Monday, April 5, 2010

मुली झाल्यात दीडशहाण्या?!

प्रतिक्रिया: 
बझ्झवर दिलेल्या महाराष्ट्र टाईम्समधे प्रसिद्ध झालेल्याया लेखाच्या दुव्यावर उत्स्फुर्त प्रतिक्रिया म्हणून हा लेख लिहित आहे.

मुलींच्या मागण्यांची, अपेक्षांची इतकी मोठी यादी समजल्यानंतर मुलांनी भांबावून जाण्याची काहीच गरज नाहीये. डोकं शांत ठेवून विचार केला तर लक्षात येईल की ’नंतर बघू’ असं म्हणून टाळलेले प्रश्न नंतर अडचणी बनून अंगावर येतात. त्यापेक्षा मुलींनी ज्या मागण्या समोर ठेवल्या असतील, त्यांचा सांगोपांग विचार करावा. म्हणजे नंतर अडचणी चुटकीसरशी सोडवता येतात.

प्रत्येकाच्या आयुष्याची जीवनशैली (Lifestyle) निराळी असते आणि आपल्या जीवनशैलीशी जुळवून घेणारा जोडीदारच प्रत्येकाला अपेक्षित असतो. अगदी बरीचशी प्रेमप्रकरणंही हा विचार करूनच पुढे नेली जातात. ठरवून केलेल्या लग्नांमधे तर हीच गोष्ट प्रामुख्याने पाहिली जाते.

मुलाला वाढवण्यात आणि मुलीला वाढवण्यात जो मुलभूत फरक असतो, त्यामुळे ’पुढे बघू'ची वृत्ती मुलांमधे वाढीस लागते. कारण मुलगा म्हणजे कमावता, वंशाचा दिवा, त्याने रडायचं नसतं, त्याने अग्रेसिव्हच असलं पाहिजे अशी काही प्रमाणात चुकीची शिकवण त्याला दिली जाते. जी मुलं खरंच भावनाशील असतात, त्यांच्या भावनांची यामुळे मुस्कटदाबी होते, हेही कुणी लक्षात घेत नाही.

याउलट आपल्या आईला घरकामात मदत करताना आईचं कामातील नियोजन, घरखर्च भागवताना केलेल्या युक्त्या तसेच काम करता करता होणार्‍या गप्पांमधून आपली आई अशी का आहे, हे मुलींना जास्त समजतं. आजकाल किती मुली आपल्या आईला घरकामात मदत करतात हे माहित नाही. पण वडिलांशी जास्त जवळीक असणार्‍या मुली, अगदी ’माझ्या बाबांसारखाच नवरा हवा’, असं वाटणार्‍या मुलींनासुद्धा आपल्या आईने ज्या तडजोडी केल्या, त्या स्वत:च्या आयुष्यात करायला नको असतात.

प्रत्येक पिढीगणिक, मुलींनी आपल्या आईसकट इतर स्त्रियांच्या आयुष्यापासून धडे घेत कमीत कमी तड्जोडी करत संसार केले. आत्ताच्या पिढीतल्या मुली तर फिल्टर्ड - तडजोडविरहित जीवनशैलीचीच मागणी करत आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे पुरूषासोबत स्त्रीही कमावती झाली. तसं पाहिलं तर घरखर्च आणि कमाई यांचा मेळ घालताना स्त्रिया आपसूकच व्यवहारी बनल्या होत्या. नोकरी करायला लागल्यापासून त्य मॅनेजमेंटही शिकल्या. पूर्वीही स्त्री कमावत असे. शिवण टिपण, पापड, लोणची, मसाले असं बनवून स्त्रिया संसाराला हातभार लावीत असत पण त्या कमाईचा घरासाठी उपयोग झाला तरी त्या स्त्रीला कुणी विशेष किंमत देत नसे. आता स्त्रीला घरातील आर्थिक जबाबदारीचा पन्नास टक्के वाटा उचलावा लागतोय. ’ज्या गोष्टी पुरूष करतो, त्याच गोष्टी मीही करू शकते मग तडजोडी मीच का करायच्या’, असा विचार मुली करू लागतात ते याचमुळे. यात काही चूक वाटण्याची गरज नाही. उद्या जर पुरूषाला सक्षमपणे गर्भधारणा होऊ लागली तर किंवा दोन पुरू्षांना सहवासातून सक्षमपणे गर्भधारणा होऊ लागली तर, ’जे स्त्रिया करायच्या तेच आम्हीपण करू शकतो, मग बायकांची आमच्या आयुष्यात गरजच काय?’ असं म्हणूही शकतील. हा विचार हास्यास्पद वाटत असेल कदाचित पण विज्ञानात ज्याप्रकारे प्रगती होते आहे आणि स्त्रीला ज्याप्रकारे संधी मिळेल तिथे दुय्यम वागणूक दिली जात आहे, त्यावरून ’स्त्री हा प्राणी कधिकाळी अस्तित्वात होता’, असा इतिहास पुढच्या पिढीला वाचायला मिळाला, तर नवल नाही.

