Monday, March 8, 2010

रिना

प्रतिक्रिया: 
शिक्षणाचा गंध नाही. जयपूरपासून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या नारनौलसारख्या गावातून आलेली रिना सायनला असलेल्या एका पत्र्याच्या चाळीत रहाते. नवर्‍याबरोबर मुंबईला येताना तिच्याही डोळ्यांत स्वप्न होती, आशा होत्या. लग्नानंतरचं आपलं आयुष्य कसं कसेल, याचा विचार करत नवलाईने मुंबापुरी पहाणा-या रिनाच्या डोळ्यातील स्वप्न, आशा काही दिवसांतच विझून गेल्या.

आपला नवरा बाहेरख्याली आहे, हे तिला खूप उशीरा समजलं. लग्न ठरवताना सासरच्यांनी आपल्या घरच्यांना काही कल्पना दिली नाही, म्हणून ती सासरच्यांवर रागावली; तर आपल्या पाच मुलींपैकी एक मुलगी उजवली जाते आहे, असं पाहून तिच्या आईवडीलांनीही मुलाची काही चौकशी केली नव्हती, म्हणून रिना आईवडिलांवरही रागावली पण तिच्या रागावण्याची दखल कोण घेणार होतं? "तुझं प्रेम आणि आधार मिळाला, तर माझा मुलगा सुधारेलही!" सासूबाईंनी तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करून पाहिला. रिनालाही सासूबाईंचं म्हणणं पटलं. आज ना उद्या नवरा सुधारेल, या आशेवर डोळ्यातलं पाणी डोळ्यांच्या आतच ठेवून ती हसायला शिकली.

पण तिचं दुर्दैव इतक्यातच संपत नव्हतं. आपला नवरा नुसता बाहेरख्याली नाही तर त्याला जुगाराचंही व्यसन आहे, हेही तिला कळलं. एका मुलाचा बाप झाल्यानंतरही तिला नवर्‍यामधे काहीच सुधारणा दिसत नव्हती. त्यातच भर म्हणून की काय, आता त्याने घरात पैसे देणंही बंद करून टाकलं. सासरची आर्थिक परिस्थिती काही फार चांगली नव्हती. साहजिकच सासू, सासरे, दीर आणि थोरल्या जावेने रिनालाच आपल्या टिकेचं लक्ष्य बनवलं . तिला अजूनही हे कळत नव्हतं की ज्या काही चुका घडतायंत त्या माझ्या नव-याच्या हातून घडातायंत, त्यासाठी हे लोक मला का दोषी ठरवतात?

"तुलाच नव-याला ताब्यात ठेवता आलं नाही", असं सासरच्यांनी रिनाला ऐकवल्यावर मात्र रिनाचा संयम सुटला.

"ज्या मुलाला तुम्ही जन्म दिलात, जो मुलगा तुमच्या संस्कारांखाली वाढला, जो मुलगा तुमच्यासोबत त्याच्या वयाची २८ वर्षे राहिला, तेव्हा तो सुधारू शकला नाही आणि एका वर्षात त्याने माझ्यामुळे सुधारावं अशी अपेक्षा तुम्ही करूच कशी शकता?" रिनाने असं खडसावून आपल्या सासरच्या मंडळींना विचारल्यावर मात्र आता ही काही आपल्याला ऐकणार नाही, हे त्या मंडळींना कळून चुकलं. त्या रात्री नवर्‍याने घरी आल्यावर रिनाला प्रचंड मारहाण केली. मात्र सासरच्यांनी "वेगळं घर घे" असं ठणकावून सांगितल्याने रिनाला नवर्‍यासोबत बाहेर पडणं भाग पडलं. कशीबशी एका पत्र्याच्या चाळीत जागा मिळाली. जागा म्हणजे नुसतीच रिकामी खोली होती ती. आता स्वयंपाकाचा ओटा सोडा पण आंघोळीसाठीही धड जागा नव्हती. पुढच्या दोन बाजूंना दोन पडदे लावून तात्पुरता आडोसा तयार करायचा. तरीदेखील रिनाने जिद्दीने आपला संसार सुरू केला. पण बाई आणि जुगार यात बुडालेल्या तिच्या नव-याने घरात पैसे देणं नाकारलंच. उलट या विषयावर बोलण्यासाठी जेव्हा जेव्हा तिने तोंड उघडलं, तेव्हा तेव्हा तिला मारहाणच झाली. "तूच मला माझ्या आईवडीलांपासून तोडलंस", असं तिला ऐकवायला रिनाचा नवरा विसरला नाही.

