Monday, February 15, 2010

एक रंग दोन अर्थ

प्रतिक्रिया: 
परवा रेडीओ क्लबला जाताना सहज ’ताज’कडे नजर गेली. ’हेच ते ठिकाण! इथेच ते सारं नाट्य घडलं.’ .... २६/११ च्या आठवणी अजून मनावरून पुसल्या गेलेल्या नाहीत. गाडी पुढे गेली तरी मनावर पसरेलेलं ते उदासीचं शेवाळ काही हटायला तयार नाही. मित्रांसोबत गप्पागोष्टी सुरू होत्या, तरी मनात निरनिराळे विचार येतंच राहिले. ’उद्या १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे! ... प्रेमाचा संदेश देताना लाल रंग अनिवार्य... रक्ताचा रंगही लालच. पण एक बॉम्बस्फोट लाल रंगाचे सारे संदर्भच बदलून टाकतो... लाल रंग म्हणजे क्रोध, हिंसा, आक्रोश...'

जेवण सुरू असताना मी अगदी आवर्जून सांगितलं, "आज मी कुणाचं ऐकणार नाही. प्रत्येक डिशचा फोटो घेणार." प्रत्येकानेच हसून संमती दिली. समोर निरनिराळ्या पदार्थांनी भरलेल्या डिशेस आल्या, जोडीला कोल्ड ड्रींक्स!.... पण घास घशाखाली उतरलाच नाही. फोटो साठी कॅमेरा उचलावासा वाटलाच नाही. मनावरचं ते शेवाळ आणखीनच काळपट हिरवं झालं.

".... आता मुंबईच्या जोडीने पुणेसुद्धा का?" कुणीतरी उद्गारलं. मी वळून पाहीपर्यंत बोलणा-याने त्याच्या पुढ्यातलं अन्न खायला सुरूवात केली होती. त्याने केलेल्या विनोदावर(?) त्याचे मित्र हसले. ’एक बातमी’ या पलिकडे अशा घटनांना फारसं महत्त्व द्यायचं नसतं, हे मुंबईकर व्यवस्थित शिकले आहेत.

थंड म्हणा, मुर्दाड म्हणा. निर्लज्ज, कोडगे, निर्ढावलेले म्हणा. पण आपण असेच आहोत आणि आपण असंच असलं पाहिजे. नाहीतर आपण जगणार कसे? सरकार बदलण्याची आपल्यात हिम्मत नाही. देश कसा बदलणार? रोज ८:४० ची लोकल गाठणार. आज तिच्यात बॉम्बस्फोट झाला, त्यातून जगलो वाचलो तर उद्या ९:४० ची लोकल पकडणार. परवा आहेच ८:४० पुन्हा!

घरी आल्यावर नव-यानेच आठवण करून दिली, "उद्यासाठी तुझ्या ब्लॉगवर टाकायला काही ग्रिटींग बिटींग हवंय का करून?" म्हटलं, "दे बाबा, बनवून." या वरचेवरच्या बातम्यांनी प्रेमातही लाल रंग असतो हे विसरायलाच झालंय."

16 comments:

 1. खूप छान लिहिल आहे, स्पेशली "रोज ८:४० ची लोकल गाठणार. आज तिच्यात बॉम्बस्फोट झाला, त्यातून जगलो वाचलो तर उद्या ९:४० ची लोकल पकडणार. परवा आहेच ८:४० पुन्हा!". अगदि बरोबर बोलत आहात तुम्हि मुंबईकरांना आता असे प्रसंग म्हणजे एक बातमी एवढ्च वाटत...

  ReplyDelete
 2. Mumbaikaranna hi fakta 'ajun ek batmi' asa watat asel, pan me ek Punekar ahe... Bharatatil sarwat safe city mhanun Punyachi olakh hoti. Jewha kalala ki Punyat bomb-blast zalay tewha pahili reaction hoti "Punyat bomb-blast?". Karan ha Punya war zalela pahila terrorist attack ahe.
  Ishwar mrutatmyanna shanti devo.
  -- Ek Punekar

  ReplyDelete
 3. निबर झालीयेत मनं आता.