स्त्री बदलली आहे असं म्हणताना, एक स्त्रीच दुसर्‍या स्त्रीचा इतका पराकोटीचा द्वेष का करते हे न समजण्यासारखं आहे. सासू-सुनेचं नातं हे बहुतांशी गोडीगुलाबीचं नसतंच. त्यांच्यात वितुष्ट येण्याचं कारण खरंतर पुरूषच असतो. एकीचा मुलगा आणि दुसरीचा नवरा या चिमट्यातून सुखरूप सुटण्यासाठी, "तुम्ही तुमचं बघून घ्या. मी मधे पडणार नाही." ह्या पुरूषाच्या दुटप्पी भूमिकेवर त्या दोन स्त्रियांनी विचार केला तर त्यांना लक्षात येईल की त्या दोघीही दोन निरनिराळ्या घरांतून इथे लग्न करून आलेल्या असतात. उलट त्यांनीच सामंजस्याने एकमेकींना पाठिंबा द्यायला हवा. ’कालपर्यंत हे घर मी सांभाळलं. आता तूच सांभाळ. काही लागलं तर मी आहेच’, ही भूमिका घेण्याऐवजी सासू जर येता जाता सुनेच्या माहेरचा उद्धार करू लागली, तर सुनेला का गोडी वाटेल सासरी? सासूवर असा प्रसंग आला असेल, कदाचित नसेलही पण जी गोष्ट स्वत:च्या मुलीला सांगताना सौम्यपणे सांगितली जते, तीच गोष्ट सुनेला सांगताना इतका कठोरपणा का? सुनेनेदेखील सासू ही नवर्‍याची आई आहे, त्यामुळे आपल्याला जसं आपल्या मुलाबद्दल प्रेम असतं तसंच ते तिलाही असणार हे समजून घ्यायला हवं.

नणंद, भावजय हे नातंही तसंच. वहिनीला जाच करण्याच्या नादात नणंद हे विसरते की आपण सासरी गेल्यावर आपल्या वाटयालाही हेच येऊ शकतं. आज जर आपण वहिनीशी हसून खेळून वागलो तर हीच वहिनी आपल्या अडचणीच्या वेळेस आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल. शिवाय एक स्त्री असल्याने तिला आपली व्यथा समजून घेता येईल. पण हे होत नाही.

लग्न झालेली मुलगी आपलं माहेर सोडून सासरी येते, हे वाक्य वाचायला खूप सोपं वाटतं पण प्रत्यक्षात मुलीने आपल्या नवीन आयुष्याला सुरूवात केलेली असते. तिचं माहेर एका क्षणात तिला परकं होतं. अनोळखी घर, अनोळखी लोक, अनोळखी वातावरण, अनोळखी प्रसंग, क्वचित प्रसंगी अनोळखी पतिसुद्धा! तिच्याकडून घराला आपलं मानण्याची अपेक्षा करताना, ते घर तिला आधी किती आपलंसं करतं, हेही लक्षात घ्यायला हवं.

