Wednesday, February 24, 2010

चोरावर मोर - द इटालियन जॉब (२००३)

प्रतिक्रिया: 
चार्ली क्रोकर आपल्या बुद्धीच्या जोरावर इटलीतील व्हेनिस शहरामधे ३५ मिलियन डॉलर किमतीच्या सोन्याची चोरी घडवून आणतो. बुद्धीच्या जोरावर अशासाठी की व्हेनिस नदीतील बोटींच्या वाहतुकीची गजबज व पोलिंसाचा ससेमिरा चुकवत, रक्ताचा एकही थेंब न सांडता ही चोरी केली जाते. चार्लीच्या ग्रुपमधील सर्वात वयस्क साथिदार जॉन ब्रिजर याच्या कारकिर्दीतील ही शेवटची चोरी असते.

आता आपलं उर्वरित आयुष्य आपल्या मुलीसोबत घालवण्याचा विचार तो चार्लीजवळ व्यक्त करतो. शिवाय तो चार्लीलाही हा सल्ला देतो की केवळ चोरी करण्यासाठी जगण्यापेक्षा एक चांगली मुलगी निवड आणि आपल्या सुखी आयुष्याला सुरूवात कर. दुर्दैवाने जॉनच्या ब्रिजरसाठी ही चोरी त्याच्या कारकिर्दीतीलच नव्हे, तर आयुष्यातीलही शेवटची चोरी ठरते. चार्लीच्याच ग्रुपमधील एक साथिदार फितुरी करतो. चोरी केलेलं सोनं जेव्हा चार्ली आपल्या ग्रुपसमवेत दुस-या ठिकाणी घेऊन असतो तेव्हा हा फितुर ते सोनं पळवतो आणि चोरावर मोर बनतो.

चार्ली आणि त्याचे इतर साथिदार फितुराने केलेल्या गोळीबारातून वाचतात पण त्यांना जॉनला गमवावंच लागतं. जॉनला आपल्या वडीलांच्या जागी मानणारा चार्ली जॉनच्या मृत्यूने पेटून उठतो. काहीही झालं तरी या फितुराला मी धडा शिकवणारच या हेतुने चार्ली त्या फितुराच्या मागावर निघतो. चोरीसाठी आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांत पारंगत असे आपले साथिदार मित्र आणि प्रत्यक्ष जॉन ब्रिजरची मुलगी स्टेला यांची त्याला या कामी मदत मिळते.


सोनं परत मिळवण्यापेक्षाही विश्वासघात करून जॉनचा खून करणा-या आपल्या शत्रुला धडा शिकवणं, हे चार्लीचं मुख्य उद्दिष्ट असतं पण चोरावर मोर झालेल्या त्या फितुराच्या जवळ जाणं इतकं सोपं नाही हे चार्लीला काही दिवसांतच कळून येतं आणि मग पुन्हा त्याच्या डोक्यात चोरीच्या निरनिराळ्या कल्पना आकार घेऊन लागतात. त्यातून एक योजना आकाराला येतेही पण मधेच कुठेतरी माशी शिंकते. चार्लीला आपली योजना बदलावी लागते आणि मग सुरू होतो खेळ ऊनसावलीचा.

चित्रपटाची सर्वात जमेची बाजू म्हणजे पार्श्वसंगीत. चित्रपट सुरू होताना दिसणा-या नामावलीपासून ते चित्रपटाच्या शेवटच्या भागात असलेल्या पाठलागाच्या प्रसंगापर्यंत पार्श्वभूमीवर वाजत रहाणारं संगीत आपल्याला त्या प्रसंगाशी एकरूप व्हायला मदत करतं. संगीतकार जॉन पॉवेल यांनी प्रसंगानुरूप वाद्यांचा वापर करत दमदार असं संगीत या चित्रपटाला दिलं आहे. ट्रॉय केनेडी मार्टीन यांच्या कथेला, पटकथालेखक डोना आणि वायन पॉवर्स व दिग्दर्शक एफ. गॅरी ग्रे यांची उत्तम साथ लाभली आहे. मेमेन्टो आणि द डार्क नाईट सारख्या चित्रपटांचं दृश्यचित्रिकरण हाताळणा-या वॉली फिस्टर यांनी या चित्रपटाचं दृश्यचित्रीकरण सांभाळलं आहे. शेवटपर्यंत खुर्चिला खिळवून ठेवणारी, चित्तथरारक अशी पाठलागाची दृश्य आणि त्यासाठी वापरलेल्या बोटी, कार्स आणि हेलीकॉप्टर यांनी चित्रपट एकदम स्टायलीश झाला आहे. चित्रपटाचं संकलन इतकं सुंदररित्या केलं आहे की चित्रपट पहाताना कुठेच कंटाळा येणार नाही.

12 comments:

 1. खुप दिवसापुर्वी हा चित्रपट पाहीला होता, खुप आवडला. यात माझी आवडती चार्लीझ थेरन आहे....

  ReplyDelete
 2. खुप सुंदर सिनेमा आहे. प्रत्येक फ्रेम कशी जखडुन ठेवते खुर्चीला. या सिनेमा प्रमाणेच क्लिंट इस्ट वुड चा द गुड बॅड अगली पण खुप आवडतो. ( इथे लिहु की नको.. पण पोलिस ऍकॅडमी चे सातही भाग मला पाठ आहेत :) )

  ReplyDelete
 3. आनंद,
  परवा हा सिनेमा पुन्हा पाहिला. चार्ली थेरन अशी साधीसुधीच छान दिसते. तिला हॅन्कॉक मधे कितीतरी मेक अप केला होता.