  ReplyDelete
 4. अशा प्रतिक्रिया नेहमी Anonymous का येतात, हे कळत नाही. असो.
  मुंबईकरांनी आजवर इतके दहशतवादी हल्ले सहन केले आहेत की आणखी एक बातमी यापलिकडे फार कुणी महत्व देऊच शकत नाही. अगदी २६/११ च्या दिवशी सुद्धा ताजजवळ काय होतंय, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच होती पण सर्वांनी आपले दैनंदिन व्यवहारही सुरळीत ठेवले होते. संपूर्ण जग दहशतवादाच्या छायेखाली वावरत असताना आणि पुण्यातील जर्मन बेकरी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे, ही बातमी सर्वश्रुत असतानाही ’भारतातील सर्वात सुरक्षित शहर’ असा पुण्याचा नावलौकीक कायम राखला जावा, अशी अपेक्षा बाळगणं हास्यास्पद आहे. किंबहुना आपल्या राज्यकर्त्यांनाही तोच फाजिल आत्मविश्वास होता म्हणून हे घडलं. पुण्यावर झालेला हा पहिला हल्ला म्हणून तुम्हाला त्याचं आश्चर्य असेल. रोजच असे हल्ले सहन करून, जीव मुठीत धरून जगणारा मुंबईकर होऊन बघा एकदा. पुणे शहर जगाच्या नकाशावर एका ठिपक्याइतकं आहे, हे लक्षात येईल.

  ReplyDelete
 5. Anonymous pratikriya dili ahe karan maza nav ahe Kedar ani tithe adhich ek Kedar navane comment hoti ewdhech...
  Me Mumbaikaranbaddal kahich nahi bolat ahe ki tyanna hi ek fakta ek batmi watti ahe...asel, I don't have any problem..Mumbai karanna me salam karto tyanchya dhairyabaddal... me fakta ewdhach point out karto ahe ki Punekaranna hi goshta navin ahe...tyamule Mumbaikaranna hi fakta ek news ahe, yacha feeling amhala yava mhanun amhala Mumbaikar whaychi kahich garaj nahi...Punekar aslyacha abhiman ahe mala...me ajunahi hech sangtoy fakta ki Punyala ani Punekaranna hi goshta navin ahe.
  Ani ajun ek goshta mhanje German Bakery nhave tar Chabad House he target hota..he mahit aslya mule security wadhavli geli hoti tyamule te ek 'hard target' hota... mhanun German Bakery war halla zala
  -- Anonymous Kedar, PUNE

  ReplyDelete
 6. भयंकर घडलं. सरकारवरची 'आरोपपत्रं' ही आता अगदी गुळगुळीत झाली आहेत. तरीही ते सुधारणार नाहीत. विमानं उडवत येऊन 'स्पिरीट' ला 'सॅल्यूट' ठोकला कि सुटले ते. त्यांच्या त्या सॅल्यूटलाच ठोकलंय काल मि माझ्या ब्लॉगवर..

  ReplyDelete
 7. लिहिलं आहेस ते खूप बोलकं आहे.... पण मार्ग तर यातूनच काढायचा आहे ना... नुसतं 'मी काय करणार' म्हणून बसून पण चालणार नाही. मदतीचा हात थांबविता येणार नाही. स्वत:तील माणूसपण जपत रहायचं....जीवाला जपतो तसंच!

  सप्रेम
  अरुंधती
  --
  Sing, Dance, Meditate, Celebrate!
  http://iravatik.blogspot.com/

  ReplyDelete
 8. बोलतो तितक सोप नसत..
  सरकारी ढिसाळपणा आहे मान्य..
  पण चेकिंग चालू असेल कुठे security ची तर आपल्याही कपाळाला आठ्या पडतातच...
  आपण सहकार्य तर केला पाहिजेच... आणि आपण असे निर्जीव होवून चालणार नाही..
  पण अजून पाच वर्षांनी माझ्या शहरात बॉम्ब स्फोट झाला तर नवल नाही..
  जो पर्यंत या प्रवृत्ती होत आहेत.. तोपर्यंत अशा घटना टाळणे शक्य नाही..
  ते विचार करतात तसा विचार केला तरच अशा घटना टाळल्या जावू शकतात..
  गुप्तचर यंत्रणा, अंतर्गत सुरक्षा आणि स्थानिक पोलीस यांच्यात सुसूत्रता हवी
  तरच अशा गोष्टी टाळू शकतात
  नाहीतर नाहक जीव जाणार कुणाचाही...

  कदाचित राजेश खन्नाचे गाणे आपल्या आयुष्याचे गाणे होवून जाईल
  ये लाल रंग कब मुझे छोडेगा...
  कधी चांगला, कधी निराशावादी, कधी उग्र तर कधी हिंस्त्र असा लाल रंग...?

