Saturday, February 6, 2010

नाना परिमळ

प्रतिक्रिया: 
सुवासिक साबण, अगरबत्ती, टाल्कम पावडर, परफ्युम या गोष्टी रोजच्या जीवनक्रमात इतक्या आवश्यक आहेत की सुगंध आपल्या आयुष्यातून अगदी हद्दपार करायचा म्हटला तरी ते शक्य नाहीये. काही लोकांना तर या सुवासाचं इतकं वेड असतं की त्यांच्या घरात पाच ते आठ निरनिराळे सुगंध असलेल्या अत्तराच्या आकर्षक बाटल्या तुम्हाला सापडतील. बाजारातही असे निरनिराळे सुगंध प्रचंड प्रमाणात विकले जातात. तुम्ही कुठच्याही मॉलमधे जा. प्रवेश केल्यावर अगदी सुरूवातीलाच तुम्हाला परफ्युमचा स्टॉल दिसेल. तिथे उभे असलेले सेल्समन ’सर, मॅडम..’ अशा हाका मारून आपल्याला परफ्युम पहाण्यासाठी बोलावत असतात. फेरारी, करेरा, बेनेटन असे कितीतरी निरनिराळे परफ्युम ब्रॅन्डस बाजारात उपलब्ध आहेत.

ह्या परफ्युम्समधेहि स्त्रीने वापरायचे व पुरूषाने वापरायचे परफ्युम निरनिराळे असतात. एकमेकांना आकर्षित करण्यासाठी असे स्पेशल परफ्युम वापरले जातात म्हणे. खरं खोटं वापरणाराच जाणे. मध्यंतरी एक प्रसिद्ध परफ्युम वापरणा-या ग्राहकाने सुगंध विक्रेत्या कंपनीवरच फसवणुकीची केस दाखल केली होती. त्याचं म्हणणं होतं की, "हा परफ्युम वापरल्यावर मुली तुम्हाला सहज पटतील, अशा आशयाची जी कंपनीची जाहिरात होती, ती पाहून मी परफ्युम खरेदी केला. पण प्रत्यक्षात मला मुली पटण्याऐवजी, दोन-तीन मुलींनीच मला पटकलं." असे काही तुरळक अपवाद सोडले, तरी काही सुगंध असे असतात की जे वापरल्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटू शकतं. उत्साह वाटू शकतो. पूर्वी अत्तराचा फाया कानात ठेवण्याची सवय काही लोकांना होती. अजूनही लग्नाच्या दिवशी नवरदेवाला अत्तराचा फाया कानात ठेवण्यासाठी दिला जातो.

परफ्युमचा शिडकावा कपड्यावर नाही, तर आपल्या शरिरावर करायचा असतो असं म्हणतात. काहींना विशिष्ट सुगंधाची अॅलर्जीही असू शकते. एखादा नवीन परफ्युम वापरल्यावर शिंका येणे, अंगावर पुरळ उठणं किंवा घेरी आल्यासारखं वाटणं असे प्रकार झाले, तर ताबडतोब तो परफ्युम वापरणं थांबवायला हवं. परफ्युम विकत घ्यायला जाताना कधीही अंगावर परफ्युमचा शिडकावा न करताच जावं. कागदाच्या पट्टीवर एका टोकाला हलकेच अत्तराचा शिडकावा करून ती पट्टी हवेत दोन-तीनदा हलवायची आणि नाकाजवळ फिरवायची. बाटलीतला सुगंध नेमका कसा आहे, हे पडताळून पहाण्याची ही एक कसोटी. पण अमूक परफ्यूम आपल्याला सूट होतो की नाही, म्हणजे आपल्याला चालतो की नाही हे जर पडताळून पहायचं असेल, तर तो परफ्यूम आपल्या मनगटाच्या आतल्या बाजूला लावावा आणि काही क्षण थांबावं. मग नाकापासून मनगटाचा तो भाग किमान एक इंच लांब ठेवून तो सुवास घेऊन पहावा. आपल्या शरिराचा गंध आणि मनगटाला लावलेला सुगंध यांचं मिश्रण होऊन एक वेगळाच सुवास आपल्याला अनुभवता येतो. हा सुवास जर आवडला, त्याने काही त्रास झाला नाही, तर तो परफ्युम घेण्यास काहीच हरकत नाही, असं समजावं.

