंतिक गरज असल्याशिवाय कुणी सा.कॅ. मधे जात नाही. माझं इंग्लिश चांगलं आहे, हे सांगणारं तुम्हाला कोण भेटलं? पिझ्झा, बर्गर असली चैन तर नोकरी करत असतानासुद्धा परवडत नव्हती. एकदा अशी चैन केली की दोन महीने बाकी चैन करणं जमत नसे. मलाही आता जुने दिवस आठवले की स्वत:चंच हसायला येतं.

  इथे प्रतिक्रिया दिली तर ती नियंत्रणप्रतिक्षेत जाते. तुम्ही प्रतिक्रिया दिलीत तेव्हा सुदैवाने मी ऑनलाईन होते म्हणून चटकन प्रसिद्ध करून टाकली.

  ReplyDelete
 7. फार छान युक्‍ती लढवलीस तू. कदाचीत मला असं सुचलं नसतं.

  ReplyDelete
 8. वाचताना खूप हसायला आले. मी पण अगदी पैसे साठवून सायबर कॅफेमध्ये मेल चेक करायला जायचे, एकही मेल नसायचे मेलबॉक्समध्ये, तेव्हा मित्र मैत्रिणी पण नेटसॅव्ही नव्हत्या त्यामुळे कोण मेल पाठवणार. पण आपल्याला इंटरनेट वापरता येते याचीच मजा वाटायची. आता आठवले तरी हसायला येते.

  ReplyDelete
 9. बरेचदा नवीन गोष्टी बद्दल असेच होत असते आपले. अनुभव मस्त होता मजा आली वाचायला.....

  ReplyDelete
 10. हे हे ’इंटरनेट बघायचे पंचवीस रूपये?? जम हसायला आले मला परंतु परिस्थती काहीशी अशीच होते नवीन माणसाची स्वानुभवावरून सांगत आहे ;)
  बाकी पहिला दिवस मस्त लिहिला आहेस
  असेच इंटरनेट चे काही किस्से असलेतर टाक ना इथे

  ReplyDelete
 11. बाप रे तायडे... तासाचे पन्नास रुपये असून बी तुला नेटचा मोह आवरला नाही म्हणजे कमालच आहे!! अनुभव एकदम मस्त आहे तुझा.. तेव्हा नेटसाठी एवढी तडफडत होतीस, आता त्याच नेटवर स्वतःचं एक कायमस्वरुपी स्थान आहे, प्रत्येक कट्ट्यावर, तेथील लोकांसोबत ओळखी आहेत.. मजा आहे तुझी...!!

  आपुण तर बारावी होस्तोर नेट अन कॉम्प्युटर काय असतं, हेसुद्धा फारसं (माहित होतं पण एवढं पण नाही!) ओळखीचं नव्हतं आपल्याला! (म्हणजे मागच्या दिड वर्षांपूर्वीची गोष्ट!! ;) ) इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या वेळी पहिल्यांदा ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करतांना जी काय दमछाक झाली, त्यातूनच बरंच काही शिकायला भेटलं.. आता काड्या करून नेट वापरणार्‍यांच्या कॅटेगरीमधल्यांमध्ये आपली वर्णी(??) लागते..! त्यातल्या त्यात आता लॅपटॉप असल्यामुळॆ टेन्शनच नाही..!

  - विशल्या!

  ReplyDelete
 12. हा हा हा.... कांचन, तू किमान असं डेअरिंग तरी केलंस.... मी घरी कॉम्प्युटर व इंटरनेट आलं तरी त्याच्या जवळही फटकत नव्हते घाबरून....पण कुतुहलही स्वस्थ बसू देईना... आणि एकदा चटक लागली त्या इंटरनेटची की मग काय विचारता!
  तुझा किस्सा मात्र मजेशीर आहे! :-)

  अरुंधती


  http://iravatik.blogspot.com/

  ReplyDelete
 13. कांचन

  मी “आपलं इंग्लिश खूपच चांगलं आहे...” हे माझ्या स्वतःबद्दल म्हटलं... “आपलं” हा शब्द प्रथमपुरुषी अनेकवचनी अर्थानं वापरला. द्वितीयपुरुषी आदरार्थी अर्थानं, म्हणजे तुझ्याबद्दल/तुमच्याबद्दल नव्हे! असे घोळ होतात म्हणून इंग्रजी you सुटसुटीत वाटतो. असो.

  खरंतर मला म्हणायचं होतं की कोल्हापूरसारख्या लहान शहरातून येऊन पुण्यामुंबईतल्या अशा convent styleनं इंग्लिश बोलणार्‍यांशी संपर्क आला (विशेषतः मॉल्स/कॅफेमध्ये) की त्यांचे accents कळायचेच नाहीत आणि ते “लई भारी” इंग्लिश बोलताहेत असं वाटायचं. (जुनी गोष्ट. आता नाही वाटत!) पण अशांचे उच्चारच स्टायलिश असतात, इंग्लिश मात्र यथातथाच असतं हे नंतर कळू लागलं आणि तो complex गेला.