"नवरा पैसे देत नाही ना, ठिक आहे. मी स्वत: काम करीन आणि पैसे कमवीन." रिनाच्या बाळानेच जणू तिच्यात ही उभारी भरली होती. पण मुंबईत कामासाठी पहिल्यांदाच बाहेर पडलेल्या अशिक्षित मुलीला कसलं काम मिळणार? एवढ्या दोन वर्षांत कुठे ओळखी नाहीत की नातेवाईक नाहीत. कसंबसं चार इमारतींमधील कचरा काढण्याचं काम मिळालं. रिनाने तेही आनंदाने करायला सुरूवात केली. एक स्टोव्ह, दोन-चार भांडी कुंडी यातही रिनाने आपल्या बाळाकडे पाहून जगायला सुरूवात केली. दोन वर्षांत हातात झाडू धरून नाजूक रिनाच्या हातांना राकटपणा आला होता. पण बहुधा तिची सत्वपरिक्षा अजून संपली नव्हती. पहिलं मूल दोन वर्षांचं होत न होतं तोच तिला दुस-या बाळाची चाहूल लागली. एव्हाना तिचे शेजारीपाजारी तिला चांगलं ओळखू लागले होते. रिनाच्या अडचणीच्या वेळेस त्यांनी तिला सर्वतोपरी मदत केली. पण रिनाच्या आसुसलेल्या मनाला नव-याच्या चार प्रेमाच्या शब्दांची गरज होती. तिचं मन तसंच कोरडं राहिलं. दुस-या मुलाचा जन्म अतिशय यांत्रिकपणे झाला. एक कमावणारी बाई आणि खाणारी चार तोंडं. एका झाडूवालीच्या पगारात हे कसं जमायचं? मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या शिक्षणाचं काय? रिनाला ह्या चिंता भेडसावत असताना कुणीतरी रिनाला "पोस्टाच्या बचत योजनेत पैसे गुंतवत जा", असं सुचवलं. रिनाच्या नव-याला याची कुणकुण लागल्यावर त्याने पुन्हा रिनाला मारहाण केली. त्या मारहाणीत रिनाच्या डाव्या डोळ्याला जबर दुखापत झाली. सहा टाके पडले. रिनाची सहनशक्ती संपत आली होती. इथे मार खात जगायचं असेल, तर माहेर काय वाईट आहे, असा विचार करून रिनाने आपल्या शेजार्‍यांच्या मदतीने गावची ट्रेन पकडली आणि आपल्या दोन्ही मुलांसकट माहेरी जाऊन राहू लागली. इतक्या वर्षांत आपल्या मुलीने एवढा त्रास सहन केला पण आपल्याला त्याबद्दल काहीच कल्पना दिली नाही, हे पाहून माहेरच्यांना मोठा धक्का बसला. रिनाची अवस्था पाहून तिला परत जाऊ न देण्याचा निर्णय तिच्या वडिलांनी घेतला. पण पुढे काय घडणार आहे, हे त्यांनाही माहित नव्हतं.

