Friday, March 5, 2010

द टाईम ट्रॅव्हलर्स वाईफ - इथे काळाची मर्यादा नाही

प्रतिक्रिया: 
तुम्ही तारूण्याच्या उंबरठ्यावर आहात आणि अचानक एक गोड लहान मुलगा तुम्हाला येऊन सांगू लागला की भविष्यात मीच तुझा नवरा होणार आहे, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही कॉलेजच्या मित्रमैत्रीणींबरोबर हुल्लड करताहात आणि एक लहानशी मुलगी येऊन तुम्हाला ’बाबा’ अशी हाक मारेल, तर कशी अवस्था होईल तुमची? तुमचा जीवनसाथी, तुम्हाला आवडो अथवा न आवडो, सतत प्रवासच करत असेल आणि सहजीवनाऐवजी तुमच्या नशीबात एकटेपणाच जास्त आला तर?

वयाच्या सहाव्या वर्षी हेन्‍री आपल्या आईबरोबर प्रवास करत असताना एका जबर अपघातात सापडतो. त्यातून तो वाचतो खरा पण त्याच्या नशीबी असं जगावेगळं आयुष्य जगण्याची वेळ येते. त्याच्या आयुष्यातील कुठल्याही काळात प्रवास करणं त्याला शक्य असतं. मात्र या देणगीसोबतच दोन कठीण समस्याही येतात. एक म्हणजे कुठल्या काळात प्रवास करावा, हे त्याला ठरवता येत नाही. स्वत:ला नको असतानादेखील हेन्री ला हा प्रवास करणं भाग पडतं. दुसरी कठीण समस्या म्हणजे कुठल्याही काळात प्रवास करताना हेन्‍री ला अंगावरच्या कपडयांनीशी प्रवास करता येत नाही. प्रत्येक वेळी प्रवास करताना तो ज्या काळातून आला आहे, त्याच काळात त्याला आपले कपडे सोडून यावे लागतात. त्यामुळे दर वेळी चोरी करून, हिसकावून त्याला कपडे मिळवावे लागतात.

अशा विलक्षण माणसाची पत्नी होण्याचं भाग्य की दुर्भाग्य क्लेअरच्या भाळी लिहून ठेवलेलं असतं. हेन्‍रीसारख्या पुरूषासोबत संसार करण्याची कल्पना तिला खूप आवडते पण लग्नानंतर अनपेक्षित क्षणी हेन्‍रीचं गायब होणं, तिला तीव्रतेने जाणवू लागतं. तशातच ती आई होणार असल्याचं तिला कळतं आणि तिची चिंता अधिकच वाढते. दरम्यान एका आनंदाच्या प्रसंगी हेन्‍री, ती आणि त्यांचं कुटुंब आपल्या डोळ्यांदेखत हेन्‍रीला वेदनांनी कळवळताना पहातात. हेन्‍री तारूण्यातच मृत्यू पावणार आहे, हे क्लेअरला कळल्यावर तर ती आणखीनच अस्वस्थ होते. काहीही झालं तरी हेन्‍रीच्या मुलाला मी जन्म देणारच या जिद्दीला ती पेटते. कदाचित होणा-या मुलालाही आपल्यासारखाच विकार असला, तर या भितीने हेन्‍री तिला मूल दत्तक घेण्याविषयी सुचवतो पण क्लेअर ऐकत नाही. शेवटी जे नियतीच्या मनात असतं, तेच होणार हे हेन्‍रीला कळून चुकतं.

चित्रपटाचं नाव ’द टाईम ट्रॅव्हलर्स वाईफ’ असं असलं तरी हेन्‍रीचं निरनिराळ्या काळात प्रवास करणं आणि भविष्यातील व भूतकाळातील घटनांची माहिती मिळवणं, ते करताना त्याला आलेल्या समस्या यांवरच चित्रपटात जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. क्लेअरशी लग्न झाल्यानंतर तिच्या दृष्टीने समस्या असलेल्या गोष्टी फार उशिराने चित्रपटात येतात. मात्र क्लेअर आणि हेन्‍रीचे संबंध या चित्रपटात सुरेख रंगवले आहेत. एरिक बाना या अभिनेत्याचा चेहेरा हेन्‍रीच्या भूमिकेसाठी अतिशय योग्य वाटतो. चित्रपट जरी काळाच्या प्रवासासंबंधी असला तरी यात स्पेशल इफेक्ट फारसे नाहीत. हेन्‍री गायब होतानाच्या प्रसंगात स्पेशल इफेक्टचा आवश्यक तेव्हढा वापर केलेला आहे. मात्र हेन्री‍ एका काळातून दुस-या काळात प्रवास करताना त्याच्या वयात होणारा बदल चांगला दाखवला आहे.