नवर्‍याबरोबर न नांदणार्‍या मुलीची चर्चा होते. ’तिलाच नवर्‍याला नीट सांभाळता आलं नाही,’ अशा शब्दांत तिची अवहेलना केली जाते. नवर्‍याचं घर सोडून (असाच शब्दप्रयोग नेहमी केला जातो. आपलं घर सोडून असा शब्दप्रयोग कधी झाल्याचं ऐकिवात नाही.) माहेरी गेलेल्या स्त्रीला आपल्या भावजयीकडून टोमणे सहन करावे लागतात. जर भावजयीने या नणंदेचा त्रास आधी सहन केला असेल, तर भावजयीकडून मिळणार्‍या वागणुकीची कल्पनाच न केलेली बरी. ही घटना भावजयीच्या संसारालाही अपायकारक ठरू शकते. शेवटी माहेरी आलेल्या त्या मुलीवर दोन आरोप लागतात. एक, स्वत:चं घर बरबाद केलं, दोन, भावाच्या संसारात विष कालवलं. मला वाटतं, हिंदू संस्कृतीमधे लग्नाचा लाह्याहोम वराच्या बहिणीने पेटवायचा असतो, तो याचसाठी. जेणेकरून तिने लग्नानंतर भावाच्या संसाराला आग लावू नये.

या आणि अशा बर्‍याच गोष्टी मुलींनी आपल्या आईकडून, मावशीकडून, मैत्रीणीकडून ऐकलेल्या असतात. कळत न कळत लग्नाबद्दल उत्सुकता कमी आणि भिती जास्त वाटायला लागते. आपण एका अशाश्वत अशा नात्यामधे बांधले जाणार आहोत, ही भावना वाढीस लागते आणि त्या भावनेतून स्वत:भोवती इच्छा, अपेक्षा, मागण्यांचं कुंपण मुली बांधून घेतात. जेणेकरून हे नातं खरंच अशाश्वत ठरलं तरी आपली फसगत झाल्यासारखं वाटायला नको आणि समाजाने आपल्यावर आलेल्या प्रसंगाचा फायदा घ्यायला नको. शेवटी विवाह विच्छेद झाला तर मुलगीच सासर सोडून जाते. मुलगा त्याच्याच घरी रहातो. नेमकी हीच गोष्ट पूर्वीच्या काळी स्त्रियांनी केलेल्या विवाहांतर्गत तडाजोडींना कारणीभूत होती - माहेरी कुत्रं विचारणार नाही, सासरी निदान विवाहित म्हणून प्रतिष्ठा तरी आहे. आता तशी परिस्थिती उरलेली नाही. कामानिमित्त अविवाहित/विवाहीत स्त्रीला घर सोडून बाहेर पडावं लागलं. क्वचित दौर्‍यांवरही जावं लागलं. तिचे अनुभव समृद्ध होत गेले. स्वत:मधेच नवे शोध लागले. स्वच्छंद जगण्यातला आनंद तिने अनुभवला. मागच्या पिढीची झालेली कुचंबणा तिने लक्षात ठेवली आणि स्वत:च्या इच्छा, मागण्या योग्यच आहेत, याची तिला जाणीव झाली. हल्लीच्या मुलींना दीडशहाण्या आणि डोक्यात हवा गेली आहे असं म्हणणार्‍या स्त्रियांनीच सर्वप्रथम याचा विचार करावा की नात्यांची लेबलं महत्त्वाची असतात की त्या व्यक्तीचं जीवन?