एके दिवशी रिनाचा नवरा आणि तिची सासरची मंडळी दत्त म्हणून तिच्यासमोर उभी ठाकली. सोबत आठ-दहा परकी माणसंही होती. थोडी बोलाचाली झाल्यावर त्या आठदहा माणसांनी सरळ रिनाच्या वडिलांना मारहाण करायला सुरूवात केली. रिनालाही थोडीफार मारहाण केली. रिनाचा नवरा आणि सासू रिनाच्या दोन्ही मुलांना उचलून घेऊन गेले आणि जाताना ही तंबी देऊन गेले की "मुलं हवी असतील, तर तुला नव-याबरोबरच रहावं लागेल. जर माहेरी रहायचं असेल, तर मुलांना विसरून जा." नाईलाजाने रिना त्यांच्या मागोमाग पुन्हा मुंबईला निघून आली. रिनाच्या वडिलांनी कायदेशीर मदत घेण्याचा प्रयत्न केला पण घरच्या प्रकरणात शक्यतो आधी दुर्लक्षच केलं जातं. "एका मुलीच्या संसाराचा असा विस्कोट झाला अशी बातमी गावात पसरली, तर माझ्या इतर चार मुलींच काय?" हा विचार करून रिनाच्या वडिलांनीही पुढे पाऊल उचललं नाही. रिनालाही आपल्या वडिलांची असहायता कळत होती म्हणून तिनेही पुढे तोंड उघडलं नाही.

या सर्व गोष्टींना आता चार वर्षं होऊन गेली. अजूनही रिना त्याच सायनच्या पत्र्याच्या चाळीत रहाते. तिचा मोठा मुलगा आता पहिलीत आहे. धाकटा मुलगा बालवाडीत जातो. आपल्या निरक्षरपणामुळे आपल्याला झाडू मारायचं काम करावं लागतं, ती वेळ आपल्या मुलांवर येऊ नये, त्यांनी खूप शिकून मोठं व्हावं अशी तिची इच्छा आहे. त्यासाठी तिने त्यांना इंग्रजी शाळेत घातलंय. शाळेची फी जास्त आहे म्हणून रिनाने घरकामंही मिळवलीत. सकाळी आठ ते संध्याकाळी चार पर्यंत रिना झाडू मारणं आणि घरकाम करणं हेच करत असते. घरातलं सर्व आवरून कामावर जाण्यासाठी तिला पहाटे चार वाजता उठावं लागतं. पण अजूनही तिच्या नव-याच्या मनात तिच्याबद्दल जराही सहानुभूती निर्माण झालेली नाही.

तिची जिद्द पाहून सासरच्यांना मात्र आपण चुकल्याची जाणीव होऊ लागली आहे. रिनाला कामावर जात असेल, तर तिच्या दोन्ही मुलांना सांभाळण्याची तयारी सासूने दर्शवली. रिनाच्या दु:खात तेवढाच एक सुखाचा शिडकावा. आता दहा वर्षांनंतर रिनाचं नाव तिच्या दिराच्या रेशनकार्डामधे टाकलं गेलंय. आजही रिनाला सायनवरून दादरला कामाला येताना ६६ क्रमांकाची म्हणजे नेमकी कोणती बस पकडायची, हे माहित नाही. तिच्या नव-याने तिला तेही माहित करून देण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. सायन पासून दादरपर्यंत चालत यायला तिला ४५ मिनिटं लागतात. तितकाच वेळ पुन्हा घरी जायलाही लागतो.

बायको आणि बाहेरच्या बायका यातला फरक तिच्या नव-याला कधी कळणार आहे की नाही कुणास ठाऊक? पण रिनाने त्याची आशा सोडली आहे. तो कुठे आणि काय काम करतो, हे जाणून घेण्याचीही तिला गरज वाटत नाही. मागच्या वेळी केला तसा मुर्खपणा न करता रिनाने आता नव-याच्या नकळत आपल्या दोन मुलांसाठी पोस्टाच्या बचत योजनेमधे पैसे गुंतवले आहेत. अर्थातच तिला त्यासाठी कुणीतरी मदत केली असणार. कारण तिला अजूनही बेरीज वजाबाकी करता येत नाही. शिरडीला जाण्यसाठी म्हणून रिनाचे वडील गेल्या आठवड्यात मुंबईला आले होते, तेव्हा रिनाला भेटून गेले. तिची अवस्थ पाहून, "क्या हाल कर दिया है मेरी बेटी का..." यापेक्षा जास्त काही बोलू शकले नाहीत कारण जावयाला काही बोललं तर उद्या आपण निघून गेल्यावर आपल्याच लेकीचा एखादा अवयव निकामा झालेला असायचा. पण हे सांगताना सुद्धा रिनाच्या डोळ्यात पाणी नव्हतं.