  ReplyDelete
 9. केदार,
  ’जिद्दीला सलाम’ वगैरे असं म्हणून आपण उसनं अवसान आणत असतो. तुमच्या शहरात बॉम्बस्फोट झाल्यावर जसा तुम्हाला अविश्वासाने धक्का बसला, तसे अनेक धक्के खाऊन मुंबईकर निबर झालाय. ही जिद्द नाही, ही अगतिकता आहे. तुम्हाला तर तुमच्या शहरात कोणती जागा हार्ड टार्गेट आहे, हे माझ्यापेक्षाही जास्त चांगलं माहित आहे. असं असताना तुम्हाला धक्का बसणं, आश्चर्याची गोष्ट आहे. पुणं जगाच्या बाहेर नाही, तेव्हा या गोष्टीचं एक मुंबईकर म्हणून मला विशेष वाटलं नाही. वैषम्य जरूर आहे की हळूहळू आपलं एक-एक शहर आतून पोखरलं जात असताना, आपण मात्र सरकार, सिस्टीम यांना दोष देत दिवस ढकलत असतो. स्वत:ला पोलिसाच्या कामात सहकार्य द्यावसं वाटत नाही. सुरक्षेसाठी केलेल्या चौकशीला आपण वैतागतो. हे बदललं नाही, तर सरकार तरी काय करणार?

  ReplyDelete
 10. हेरंब, तुझा ब्लॉग मी अजून वाचला नाहीये पण उद्या जरूर वाचेन. स्पिरीट कसलं रे? आपल्याला हे सगळं सहन करत जगायचंच असतं.

  ReplyDelete
 11. अरूंधती, तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. ’मी काय करणार नाही’ ही भूमिका बदलून, ’आता मीच करणार’ अशी आपली भूमिका असायला हवी. सरकार सुद्धा माणसांनीच बनलेलं आहे. ती काही सुपर पॉवर नाही.

  ReplyDelete
 12. अखिल, नेमकं हेच आपलं चुकतं. आपणच सहकार्य द्यायला कमी पडतो आणि दोष यंत्रणेकडे जातो. यंत्रणा १०० टक्के सक्षम आहे, असं मी म्हणणार नाही पण ’मला काय करायचंय’ ही वृत्ती आपल्याला नडते.

  ReplyDelete
 13. खरंच, स्पिरीट वगैरे काही नाही असं वाटतं बरेचदा...
  हैदराबादला कुठेही अगदी लोकलमध्येही कधीही काहीही होवु शकते... पण तरिही मी इथे आहे...
  स्पिरिट वगैरे काही नाही..कारण सगळीकडेच अशीच परिस्थीती आहे....पळुन पळुन कुठे पळणार...

  ReplyDelete
 14. barobar ahe tumcha Kanchan. Saglyanni sahakarya karayla have.
  Kuthun tari kewal kanavar alela asta ki halla hou shakto wagare...pan jewha kharach halla hoto ani shahrat asla kahitari pahilyanda ghadat asel, tar nischitach dhakka basto.
  We all must be together helping each other to fight against such unwanted & unsocial things.
  Ani ashya weli apan unity dakhavto/dakhavli pahije. Aaj paryant deshawar zalelya sarwa hallyanmadhe aplya deshani unity dakhavli ahe, ani koni bahercha yeun te todu nahi shakat.

  ReplyDelete
 15. आनंद,
  सार्वजनिक ठिकाणं बहुतांशी करून दहशतवाद्यांच्या हल्ल्याचं केंद्रबिंदू असतात. त्यामुळे कितीही टाळलं तरी बस स्टॉप, रेल्वे, बाजार या ठिकाणी आपल्याला जाणं भागच असतं. इथे स्पिरिट असून नसून उपयोग नाही. सर्वच जीवनावश्यक वस्तू घरबसल्या मिळत नसतात. नेमकं हे विघातक शक्तींचा वापर करणा-या लोकांना बरोबर उमगलंय.

  ReplyDelete
 16. केदार,
  भारत हा बहुधा एकमेव देश असावा, जो स्वत:हून इतर देशांवर हल्ला करत नाही. कदाचित आपल्या देशातील विविधतेतील एकतेचाच हा परिणाम असावा. बॉम्बस्फोटासारख्या दुर्दैवी क्षणांपासून धडा घेऊन आपल्या देशातील जनता कायदा व सुव्यवस्था राखणा-या यंत्रणेला मदत करेल, सहकार्य करेल तर ही दहशतवादाची कीड आपल्या देशातून नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.

  ReplyDelete