लीव्ह इन रिलेशनशीपला कायद्याने मान्यता मिळाली असली तरी समाजाकडून त्याला विरोध होतो आहे कारण यात ’नुकसान’ स्त्रीचंच आहे. हा आहे पुरूषप्रधान संस्कृतीचा प्रभाव. स्त्रीवर बलात्कार करणार्‍या पुरूषांबद्दल घृणा वाटणार्‍या समाजाने याचा विचार करावा की कुठल्याही स्त्रीला केवळ एका उपभोग्य वस्तूची वागणूक देण्याची मानसिकता त्या पुरूषांमधे आली कुठून? कुठेतरी आपणही याला खतपाणी घालत नाही का? स्त्रियांच्या बुद्धिमत्तेवरचे विनोद इमेल मधून फॉरवर्ड करणे (यात आपल्या जवळच्या मैत्रीणींचेही इमेल असतात. त्या अशा विनोदाला हसतील हे गृहीत धरणे आणि नाही हसल्या तर त्यांच्यात खिलाडूवृत्ती नाही असं आधीच मेलमधे खाली लिहून पाठवणे), बायकोला चारचौघात वेड्यात काढणे अशा गोष्टींनी स्त्रियांच्या मनात कुठेतरी असंतोष निर्माण करायला पुरूषच कारणीभूत ठरतो. या असंतोषाचा निचरा अशा मागण्या पुढे ठेवून होतो.

शारिरीकदृष्ट्या स्त्री व पुरूषाच्या जडणघडणीतही फरक आहे. उदाहरणार्थ, सारख्याच वजनाच्या, उंचीच्या, बांध्याच्या दोन स्त्रीपुरूषांची धावण्याची शर्यत लावलीत तर स्त्रीला अंतिम रेषा गाठण्यासाठी पुरूषापेक्षा अधिक काळ लागणार हे निश्चित! कारण तिच्या ओटीपोटाच्या रचनेमुळे धावताना वारा जास्त प्रमाणात अडतो, परिणामी तिला पुरूषाच्या बरोबरीने ध्येय गाठताना पुरूषापेक्षा जास्त शारिरिक ताकद खर्ची घालावी लागते. इथे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की समान ध्येय गाठताना स्त्री पुरूषापेक्षा जास्त ताकद खर्ची घालते. मात्र या गोष्टीपासून अनभिज्ञ असलेले लोक लाईट वेट वेहिकल, टच स्र्किन मोबाईल, बटन स्टार्ट स्कुटर्स या गोष्टींना गर्लिश ठरवून मोकळे होतात.

सुनिता कृष्णनच्या या व्हिडिओमधे बरंच काही आहे. ते मी इथे लिहित बसत नाही कारण ते ऐकण्यासारखं आहे. पण या व्हिडिओमधे शेवटी पुनर्वसन झालेल्या स्त्रिया अवजड कामं करताना दिसताहेत. स्त्रिया ती कामं करताहेत म्हणून ती कामंसुद्धा आपण गर्लिश ठरवणार का आता?

10 comments:

 1. लेख एवढा फिरतो की प्रतिक्रिया कशावर द्यावी हा प्रश्न पडातो. शिवाय शीर्षक व आत मांडलेले मुद्दे यावरुन लेखिकेला नेमके काय म्हणायचे आहे हे कळत नाही.
  आजकाल स्त्रीत्वाचा उदो उदो करणारे लेख फार वाढले आहेत. स्त्रीयांच्या विरोधात कोणी एक शब्द उच्चरला तर सगळ्या बायका तुटुन पडत आहेत.
  स्त्रीत्वाचा बाऊ करताना पुरुषाला वाईट ठरवू नये.

  स्त्री किंवा पुरुष एकेकटे यशस्वी होवून दाखवू शकतात. नो बिगी.दोघांनी मिळून यशस्वी होण्याला महत्त्व आहे.

  ReplyDelete
 2. खर आहे मुलींच्या अपेक्षाचा विचार करून मगच पुढील निर्णय घेणे योग्य.

  ReplyDelete
 3. शांतीसुधा,
  मुलींच्या मागण्या अवाजवी आहेत असा विचार खुद्द स्त्रियाच करतात याचं जास्त वाईट वाटतं.

  साधकजी,
  लेखाच्या शिर्षकानंतर लेखाच्या सुरूवातीलाच, मी हा लेख का लिहिला त्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे, त्यामुळे शिर्षक तसे का दिले आहे, याबद्दल प्रश्न पडण्याचं काहीच कारण नाही. लेखाच्या सुरूवातीला जे पहिले वाक्य लिहिले आहे, त्यात गुगल बझ्झ व म.टा. मधे आलेल्या त्या लेखाचा दुवा दिला आहे. कदाचित त्याकडे आपले दुर्लक्ष झाले असावे. दोन्ही दुवे व्यवस्थित वाचले, तर मला काय म्हणायचे आहे, हे आपल्याला लगेच कळले असते.