दु:खाचा अतिरेक झाल्यावर माणूस आत्महत्या करायला प्रवृत्त होतो. पण आत्महत्या करणं शक्य नसेल, तर असा माणूस निबरपणे जगायला लागतो. मला वाटतं की रिना अशीच निबर झाली असावी. "मेरे दिन जरूर बदलेंगे, मुझे पता है," असं जेव्हा ती म्हणते तेव्हा त्या निबरपणापेक्षाही मला तिच्यामधे प्रचंड इच्छाशक्ती असल्याची जाणीव होते. रिनाच्या दु:खात मी वाटेकरी होऊ शकत नाही पण तिची जिद्द आणि मेहनत फळाला यावी, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते. तिला क्षुद्र किड्याची वागणूक देणार्‍या तिच्या नवर्‍याने, तिला गरूडभरारी घेताना पहावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. रिनाचा एक स्त्री म्हणून मी आदर करते. आजच्या स्त्री दिनानिमित्त माझ्या कामवालीच्या जिद्दीचा माझा सलाम!

13 comments:

 1. रिनाबद्दल वाचुन खूप वाईट वाटलं, अशा अनेक रिना समाजात पहायला मिळतात. त्यांना होइल तितकी मदत करायची इतकेच आपल्या हातात आहे.

  ReplyDelete
 2. महिला दिना निमित्त रिनाची आणि पर्यायाने तिच्या जिद्दीची ओळख करुन दिल्या बद्दल धन्यवाद!

  ReplyDelete
 3. खरंच जागतिक महिला दिनानिमित्त अशा जिद्दीच्या सगळ्या सख्यांना मुजरा!

  ReplyDelete
 4. बिचारी दुर्दैवी रिना.. वाचताना काटा आला अंगावर.
  खरंच तिच्या जिद्दीला सलाम !! तिला काही आर्थिक मदत वगैरे करता येईल का?

  ReplyDelete
 5. खरंच वाचताना काटा आला अंगावर

  ReplyDelete
 6. khupach chaan....agadi saraL sadhyaa bhashet thet kaLajaat haat ghatalat....!!!

  ReplyDelete
 7. आर्यन,
  माझ्याकडून जितकं शक्य असतं तितकं मी करते पण प्रत्येक वेळी तिला काही देताना हे खास तिच्यासाठीच आणलंय, हे जर तिला कळलं तर ती ते घेत नाही. त्यामुळे "हे मला नको आहे, तुला हवं असेल तर घेऊन जा." असा बहाणा करून तिला द्यावं लागतं.
  -------------
  आनंद,
  आपल्या समजात अशा खूप जिद्दी स्त्रिया आहेत. आपल्या नजरेसमोरच असतात त्या. फक्त त्यांचं कार्य आपल्याला उशिरा समजतं.
  -------------
  क्रान्ति,
  जिद्दीने फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेणा-या स्त्रिया पाहिल्या की मी स्त्री असल्याचा मला अभिमान वाटतो. त्यांच्या जिद्द पाहून आपणही बरंच काही शिकतो असं मला वाटतं.
  -------------
  हेरंब,
  रिनाला आवश्यक ती मदत मिळते आहे. मात्र तिच्या नव-याला कळेल असं काहीच करता येत नाही. त्यामुळे काहीही करायचं तर जपून करावं लागतं.
  -------------
  अपर्णा,
  ती जेव्हा सांगत होती, तेव्हा इतक्या त्रयस्थपणे सांगत होती की दु:खाची परिसीमा झाली की दु:खही कशी बोचेनाशी होतात हे मला माझ्या डोळ्यांसमोर दिसत होतं. ती निघून गेल्यावर मला आठवून आठवून रडायला येत होतं. तर हे सगळं सहन करताना तिची अवस्था कशी झाली असेल, याचा विचारच करवत नाही.
  -------------
  संगमनाथ,
  रिनाने मला जसं सांगितलं, मी ते तसंच माझ्या शब्दांमधे मांडण्यचा प्रयत्न केला आहे.
  --------------------------------

