Tuesday, April 6, 2010

मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याची नाव नोंदणी आता ४ मे २०१० पर्यंत!

प्रतिक्रिया: 
हो! दिनांक ९ मे २०१० रोजी दादर, मुंबई येथे आयोजित केलेल्या मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यात सामिल होण्यासाठीच्या नाव नोंदणीची मुदत वाढवून आता ४ मे २०१० अशी करण्यात आली आहे.

हा स्नेह मेळावा आयोजित करताना सर्वात मोठं आव्हान होतं, ते जागेचं! मुंबईसारख्या शहरात पाच लोक जरी एकत्र जमून चर्चा करू लागले, तरी त्याकडे संशयाने पाहिलं जातं. आपल्या स्नेह मेळाव्यला अशा कुठल्याही शंकित / कल्पनांचं वलय लाभू नये, म्हणून सर्वप्रथम मेळाव्याची जागा सर्वतोपरी योग्य असेल, असं पहायचं होतं. अदमासे उपस्थिती संख्या समजली की जागा निश्चित करणं सोपं जाणार होतं. याच कारणासाठी अंतिम मुदत खूप जवळच्या दिवसाची दिली होती. पहिल्या तीन दिवसांतच ३० पेक्षा जास्त ब्लॉगर्स/वाचकांनी आपली नाव नोंदणी केली आणि नेमकं कसं व कोणतं स्थळ निवडावं याची कल्पना आली. नाव नोंदणी करताना ब्लॉगर्स आणि वाचकांनी प्रचंड उत्साह दर्शविला आहे. त्यामुळे आमचाही हुरूप वाढला आहे. आतापर्यंत या ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यासाठी सुमारे ७० जणांनी आपली नाव नोंदणी केली आहे.

मित्रांनो, कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की मेळाव्यासाठी नियोजित केलेल्या स्थळाचे नाव ’दादर सार्वजनिक वाचनालय’ असे आहे. या वाचनालयाच्या तिस-या मजल्यावरील ’दासावा’ सभागृहामधे आपला ब्लॉगर्स स्नेह मेळा संपन्न होणार आहे. दादरच्या पश्चिम बाजूस छबिलदास मार्गावर हे वाचनालय स्थित आहे. या वाचनालयाच्या नावाचे संक्षिप्त रूप ’दा.सा.वा.’ असे आहे. या सभागृहाची क्षमता किमान १५० व्यक्तींची आहे. शिवाय तेथे वीज, पाणी व प्रसाधनगृहाचीदेखील सोय आहे. ज्यांनी आधीच नावनोंदणी केली आहे व जे नावनोंदणीसाठी उत्सुक आहेत, अशा सर्वांसाठी या वाचनालयापर्यंत जाण्याचा नकाशा सोबत जोडत आहे. येथे टिचकी दिल्यास इच्छुक हा नकाशा डाऊनलोडदेखील करू शकतील.

वाचनालयापर्यंत जाण्याचा नकाशा


या वाचनालयापर्यंत पोहोचण्यासाठी* काही प्रसिद्ध खुणा म्हणजे दादर पश्चिमेच्या छबिलदास शाळेसमोरच हे वाचनालय आहे. दादर पश्चिम रेल्वे स्थानकानजिकचा श्रीकृष्ण वडापाववाला, आयडीयल बुक डेपो, जे.जे.मेहता (इथे छान कॅमेरे विकत मिळतात), क्षात्रैक्य समाज सभागृह या स्थळांच्या रांगेतच हे वाचनालय आहे. प्लाझा थिएटर कडून येणा-यांनी वीर कोतवाल उद्याना जवळ बस स्टॉपला लागून असलेल्या जिन्याचा वापर केल्यास दा.सा.वा.च्या पुढ्यातच उतरता येईल. मुंबईबाहेरून एस.टी. ने येणा-यांनी दादर टी.टी. (खोदादाद सर्कल) पर्यंत येऊन टिळक ब्रिजच्या दिशेने वळावे. तेथून वीर कोतवाल उद्यानापर्यंत चालत यावे व तेथेच लागून असलेल्या जिन्याचा वापर करावा. रेल्वेने येणा-यांनी दादर स्थानकाच्या पश्चिम बाजूस उतरावे व छबिलदास मार्ग अथवा छबिलदास शाळेबद्दल पृच्छा करावी.