  ReplyDelete
 4. महेंद्रजी,
  हो. गुड बॅड अग्ली मी खूप लहान असताना पाहिला होता. बरी आठवण केलीत. येत्या रविवारी पाहिन म्हणते. पोलिस अकॅडमी तर मस्तच आहे. मल तो पंकचा रोल करणारा खूप आवडला. त्याचं बोलणं धड कुणाला समजतही नसतं, तरीही त्याला एक मैत्रीण मिळतेच. तुमच्या आवडत्या चित्रपटांचा उल्लेख इथे जरूर करा. मलाही मदत होईल :-).

  ReplyDelete
 5. सुरेख चित्रपट आहे हा. अतिशय वेगवान. मस्तच..

  पोलीस अकॅडेमीचा मी पण फॅन आहे. पोलिसात कोणीही भरती होऊ शकतं की कन्सेप्टच जबरदस्त आहे.

  ReplyDelete
 6. हेरंब,
  चित्रपट हा मुलत: मनोरंजनासाठी असतो त्यामुळे चित्रपट पहाताना इतर गोष्टींचा विसर पडायला लावणारं कथानक असेल, तर मला ते निश्चितच आवडतं.

  ReplyDelete
 7. मी तर हा चित्रपट 5 पेक्षा जास्त वेळा बघितला आहे. खुप अप्रतिम आहे. त्या सर्वांमध्ये एक कॉम्प्युटर इंजिनिअर पण असतो. त्याची सुद्धा एवढी मदत होते की सिग्नल यंत्रणा काबीज करणे किंवा रेल्वे ला थांबवणे वगैरे..सगळ्यंनी जरूर बघावा असा चित्रपट.

  अजुन हटके सिनेमा पैकी म्हणजे 'The Bourne Identity' किंवा 'The Bourne Ultimatum'.
  खुप छान आहेत हे सुद्धा.

  कोणी बघितला आहे की नाही माहीत नाही, पण एक सिनेमा आठवला 'Tom Yum Goong'. ऍक्शन मुव्ही आवडत असेल तर जरूर बघा. थायलंड मध्ये हत्तींना खुप महत्व दिलं जातं. सिनेमातल्या हिरो कडे सुद्धा हत्ती असतात. दुष्ट लोक कपट करुन त्या हत्तींना पळवतात आणि मग हिरो त्यांना परत कसा आणतो अशी स्टोरी आहे. अफलातून ऍक्शन पॅक्ड फिल्म आहे आणि ईमोशनल सुद्धा.

  ReplyDelete
 8. केदार, तू अगदी मनातलं ओळखलंस मी आता बॉर्न ट्रायॉलॉजीचाच विचार करत होते. The Bourne Identity (1980) The Bourne Supremacy (1986) The Bourne Ultimatum (1990)
  गेल्याच आठवड्यात हे तिनही चित्रपट पाहून झालेत. यावरही लिहीन. यातही साउंड इफेक्ट खूप छान आहेत. 'Tom Yum Goong' चे दोन भाग मी पाहिले आहेत. पहिल्या भागात आधुनिक थायलंड तर दुस-या भागातील कथेला पौराणिक वातावरणाची जोड दिली आहे.

  ReplyDelete
 9. कांचन, अगं हे सगळे सिनेमे आहेत आमच्या होम लायब्ररीत.शिवाय टिव्हीवरही सारखे लागतात. या आठवड्यातच Bourne Identity to Ultimatum हे तिनही सिनेमे सारखे दाखवत आहेत.मला सगळेच आवडले. बाकी क्लिंट इस्ट वुड बद्दल काय बोलावे.... एकुण एक सिनेमे पाहिलेत.
  अग, आत्ता पेबल बीचला गेलो होतो ना १७ होल्स पाहायला ( जगप्रसिध्द गोल्फ कोर्स ) तिथे क्लिंट इस्ट वुडचे घर आहे. किती वेळ शोधले आम्ही. :) पण तो नव्हता.:(
  परिक्षण मस्तच.

  ReplyDelete
 10. पाहिला आहे हा सिनेमा अगदी वेगवान आणी तंत्रकौशल्यही छान आहे...

  ReplyDelete
 11. भाग्यश्री, सिरीजमधे आलेले चित्रपट उदाहरणार्थ स्पायडरमॅन, बॉर्न..., हॅरी..., बॉन्ड...,स्टार वॉर्स यातील प्रत्येक चित्रपटावर स्वतंत्र लिहिण्यापेक्षा सिरीजवर एक चांगला लेख होऊ शकेल असं मला वाटतं. पहिल्या चित्रपटापासून ते शेवटच्या चित्रपटापर्यंत दिग्दर्शन, कलादिग्दर्शन, अभिनेते, संवाद, पूर्वसूत्र या चित्रपटातील महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकणं अधिक श्रेयस्कर होईल.

  क्लिंट इस्टवूडच्या घरापर्यंत जाऊन आलीस, हे तरी कमी आहे का? आम्ही नुसतं टी.व्ही.वर नाहीतर इंटरनेटवरच त्याचं घर पहातो. पुढच्या वेळी गेलीस तर तो भेटावा या शुभेच्छा!

  ReplyDelete
 12. देवेंद्र, या चित्रपटातील सर्वात रोमांचकारी दृश्य म्हणजे बोटीचा पाठलाग; ते मला फार आवडलं.

  ReplyDelete