ऑड्री निफेंग्गर यांच्या ’द टाईम ट्रॅव्हलर्स वाईफ’ याच नावाच्या कांदबरीवर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन रॉबर्ट श्वेन्टक यांनी केलं आहे, तर चित्रपटाची पटकथा ब्रूस जोएल रुबीन यांनी लिहिली आहे. ज्यांनी या चित्रपटाचं संकलन केलं, त्या टॉम नोबल यांची कामगिरी जास्त महत्त्वाची होती. निरनिराळ्या काळात प्रवास करणारा हेन्‍री पहाताना कुठेही आपली गफलत न होता, चित्रपट व्यवस्थित समजतो. मायकल डाना यांनी दिलेलं पार्श्वसंगीत चित्रपटाला साजेसं आहे. हेन्‍रीच्या गायब होतानाच्या प्रसंगात दिलेलं संगीत उत्तम.

ट्रॉय, म्युनिक, लकी यू सारख्या चित्रपटांमधून काम केलेल्या एरिक बाना याने हेन्‍रीची भूमिका नेहमीच्याच पद्धतीने समरसून केली आहे. त्याचा चेहेरा हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. तर हल्लीच्याच ’शरलॉक होम्स’ या रॉबर्ट डाऊनिंग (ज्यू) व ज्यूड लॉ अभिनित चित्रपटात दिसलेल्या रेचल मॅकअॅडम्स हिने हेन्‍रीच्या पत्नीची म्हणजे क्लेअरची भूमिका साकारली आहे. इतर सहकलाकारांची कामेही ठीक आहेत.

टाईम ट्रॅव्हलर म्हणजे एका काळातून दुस-या काळात प्रवास करणारा. हा प्रवास जसा भविष्यकाळात असू शकतो, तसाच तो भूतकाळातदेखील होऊ शकतो. मात्र भविष्य किंवा भूतकाळ बदलण्याची शक्ति यामुळे मिळत नाही. आपल्या जीवनात घडलेल्या आणि घडणा-या घटनांचे आपण साक्षिदार असावं इतकीच नियतीची इच्छा असते. अगदी आपलं मरणही आपल्या डोळ्यांसमोर दिसतं पण आपण काहीच करू न शकत नाही. हे सर्व स्वत:पुरतं असेल तर ठीक असतं पण आपल्या जीवलगांचीसुद्धा यात ससेहोलपट होते, तेव्हा हे सर्व आपल्याच बाबतीत का घडलं, असा प्रश्न मनात आल्यावाचून रहात नाही.

20 comments:

 1. छान लिहिलं आहेस कांचन. मी अजुन बघितलेला नाही हा सिनेमा. पण वाचल्यानंतर कधी बघीन असं झालंय.

  ReplyDelete
 2. उद्या / किंवा रविवारी पहातो..
  सध्या माय फेअर लेडी आणि इट हॅपन्ड वन नाईट पहातोय. :)

  ReplyDelete
 3. केदार, जरूर पहा. चांगला चित्रपट आहे. यूट्यूबवर बहुधा संपूर्ण चित्रपट आहे.

  ReplyDelete
 4. महेंद्रजी, चित्रपट चांगला आहे. माय फेअर लेडी मलासुद्धा पुन्हा पहायचा आहे. सध्या स्टार वॉर्सही पहातेय पण फार काही आवडले नाहीत पहिले दोन भाग.

  ReplyDelete
 5. स्टार वॉर्सची मजा मोठ्या पडद्यावर, पण त्यासारखे अनेक चित्रपट पाहिल्यामुळे आता काही विशेष वाटत नाही.... हा चित्रपट मिळवतो आता...