  आजकाल स्त्रीत्वाचा उदो उदो करणारे लेख फार वाढले आहेत, असं म्हणण्यापेक्षा आजकाल स्त्रियांच्या कर्तुत्वाची दखल गंभिररित्या घेतली जात आहे असं म्हटलं तर? मुळात स्त्रियांच्या विरोधात बोलावंच का? आणि स्त्रीच्या विरोधात बोलल्यावर स्त्रियाच तुटून पडणार, पुरूष नाही. कारण वरून कितीही उदारमतवादीपणाचा आव आणला तरी पुरूषाला स्त्रीने कर्तुत्ववान असावं हे खुपतं आहे. त्याच्या लेखी स्त्रीने अजूनही चूल आणि मूल यापलिकडे जाऊ नये अशीच त्याची इच्छा आहे. पूर्वीच्या काळापासून ते आजच्या पिढीपर्यंत, स्त्रीने तिची भूमिका अगदी चोख बजावली आहे असं वाटतं. पूर्वीही पुरूष अर्थार्जन करीत होता, आताही करतो. मात्र स्त्रीला पूर्वी चूल आणि मूल यापलिकडे जग माहित करून देण्याचा रिवाज नव्हता. पुरूषाने ही बंधन नाईलाजाने सैल केली आहेत कारण त्याचं अर्थार्जन त्याच्या कुटुंबाच्या खर्चाला मेळ बसवायला तुटपुंज पडतं. ही वस्तुस्थिती आहे. स्त्रीने चूल आणि मूल यासोबतच अर्थार्जनाची जबाबदारीही पुरूषाच्या बरोबरीने स्विकारली. त्यातही पुरूष जमेल तिथे स्त्रीचा पाणउतारा करायला मागेपुढे पहात नाही. असं असताना स्त्रीविरोधी काही बोलल्यावर स्त्रीयांनी का बरं गप्प बसावं?

  स्त्री-पुरूष एकटे यशस्वी होऊ शकतात पण मी तर म्हणेन की एकटी स्त्री जास्त यशस्वी होऊ शकते कारण एकट्या स्त्रीला पुरूषाच्या आतील जनावराचाही सामना करावा लागतो. तो लढा लढून आपलं कर्तुत्व जगासमोर आणणारी स्त्री पुरूषापेक्षा निश्चितपणे जास्त यशस्वी आहे असं मला वाटतं. सामूहीक बलात्कार हा एका स्त्रीवर ४,५, १० किंवा त्याहीपेक्षा जास्त पुरूषांनी मिळून केलेला असतो. स्त्रीयांनी मिळून पुरूषावर सामूहिक बलात्कार केल्याची बातमी मी तरी अजून ऐकलेली नाही. जर खरंच दोघांनी मिळून यशस्वी होण्याला महत्त्व आहे, हे खरं असेल, तर याचा विचार आता पुरूषानेच करावा. तुम्ही सुनिता कृष्णनचा व्हिडिओही पाहिला नसणार याची मला खात्री आहे.

  सचिन,
  मुलींनी ह्या अपेक्षा ठेवण्यामागे खूप मोठा इतिहास आहे, त्याचाही विचार केला जावा. मी केवळ पुरूषांना दोष देत नाही, याला कुठेतरी स्त्रीही जबाबदार आहे. मुलींच्या मागण्या ह्या वरवर पाहिल्या तर अवाजवी वाटतात. पण लग्नानंतर केव्हातरी पुरूषही याच निर्णयाप्रत येतो. मग तेच निर्णय आधी घेऊन सुखी आयुष्याचं प्लानिंग केलेलं काय वाईट?