कार्यक्रमाची रूपरेषा ठरली की नाव नोंदविलेल्या सर्व सदस्यांना ती ईमेल केली जाईल व सोबत हाच नकाशा जोडून पाठवला जाईल. ज्यांनी आधीच नोंदणी केलेली आहे, त्यांनी पुन्हा आपले नाव नोंदवण्याची आवश्यकता नाही.

पुन्हा एकदा जाहिर करत आहोत की मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यात सामिल होण्यासाठीच्या नाव नोंदणीची मुदत वाढवून आता ४ मे २०१० अशी करण्यात आली आहे व मेळाव्याचे स्थळ आहे दा.सा.वा. अर्थात, दादर सार्वजनिक वाचनालय. नाव नोंदणीसाठी इथे टिचकी द्या आणि माहिती भरा. आपण वाचक असल्यास ब्लॉगचे नाव व दुवा येथे ’वाचक’ असे लिहिल्यास हरकत नाही. आपण कुठून येणार आहात ते अवश्य लिहा, जेणेकरून आम्हाला मुंबईबाहेरून किती सदस्य येणार आहेत याची कल्पना येत राहिल. मुंबईतील सदस्यांनी स्थळाचे नाव मुंबई असे लिहिल्यास हरकत नाही.

धन्यवाद!
आपले ब्लॉगर मित्र,
रोहन चौधरी, महेंद्र कुलकर्णी व कांचन कराई

*टीप: दा.सा.वा. ऐन बाजारपेठेत आहे, त्यामुळे तेथे खाजगी वाहने लावण्यासाठी जागा असली, तरी ती पुरेशी नाही.

18 comments:

 1. सविस्तर माहिती बद्द्ल धन्यवाद. आपण या साऱ्यासाठी जे धडपड करत आहात ती कौतुकास्पद आहे.

  मुंबईबाहेरुन येणाऱ्या ब्लॉगर्सना जर रहाण्याची अडचण असेल तर ते माझ्या घरी रात्रीस मुक्कामाला येवु शकतात. इमारत दुरुस्तीचे काम सुरु आहे. पण सोय होवु शकते.

  ReplyDelete
 2. कोण कोण येणार आहे हे कसे कळेल ?

  ReplyDelete
 3. हरेकृष्णजी, आपण सक्रिय सहभाग देण्यास पुन्हा एकदा तयारी दर्शवली आहे. अत्यंत आभारी आहे. मुंबईबाहेरून सध्या तरी १२ ते १३ जण येणार आहेत. आपल्याला त्यांच्या निवासाची सोय करायची असेल, तर आपण एक स्वतंत्र पोस्ट आपल्या ब्लॉगवर टाकलीत तर बरं होईल, जेणेकरून ते त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक इ. माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेलद्वारे पाठवू शकतील.

  ReplyDelete
 4. काहीजणांना प्रश्न पडला आहे की हे स्नेहसंमेलन फक्त मराठी भाषेमधे ब्लॉग लिहिणाऱ्यांसाठीच आहे का ?आंग्लभाषेत ब्लॉग लिहिणारे मराठी माणसे यात सहभागी होवु शकतात का ?

  मला वाटते आपण सर्वांना या स्नेहसंमेलनात यायला हरकत नाही.

  ReplyDelete
 5. हा मेळावा मराठी भाषेत ब्लॉग लिहिणारांसाठी आहे, त्यामुळे आंग्ल व मराठी अशा मिश्र भाषेत ब्लॉग लिहिणारे ब्लॉगर्स या मेळाव्यात भाग घेऊ शकतात.