  ReplyDelete
 6. घरात मोठाच पडदा आहे बाबा. पण मला आवडतच नाही. बहुधा प्रिक्वल पहायला आवडतील याचे.

  ReplyDelete
 7. aata tar pahavach lagel..dhanyawad mahiti dilyabaddal

  ReplyDelete
 8. वैभव, चित्रपट खूप इंटरेस्टींग आहे. नक्की बघ.

  ReplyDelete
 9. लेख वाचून हा चित्रपट पाहण्याची इच्छा झाली आहे नक्की पाहणार

  ReplyDelete
 10. कांचन आपल्या सारखेच मला ही एडीटींगची आवड आहे..

  पण संधी नाही मिळाली.आणि अनुभव नाही हा पण मी ते नक्किच करु शकतो

  आपण नेटभेटवरील माझे लेख वाचता ..

  कदाचित आता आठवेल तुम्हाला माझा ई मेल आयडी

  prathmaesh.shirsat@gmail.com

  आहे.

  आणि

  prathmeshshirsat.blogspot.com हा माझा ब्लॉग  मला देखील या क्षेत्रात काम करण्याचि इच्छा आहे.....

  मला वाटतं आपण माझ्य प्रतिक्रियेला नक्कीच उत्तर द्याल

  माझ्याकडे तुमचा मेल आय डी नव्ह्ता म्हणून गनिमी काव्याने ( Comments द्वारे) तुमच्याशी संपर्क साधावासा वाटला

  आपल्याला जर काही त्रास झाला असेल तर त्या बद्दल क्षमस्व  प्रथमेश शिरसाट

  ReplyDelete
 11. विक्रम, लेखामधे मी बरेच मुद्दे जाणीवपूर्वक वगळले आहेत, जे चित्रपट पहाताना लक्षात येतील. चित्रपट जरूर पहा.

  ReplyDelete
 12. प्रथमेश, आपला ब्लॉग नजरेखालून घालते आहे. आपले ईमेल मला मिळाले आहे. सविस्तर उत्तर ईमेलद्वारे देईन. इथे प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. त्रास कसला, उलट आपल्याला मदत करण्यात मला आनंदच होईल.

  ReplyDelete
 13. कांचन, मी '21' आणि 'The Time Traveler's Wife' दोनही पिक्चर पाहिले मागच्या आठवड्यात. असंच छान लिहित जा, म्हणजे आमच्या कलेक्शन मध्ये असे चांगले चांगले पिक्चर येतील. खरंच तुझ्या लिखाणामुळे बघावेसे वाटले. मला सुद्धा काही आठवले तर सुचवेन. धन्यवाद.

  ReplyDelete
 14. केदार,
  बरेच दिवस चित्रपट पहाणं बंद होतं. आता पुन्हा सुरूवात केली की लिहिनच. तुझी आवड अवश्य सुचव. प्रतिसादासाठी विलंब केल्याबद्दल दिलगीर आहे.

  ReplyDelete
 15. me mhanalya pramane kahi films suchwat ahe:
  1) Chitty Chitty Bang Bang (Magical car)
  2) The Von Ryan's Express (A 1965, World War II adventure film starring Frank Sinatra and Trevor Howard)
  3) 17 Again (khup chan ahe)
  4) 300
  5) The Pursuit of happyness (yes, the spelling here is not happiness)
  6) The Bridge On The River Kwai
  7) Bruce Almighty (Jim Carrey)
  8) Flubber (Robin Williams)
  9) Mrs.Doubtfire (Robin Williams) - 'Chachi 420' jyavarun ghetla ahe
  ..
  ..
  ..
  Ajun khup sangnya sarkhya ahet films, pan me tari kiti suchavnar.