  ReplyDelete
 4. कांचन, खूपच छान!!!
  ज्या मुलांना वाटतंय कि मुलीच्या डोक्यात हवा शिरालीये त्याची अगदी परखड शब्दात कानउघाडणी केल्याबद्दल धन्यवाद!!! आज मुली देखील मुलांच्या बरोबरीने कमावतात, त्यांची मते परखडपणे मांडतात, स्वतःचे निर्णय स्वतः घेतात म्हणूनच तर पुरुषी अहंकार दुखावला जातो. मुली दीडशहाण्या झाल्या आहेत हे ज्यांना वाटते त्यांनी हे बोलण्या अगोदर आपली बुद्धी जरा तपासून घ्यावी.

  ReplyDelete
 5. मनिषा,
  पुरूषांना बदला असं सांगून ते कधीच बदलणार नाहीत म्हणून स्त्रियांनीच आता बदललं पाहिजे. स्त्रियांनी आता थोडी समज दाखवायला हवी असं मला वाटतं. एकीला असलेल्या अडचणी दुस-या स्त्रीच्याही आयुष्यात निर्माण झाल्या की दु:ख वाटण्याऐवजी स्त्रियांना सुप्त आनंद होतो. त्यामुळेच मत्सर, असुया या शब्दांसोबत ब-याचदा स्त्रीसुलभ असा शब्द जोडला जातो. स्त्रीयांना जर खरंच प्रगती करायची असेल, तर त्यांनी आपल्या विचारसरणीतही बदल करायला हवा.

  ReplyDelete
 6. कांचनताई,
  आणखी एक भन्नाट अष्टपैलू पोस्ट. कोणत्याही समस्येवर विचार करताना मला विविधांगी विचार करायला आवड्तो, तूही तसाच केलायस. बदलत्या वेळेनुसार - कपडे धुणे, भांडी‌, स्वयंपाक आदी‌ कामाचं-औद्योगिकिकरण होत चाललय, तस या एन्डवरही‌बदल होतायत आणो समाजाने ते स्विकारायला हवेत, नव्हे लागतील. पोस्ट आवडली फक्त एक वाक्य सोडलं तर : "सासू-सुनेचं नातं हे बहुतांशी गोडीगुलाबीचं नसतंच. त्यांच्यात वितुष्ट येण्याचं कारण खरंतर पुरूषच असतो".

  हा लेख जर ऍन्टी-मेल-डॉनिनंन्ट असला असता तर हे वाक्य शोभलं असतं. कारण त्या वितुष्टाची अनेक कारण असू‌ शकतात .. अगदी जनरेशन गॅप ते दोघींचे इगो. (‌यतून आणखी खोल अभ्यासात्मक प्रश्न निर्माण होतो - दोन स्त्रियांची भांडण सोडवायला एका पुरूष मध्यस्थाची गरज का ? अर्थात मला हा प्रश्न स्त्रीxपुरूष असा घ्यायचा नाही, म्हणून यावर जास्त चर्चा नको, पण) .. इगो, सासर-माहेर आर्थिक विषमता, घरांतले वेग्वेगळे संस्कार आणि सर्वात महत्वाचं बदलत्या काळाचा जुन्या पिढीला तसा 'नसलेला एक्स्पोजर', विशेषत: आर्थिक घडमोडी‌.. यामुळे सासू‌-सून (वि)संवाद होऊ‌ शकतो ..