  नंतर अशा चकचकीत ठिकाणी जाऊन बसणं अंगवळणी पडलं तरी ते lifestyleचा भाग कधीच झालं नाही. आजही १० रुपयांचा वडापाव मॅक्डोनाल्डमध्ये ६५ रुपये देऊन veg-mackie की अशाच काही नावानं मी नाही खाऊ शकत.

  विवेक.

  ReplyDelete
 14. हा हा मस्त अनुभव आहे. मी तुझ्या मनाने जास्तच मागासालेला कारण मी साइबर कॅफेमध्ये गेलो तेंव्हा दर ताशी ३० रु इतका उतरला होता. बाकी मला पण तेंव्हा मेलबॉक्समध्ये आठवड्याला जरी एखादं मेल दिसलं तरी आड्स आनंद व्हायचा. पहिली काही वर्षे तर मी कुणाला कामानिमित्त एखादा मेल पाठवला असेल तर शप्पथ. नुसते फॉरवर्ड फॉरवर्ड आणि फॉरवर्ड...

  ReplyDelete
 15. अनुभव एकदम मस्त.
  मी एकदा नव्याने उघडलेल्या कॉफी हाऊसमध्ये मैत्रिणीला सोबत घेऊन गेलो होतो. भाव मारायचा होता; पण कॉफी प्यायल्यानंतर जेव्हा बील पाहिले तेव्हा एसीमध्येही घाम फुटला होता. तिला बाहेर थांबायला सांगून सगळे खिसू झाडून कॉफीचे बील भागवताना अक्षरशः दमछाक झाली होती.
  तुमचा अनुभव वाचून तो अनुभव आठवला. छान लिहिले आहे.

  ReplyDelete
 16. हे हे मस्त. इंटरनेट हे जेवढ्या चांगल्या गोष्टीसाठी वापरला जाता त्याच बरोबर किबा त्याहून जास्त चुकीच्या मार्गासाठी वापरल जात..दिस ईज़ फॅक्ट :(

  ReplyDelete
 17. मंदार,
  ते म्हणतात ना, संकटकाळी माणसाला अचानक काहीतरी युक्ती सुचतेच, तसं झालं असावं. वाट बघण्यासाठी पंचवीस रूपये घालवणं हे माझ्यासाठी संकटच होतं.

  सोनाली,
  तेव्हा इंटरनेट नावाचं असलं काही आपल्याला सातासमुद्रापार नेतंय, हेच आश्चर्यचकीत करणारं होतं, त्यामुळे मेल नसलं तरी उगीच आपलं जायचं मेल चेक करायला.

  अमेय,
  आपल्याला तंत्रज्ञानाबद्दल असलेली उत्सुकता आणि भिती या दोन्ही मधून हे घडतं. पूर्वी नाही का, लोक ट्रेनला सुद्धा लोखंडी राक्षस म्हणायचे.

  विक्रम,
  अरे, ही गोष्ट वापरायची कशी हेच माहित नाही ना. त्यामुळे आपण आपल्या परिने त्याचे अर्थ लावतो. असे बरेच अनुभव आहेत. वेळ मिळेल, तसे टाकत जाईन.

  विशल्या,
  अरे, तासाचे पन्नास कसले घेऊन बसलास. काही ठिकाणी मी तासाचे साठ-सत्तर सुद्धा मोजले आहेत. प्रत्येक ठिकाणी वातावरण निराळं असायचं. नेट साठी तडफडण्याचं कारण म्हणजे, ते तंत्रज्ञान खूप उपयोगी आहे असं जेव्हा कळलं, तेव्हा ते आत्मसात करण्याची मनात अनिवार इच्छा होती. तुझ्या बारावीच्या वेळी तर तंत्रज्ञान बरंच पुढे गेलं होतं. आमच्या वेळी सगळंच नवीन होतं, त्यामुळे ज्यांनी कॅफे सुरू केले होते, ते सुद्धा नवशिकेच असायचे.

  अरुंधतीजी,
  इंटरनेट व कॉम्प्युटर हे न सुटणारं व्यसन आहे खरं. सुरूवातीपासून कॉम्प्युटर वापरत होते त्यामुळे इंटरनेट जड गेलं नाही. पण कॉम्प्युटरचा किस्सा तर आणखीनच विनोदी आहे.

  विवेक,
  मी मनापासून हसले, तुझी प्रतिक्रिया वाचून. ते वाक्य असं होतं, की कळलंच नाही की तू स्वत:बद्दल बोलतोयंस. असो. माझं इंग्लिशही काही अगदी कोकाटे नाही. खरं सांगू का आपल्याकडे जेव्हापासून बि.पी.ओ. आलेत, तेव्हापासून यथातथा इंग्रजी येणारेही अमेरिकन किंवा ब्रिटी़श उच्चारांत इंग्रजी बोलतात. ते ऐकताना त्यांचं इंग्लिश भारी आहे असं वाटतं. व्याकरणात्मकरित्या योग्य इंग्रजी बोलणारी लोकं आपल्याकडे खूप कमी आहेत. काही गोष्टी आपल्या असतात नि त्या त्याच आपलेपणानं जपाव्या लागतात. मलासुद्धा वडापाव, पाणीपुरी असले प्रकार ए.सी. हॉटेलमधे बसून खायला आवड्त नाही. आपली रस्त्यावरची टपरी बेश्ट हे, त्यासाठी.