  ReplyDelete
 16. पहिले दोन चित्रपट वगळता इतर चित्रपट मी पाहिले आहेत. मात्र परिक्षण लिहायचं तर हे चित्रपट पुन्हा पहावे लागतील. हरकत नाही. 300 तर मला विशेष आवडला होता. The Von Ryan's Express असूनही पाहिला नाही कारण World War II च्या वेळेचे बरेच चित्रपट एकामागोमाग एक पहायचे असं ठरलं होतं. The Boy in Blue Stripped payjamas असं नाव असलेला चित्रपटही सुंदर होता. त्याबद्दल देखील लिहीन. नावं सुचवल्याबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete
 17. Few more movies..
  1. Forest Gump - Tom Hanks all time classic.
  2. The terminal - Tom Hanks
  3. What About Bob - Bill Muray
  4. My Big Fat Grek Wedding (family movie, similar to hum aapke hain kaun, nice story)
  5. Home Alone (all parts)
  6. Baby's Day Out (Very Nice)

  ReplyDelete
 18. धन्यवाद. चांगले चित्रपट आहेत. यातील दोन चित्रपट पाहिलेले नाहीत. ते पाहिन.

  ReplyDelete
 19. कांचन

  तू लिहिलेली परिक्षणं वाचली की दोन गोष्टी होतात:
  १. चित्रपट बघायची उत्कंठा निर्माण होते, आणि
  २. इतकं सुंदर परिक्षण वाचल्यावर चित्रपट काय बघायचा असंही वाटू लागतं!

  मीही movie freak आहे पण इंग्लिश चित्रपट फारसे बघत नाही कारण मला अमेरिकन इंग्लिश कळत नाही.

  kayvatelte नी माझ्या आवडीच्या दोन चित्रपटांचा उल्लेख केलाय (माय फेअर लेडी आणि इट हॅपन्ड वन नाईट).

  तू अकिरा कुरोसावाचे रान (किंवा रन) आणि राशोमोन पाहिलेयस का?

  द टाईम ट्रॅव्हलर्स वाईफ नक्की पाहीन.

  विवेक.

  p.s. कोणत्याही जुन्या पोस्टवर कॉमेंट दिली तरी तुला कसं कळतं? तू रोज सगळ्या पोस्ट चेक करतेस का (कसं शक्य आहे)?

  ReplyDelete
 20. विवेक,

  तुमचा दोन क्रमांकाचा मुद्दा मी माझ्यावरची टिका म्हणावं की प्रशंसा?... गंमत केली. तुमच्या प्रशंसेमुळे मला माझ्यातील गुणदोष कळले. चित्रपटाचा शेवट न सांगण्याची व चित्रपटातील बरेच महत्त्वाचे प्रसंग माझ्या परिक्षणात न येण्याची मी खबरदारी घेते. जेणेकरून हे परिक्षण वाचून कुणाला चित्रपट पहाण्याची इच्छा झालीच तर चित्रपट पाहिल्याचा खराखुरा आनंद त्यांना मिळावा. तरीदेखील आणखी खबरदारी घेत जाईन.

  अमेरिकन इंग्रजी ऐकताना त्रास होतो खरा. मी उपशिर्षकं (सबटायटल्स) असलेले चित्रपट मिळाले तर आधी पहाते. त्यामुळे चित्रपट चटकन समजतो. अकिरा कुरोसावाचे चित्रपट पाहिले आहेत पण अजून लिहिलेलं नाही आणि राशोमोन तर नाहीच मला वाटतं. पण आता तुम्ही नावं दिली आहेत तर त्यांचे चित्रपट मिळवून पाहिन. मध्यंतरी अकिरा कुरोसावाचे चार चित्रपट एकाच सी.डी.मधे मिळत होते पण त्यामानाने किंमत जास्त वाटली म्हणून विकत नाही घेतली. द टाईम ट्रॅव्हलर्स वाईफ खूप छान आहे. एक प्रेमकथा, एक विस्मयकथा म्हणून सुंदरच. प्रत्येक फ्रेम स्वप्निल वाटते. तुम्हाला नक्की आवडेल.

  जुन्या पोस्टवर कमेंट दिली तरी ईमेल मधे त्याची नोंद येते. शिवाय ब्लॉगच्य डॅशबोर्डवरही प्रतिक्रिया आल्याचं समजतं. ही सुविधा ब्लॉगरनेच पुरवलेली आहे.

  ReplyDelete