  ReplyDelete
 7. मान्य! सासू-सुनेमधे वितुष्ट यायला बरीच कारणं असतात. जनरेशन गॅप तर असतेच. इगोबद्दल मी लिहिलं आहे. अधिकार आणि जबाबदार्‍या यांची वाटणी करताना दोघींनाही स्वत:कडे अधिकार असणं आवश्यक वाटतं. पुरूष मध्यस्थाची गरज नसतेच. पण मुळात दोघींमधे भांडण होतं तेव्हा त्या वादातील चुक बरोबरचं मूल्यमापन करणारा कुणीतरी असावा असं दोघींनाही वाटतं आणि पुरूष म्हणजे एकीचा नवरा आणि दुसरीचा मुलगा हाच मध्यस्थ होऊ शकतो. दीर, नणंद किंवा सासरा ह्या व्यक्ती एकतर्फी निर्णय देऊ शकतात. सून ही त्या घरातील एकमेव परकी व्यक्ती असते आणि तिचा संबंध त्या घराशी येतो तो नवर्‍यामुळे. त्याच नवर्‍याची आई जेव्हा तिला जबाबदार्‍या देऊन अधिकार स्वत:कडे ठेवू पहाते किंवा याच्या उलट परिस्थितीही असू शकते, तेव्हा खरं खोटं ऐकून घ्यायला आणि माझं बरोबर आहे हे सांगायला या दोन स्त्रीयांना तो एकमेव पुरूषच योग्य वाटतो.

  स्त्री विरुद्ध पुरूष हा मुळात भांडणाचा विषय का होतो हेच कळत नाही. दोघांची शारिरिक रचना नैसर्गिकत:च जिथे निराळी आहे तिथे कोण सरस हा प्रश्नच येऊ शकत नाही. स्त्रियांची सर्व कामे जशी पुरूषांना जमणार नाहीत, तशीच पुरूषांची सर्व कामे स्त्रियांनाही जमणार नाहीत. काही ठिकाणी अगदी चित्रपटांतूनही असं दाखवलं आहे की पुरूष शर्ट काढून उघड्या अंगाने स्त्रियांना, "हे तुम्ही करू शकता का?" असं विचारतात. अशा वेळी हेच पुरूष आपली आई किंवा बहीणही स्त्रीच आहे हे विसरतात का? हा विचार कदाचित हास्यास्पद वाटेल पण स्त्रियांनी केलेली कामं हिणकस आहेत, असं समजायचं हे पूर्वीपासून ठरलेलं आहे. असा समज करून घेण्यात स्त्रीयांनाही कमीपणा वाटत नाही.

  ReplyDelete
 8. वर दिलेलं विधान थोडं आणखी स्पष्ट करते नाहीतर लेख खूप फिरतो आहे असं वाटायचं:

  निसर्गाने दिलेल्या शारिरिक रचनेनुसार दोघांनी दैनंदिन कामे वाटून घेतली. अर्थातच, सुरूवातीला अर्थार्जनासाठी पुरूषाला भ्रमंतीही करावी लागत असे, चार इतर माणसांशी बोलाचाली होत असे, त्यातून त्याला ज्ञान मिळत गेलं, अनुभव अधिक समृद्ध होत गेले. स्त्रीच्या आंतरिक शक्तीचा अवाका त्याला असाच केव्हातरी लागला असावा. ’जे आपण करू शकतो, तेच स्त्रीही करू शकते तर मग आपलं महत्त्व काय” हा प्रश्नावर जेव्हा पुरूषाने गंभीररित्या विचार केला तेव्हा आत्ताच स्त्रीला बंधनात ठेवणं आवश्यक आहे नाहीतर पुढे अनर्थ होईल, याची त्याला जाणीव झाली असावी. यातूनच अर्थार्जन हा स्वत:चा प्ल्स पॉईंट आहे, असं गृहीत धरून स्त्रीच्या गृहकृत्यांकडे पुरूषाने तुच्छ दृष्टीने पहाण्यास सुरूवात केली. वादविवादात तर पुरूष केव्हाही वरचढ ठरणारच होता कारण त्याच्या कामांच्या स्वरूपामुळे त्याचे अनुभव त्याला वरचढ ठरवत होते. इथे पुरूषाने स्त्रीच्या अकलेचाही पाणउतारा करण्यास सुरूवात केली. स्त्रीलाही आपला दर्जा हीन/कनिष्ठ असावा असे वाटत राहिले आणि इथे पुरूषप्रधान संस्कृतीचा उदय झाला. ही पुरूषप्रधान संस्कृती शतकानुशतके जपली गेली आहे. परंतू विज्ञानातील प्रगतीमुळे व लोकसंख्येच्या भरमसाठ वाढीमुळे प्रत्येक शतकागणिक व नंतर प्रत्येक दशकागणिक ही बंधने सैल होत गेली. जनरेशन गॅप पुरूषांमधेही असते पण मुळातच पुरूष अनादीकालापासून अर्थार्जन किंवा कुटुंबाच्या पोट भरण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेत आला आहे, त्यामुळे वडिल व मुलगा यांच्यात विसंवाद असला तरी आपल्या मुलाच्या कर्तुत्वाबददल अभिमान असतो. इथे सासरा व जावई या नात्यामधे मुलीची बाजू म्हणून सासर्‍याकडून जावयाला मनाचीच वागणूक दिली जाते. त्यांच्यात जनरेशन गॅप असत नाही. आई-मुलीमधे जनरेशन गॅप असतेच असते. मुलीने वयात आल्यावर उघडपने गुणगुणत आरशात पहाणं आईला छचोरपणाचं वाटू शकतं कारण त्यांच्या पिढीत असं काही करणं म्हणजे मोठी चूकच असायची. तर सासू सुनेमधे जी जनरेशन गॅप असते ती घरातील जबाबदार्‍यांवरून. सून नोकरी करणारी असली तरी ती घरकामात तरबेज असली पाहिजे असा सासूचा आग्रह असतो. सासूदेखील पूर्वी नोकरी करत असेल, तर रोजच्या रोज ’आम्ही कशी कामं केली असतील,’ हे पालूपद ऐकवलं जातं. पूर्वीच्या काळी नोकरी करणं व आजच्या काळात नोकरी करणं आणि ती टिकवण हे आव्हान आहे, हे मागच्या पिढीने समजून घ्यायला हवं. तसंच मागच्या पिढीतल्या स्त्रीची मानसिक जड्णघडण तिच्यावर झालेल्या संस्कारांमुळे आहे, हे आधुनिक पिढीलाही लक्षात रहायला हवे. नेमकं हेच होत नाही म्हणून सासू सुनेत जास्त वाद होतात. त्यात खासकरून पुरूषाला ओढलं जातं. पुरूष जेव्हा स्वत:ची सुटका करून घेऊ पहातो आहे, हे लक्षात येतं तेव्हा राग त्या पुरूषावर काढण्याऐवजी त्या सासू सुना एकमेकींशी भांडत बसतात.

  आजची पिढी जी सर्वच बंधन नाकारते आहे, ती याच कारणांसाठी. दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, दोघांना एकमेकांसाठी जगायचंय पण जेव्हा सहजीवनाचा आनंद घेण्याची वेळ येते तेव्हा चालीरिती, रूढी, परंपरा हे सर्व सांभाळावं लागतं. यातही खास करून स्त्रियांनाच ही बंधन जास्त असतात. अमकी साडीच नेसली पाहिजे, अमकेच कपडे घातले पाहिजेत असं म्हणताना घरातलं कुणी असा का विचार करत नाही की सध्याच्या वातावरणात इतकं प्रदुषण आहे की स्वत:च्या घामानेही जंतुसंसर्ग होऊ शकतो. स्त्रीला आर्थिक स्थैर्य लाभलं असेल तर तिची ती निर्णय घेण्यास स्वतंत्र असते. तिला पुरूषाच्या आर्थिक पाठबळाची गरज उरत नाही. अशा स्त्रिया स्वत:चं अस्तित्व व स्वातंत्र्य अबाधित रहावं म्हणून लग्न करण्याआधीच भरपूर अटी घालतात.

  ** म.टा. वरील ज्या लेखावर प्रतिक्रिया लिहिण्याच्या दृष्टीने हा लेख लिहिला, तो वाचला तर लक्षात येईल की अवाजवी वाटणार्‍या मागण्या या समस्त स्त्री समाजाच्या नाहीत. अजूनही कित्येक ठिकाणी स्त्रिया पूर्वीची बंधन रूढी मान्य करून लग्न करतातच.

  ReplyDelete
 9. शीर्षक आणि कॉंटेंट यात थोडा जमलिंग

  ReplyDelete