  आपल्या समाजात कित्येक स्त्रिया त्यांच्य दु:खाला वाचा न फोडता जगत असतात. पुरूषांनाही अशी दु:ख असतात, याबद्दल माझी ना नाही. पण निसर्गाने ज्याप्रकारे स्त्री बनवली आहे त्यामुळे समाजात वावरताना स्त्रीला प्रचंड शारिरीक व मानसिक त्रास सोसावा लागतो. स्त्रीला समजून घ्यावं अशी अपेक्षा पुरूषाकडून करण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीनेच दुस-या स्त्रीला समजून घेतलं पाहिजे, असं मी म्हणेन. तरच स्त्री ख-या अर्थान तीचं स्त्रीपण आनंदाने उपभोगू शकेल.
  --------------------------------

  ReplyDelete
 8. रिनाच्या व्यथा अतिशय सुंदर रितीने शब्दबध्द केल्याबद्दल धन्यवाद.
  अशा अनेक रिना या मंबईमधील चाळी वजा झोपडपट्टीत जीवन जगत आहेत.
  त्यांना त्यांच्या आप्तेष्टांनी,मित्रमंडळींनी व हितचिंतकांनी वेळोवेळी योग्य
  मार्गदर्शन केल्यास रिनाची मुले या मंबईत नक्कीच आपले स्वत:चे स्थान निर्माण
  करतील यात शंकाच नाही. कारण अशा अनेक परिचित रिना या मुंबईत आपल्या
  सुना नातवंडाबरोबर सुखाने जीवन जगत आहेत.
  रिना करत असलेल्या काबाडकष्टांना यश लाभो हीच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना!

  ReplyDelete
 9. निसर्गाने ज्याप्रकारे स्त्री बनविली त्यामुळे समाजात वावरताना स्त्रीला प्रचंड शारिरीक व मानसिक त्रास सोसावा लागतो?
  माझ्या मते निसर्गामुळे नाही, पुरुषप्रधान संस्कृतीमुळे....

  ReplyDelete
 10. रीनाच्या पतीसारखे लोकांना भर चौकात उलट टांगून बांबूने फोडून काढायला पाहिजे ;
  माझे शब्द परखड असले तरी असली माणसं हेच डिसर्व्ह करतात.

  ReplyDelete
 11. खरच काटा आला रिनाची दुर्दैवी कहाणी वाचतांना...वरील मताशी मी सुदधा सहमत आहे...

  ReplyDelete
 12. सर्वप्रथम, उशीरा उत्तर दिल्याबद्दल दिलगीर आहे.

  दिपक,
  रिनाच्या कष्टांची जाण तिच्या कुटुंबियांनी ठेवावी असेच मलाही वाटते.

  आनंद,
  चला, कुणीतरी मान्य करतंय की पुरूषप्रधान संस्कृती नावाचा प्रकार अजूनही अस्तित्वात आहे. कारण हल्ली स्त्री दिन म्हणजे फॅड वाटू लागलंय.

  अनिरुद्ध,
  अशा परखड शब्दांतच या लोकांची निर्भत्सना करायला हवी. तितकंच कठोर शासनही!

  देवेंद्र,
  आपल्याला वाचताना काटा येतो तर जी व्यक्ती या परिस्थितीतून जाते, तिच्या अवस्थेची कल्पनाही न केलेली बरी.

  ReplyDelete
 13. खुप मस्त लेख लिहला आहे आवडला

  ReplyDelete