  ReplyDelete
 6. कांचन ... मुंबईबाहेरुन येणाऱ्या ब्लॉगर्सना जर रहाण्याची अडचण असेल तर ते माझ्या घरी सुद्धा रात्रीस मुक्कामाला येवु शकतात. तसे मी काही जणांना कळवत आहेच. पण दुसरा दिवस सोमवार म्हणजे कामाचा असल्याने बहुदा सर्वजण उशिरा का होईना पण घरी जाण्याचे बघतील...

  ReplyDelete
 7. रोहन, तुझ्या ब्लॉगवर मेळाव्याची पोस्ट टाकताना तू याचा उल्लेख केलास, तर बरं होईल.

  ReplyDelete
 8. सविस्तर माहिती बद्द्ल धन्यवाद. आपण हा मेळावा यशश्वी होण्यासाठी करत असलेली धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे.
  मी येऊ शकणार नाही याची मात्र मला जरुर खंत आहे.असो
  http://savadhan.wordpress.com

  ReplyDelete
 9. आपल्या शुभेच्छा पाठीशी असू द्या.

  ReplyDelete
 10. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 11. सर्वप्रथम आपल्या या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा.
  'मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याची' माहिती आमच्या ब्लाँगवर ठेवली आहे.
  गंगाजल नेचर फौंडेशन ही मुंबईतील मराठमोळी संस्था गेली अनेक वर्षे, छायाचित्र प्रदर्शने व माहितीपट सादरीकरणाच्या तसेच राष्ट्रीय पातळीवरील छायाचित्र आणि माहितीपट व निबंध स्पर्धांच्या माध्यमातून नद्यांच्या, तलावांच्या संवर्धना विषयी समाज प्रबोधन व जनजागृतीचे कार्य करीत आहे. भाषा हे संवादाच माध्यम आहे असं आम्हाला वाटतं आणि संवाद साधल्या शिवाय प्रबोधन शक्य नाही. या मुळेच गंगाजलचा ब्लाँग बहुभाषिक आहे.

  आमचे संकेतस्थळ तसेच ब्लाँगला अवश्य भेट द्यावी,
  धन्यवाद.

  http://www.gangajal.org.in/
  http://gangajal.org.in/blog/

  ReplyDelete
 12. आपल्या ब्लॉगची माहिती दिल्याबद्दल व मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याची माहिती आपल्या ब्लॉगमार्फत वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धन्यवाद. मेळाव्यामधे आपलं स्वागत आहे.

  ReplyDelete
 13. कांचन,
  मेळाव्यासाठी तुझी चाललेली धडपड, प्रयत्न सगळे कळत आहे, तुझा हा स्वभाव कौतुकास्पद आहे. हीच प्रामाणिक कळकळ खूप आवडली. हरेक्रीष्णाजी व रोहन चे पण घर नक्कीच आपले सगळ्यांचे आहे. तुम्हा सर्वाना भेटण्याची खूप इच्छा आहे, पण जून पर्यंत थांबायला हवे मला. माझ्या शुभेच्छा व मी हि मनाने तुमच्या बरोबरोबर तिकडेच आहे हे नक्की.. जमलेल्या सर्वांचे फोन नंबर आठवणीने मेल कर. मी जून च्या पहिल्या आठवड्यात ठाण्यात आहे. फोटो ची वाट पाहत आहे. मेळाव्यासाठी जमलेल्या सर्वांचे माझ्याकडून स्वागत........

  ReplyDelete
 14. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 15. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 16. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 17. anukshre, धन्यवाद.
  मेळाव्याचा सचित्र वृत्तांत आम्ही पोस्ट करूच. जून मधे आलात की एक पोस्ट तरी लिहा किंवा बझ्झ तरी करा. म्हणजे मेळाव्याला नाही पण नंतर भेटता येईल. मी मूळची ठाण्याचीच आहे. तुमच्या शुभेच्छा पाठीशी आहेत, हेही कमी नाही.

  ReplyDelete