  सिद्धार्थ,
  तुम्ही मागासलेले नाही, सुदैवी आहात. तुमच्यावेळेला हे तंत्रज्ञान बरंच सुधारलं होतं. मेल फॉरवर्ड करणं हे रिकाम्या मेलबॉक्सचीच परिणती असावं बहुधा. मी सुद्धा पूर्वी बरेच फॉरवर्डस पाठवायचे. मग त्या मेल्समधे तोच तोच पणा यायला लागला. मित्रकंपनीची यादी वाढली आणि एकच मेल चार-पाच वेळा इनबॉक्समधे हजेरी लावायला लागलं, तेव्हा मी फॉरवर्डस कमी केले.

  प्राजक्ता,
  अगं, हॉटेलमधे गेले आणि पैसे अगदी व्यवस्थित असले पर्समधे तरी मला उगीचच कॉम्प्लेक्स येतो. मी दोन वेळा तरी माझी पर्स तपासून पहातेच. तुझा अनुभवही छान आहे. असा अनुभव मलाही एकदा आला होता.

  सुहास,
  तंत्रज्ञान कोणतंही असो, त्याला चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू असतात. शेवटी कोणती बाजू निवडायची, हे आपल्यावर अवलंबून असतं.

  ReplyDelete
 18. मी तर माझा पहिला ईमेल अकाउंट सायबर कॅफेतूनच उघडला होता. माझी चुलत बहीण लग्न होऊन यु.एस. ला गेल्यावर तिला ईमेल पाठवण्याकरता.

  त्यानंतर नवरा अधूनमधून परदेशी असायचा....घरात संगणक असला तरी इंटरनेट नव्हतं....मग मी सायबर कॅफे त जाऊन त्याला भला मोठ्ठा मेल करायचे. तीन-चार दिवसांनी त्याचा मेल आलेला असायचा तो प्रिंट आऊट काढूण घेऊन यायचे...असं चक्र चालायचं. त्यावेळी इंटरनॅशनल कॉल करायची सुविधा म.टे.नि.लि. च्या फोन वर उपलब्ध नव्हती...आणि मोबल्या तर आलेलेच नव्हते.

  असो, किस्सा वाचून मजा वाटली.

  ReplyDelete
 19. श्रेयाताई,
  मी पहिला ईमेल अकाउंट उघडला त्याचीही कहाणी रम्य आहे. लिहिन तीसुद्धा. काही म्हण इंटरनेटने जग जवळ आणलं खरं.

  ReplyDelete
 20. मजा आली वाचताना....भाग २ प्लीज....

  ReplyDelete
 21. सागर, या गोष्टीचा भाग दुसरा येईल पण थोडा वेळ लागेल

  ReplyDelete
 22. आपला कीस्सा वाचला आणि फारच मजा वाटली
  कारण काही वर्षापुर्वी मलाही नोकरीतील बढतीसाठी
  नेटची प्रक्टीस करायची होती. त्यासाठी file attached कशी करायची व send कशी करायची या बाबतची माहिती करुन घेताना cybercafe मध्ये काय दमछाक झाली होती व घाम फुटला होता याची आठवण झाली.
  आपण अनुभव छान लिहिला आहे. वाचताना मजा आली.कीस्सा मित्रांनाही forward केला आहे.

  ReplyDelete
 23. धन्यवाद दिपक,
  जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहित नसते तेव्हा सुरूवातीला असे मजेशीर किस्से घडतातच. नंतर त्याच गोष्टी सोप्या वाटू लागल्या की जुन्या आठवणींवर हसू येतं.

  ReplyDelete
 24. कांचन जी मला चांगले आठवते आहे. भारतातले पहिलेवहिले सायबर केफे १९९८ मध्ये मुंबईतील फोर्ट मध्ये स्तोक एक्सेंज जवळ सुरु झाले होते. तेव्हा त्याचा तासी दर होता ९० रु.आणि मला एव्हढी माहिती असण्याचे कारण म्हणजे मी त्याच परिसरात कामाला होतो आणि माझाटेलेक्स फेक्स यांच्याशी जवळ जवळ रोज संबंध यायचा. मला खूप उत्सुकता होती पण दर खूप असल्याने जाऊ शकलो नव्हतो.
  मी आक्टोबर १९९८ मध्ये जपानला गेलो होतो तेव्हा तेथेच इंटरनेट कसे चालवावे हे एका अमेरिकन माणसाकडून शिकलो होतो. तसेच मुंबई मधील मिड डे, आफ्टरनून हे पेपर मी तेथे दररोज वाचायचो.

  ReplyDelete
 25. ९० रूपये? बापरे! त्यावेळी इतका दर होता खरा. पहिल्या वहिल्या सायबर कॅफेची माहिती या लेखाच्या निमित्ताने मिळाली. धन्यवाद. मुंबईचे पेपर्स जपानमधे इंटरनेटवर वाचताना मौज वाटली असेल, नाही?

  ReplyDelete