काही लोक परफ्युम किंवा अत्तराचा इतका अति वापर करतात की त्यांच्या जवळून जाताना, हे अत्तराच्या हौदातच बुडून आले असावेत असं वाटतं. अत्तराचा अति वापर इतर व्यक्तींची डोकेदुखी होऊ शकतो हे नेहमी लक्षात ठेवा. काही सुगंध मुळातच सौम्य असतात. पण काही परफ्यूम खूप तीव्र असतात आणि एकदा का ते अंगावर लावले की हळूहळू आपल्या शरिराच्या गंधासोबत मिसळून ते सौम्य होतात. मात्र सगळेच परफ्युम असे सौम्य होत नाहीत म्हणून परफ्युम निवडताना काळजीपूर्वक निवडावा.

जेव्हापासून डिओडरंट स्वस्त दरात मिळू लागलेत, तेव्हापासून तरूणवर्गामधे त्याचा चांगलाच खप वाढला आहे. शे-दीडशे रूपयांना मिळणारी परफ्युमची बाटली कुणालाही सहज परवडण्यासारखी असते. शिवाय एक ते दीड महिना चालते. आणखी काय हवं? पण भरमसाठ किंमत असलेली उंची अत्तरं खरेदी करणारी लोकंही कमी नाहीत. सर्वसाधारणपणे २५० मि.लि. इतका द्राव असलेली बाटली सुद्धा दोन ते पाच हजारांपर्यंत, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त किंमतीला विकली जाऊ शकते. लोकांना असलेली सुगंधाची आवड आणि विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींभोवती असलेलं प्रसिद्धीचं वलय, या दोन गोष्टी सुगंध विक्रेत्यांनी अचूक हेरल्या. आता ब-याच नामवंत व्यक्तींच्या नावाने उपलब्ध असलेले परफ्युमही मोठ्या प्रमाणावर विकले जातात. अमिताभ बच्चनच्या नावाचा परफ्युम हे त्यातलंच एक उदाहरण. मात्र परफ्युम कुणाला भेट म्हणून देणार असाल तर जपून! न जाणो त्या व्यक्तीचा गैरसमज व्हायचा की त्यांच्या घामाचा दर्प तुम्हाला असह्य होतोय, म्हणून तुम्ही त्यांना ही भेट देत आहात.

मध्यंतरी सेंटेड इंकची पेन्स वापरण्याची लाट आली होती. पूर्वी प्रेमवीर पत्र लिहिल्यानंतर, ते सुगंधी व्हावं म्हणून त्यावर अत्तराचा हलकासा शिडकावा करून पत्र पाठवायचे. आता तर ह्या सेंटेड शाई सोबत सुगंधी कागदही मिळू लागलेत. म्हणजे या प्रेमविरांना केवढी मदत! गेल्याच वर्षी मला सुगंधी कागद वापरून बनवलेली एक लग्नाची पत्रिका आली होती. तो सुगंध इतका छान होता की मी ती पत्रिका बरेच महिने जपून ठेवली होती. पाच-सहा महिन्यांनंतरही तो सुगंध जसाच्या तसा होता.

प्रेम आणि सुगंध यांचं जवळचं नातंच आहे म्हणा ना! रुसलेल्या प्रेयसीला खुलवण्यासाठी सुंगंधी फुलं भेट म्हणून देणारा प्रियकर कुणाला आवडणार नाही? रोमॅंटीक वातावरणात रंग भरण्यासाठी आकर्षक रंगाच्या व आकाराच्या मेणबत्त्यांचा वापर सर्रास होतो. आता तर या मेणबत्याही सुवासिक बनल्यात. मगाशी मी सुवासिक साबणाचा उल्लेख केला होता. खास दिवाळीच्या वेळी बाजारात उटण्यासोबतच बरेच सुगंधी साबणही येतात. मोती साबण तर इतका लोकप्रिय झाला होता की दिवाळी आली म्हणजे मोती साबण खरेदी करायचाच असं मध्यमवर्गीय लोकांचं मत होतं. पूजा अर्चेसाठी लागणा-या अगरबत्त्यांच्या सुगंधामधेही वैविध्य असतंच. अगरबत्त्यांचा दीर्घकाळ दरवळणारा सुगंध सर्व वातावरणच बदलून टाकतो. अरोमा ऑईल हा एक प्रकार हल्ली फार लोकप्रिय झाला आहे. शरीराच्या मसाजसाठी स्पामधे अरोमा ऑईलचा वापर आवर्जून केला जातो. आंघोळीच्या पाण्यातही ह्या तेलाचा एखादा थेंब खूप छान सुगंध देऊन जातो.

सुगंध, अत्तर, कलोन, डिओ, स्प्रे, परफ्युम, खुशबू, परिमळ... काहीही म्हणा! ज्याला सुवासाचं वेड नाही, असा माणूस विरळाच. बालपणापासून असलेली ही सुगंधाची सोबत आपल्या जीवनाच्या अंतिम प्रवासापर्यंत कायम असते. संपूर्ण जगामधे दर चौथ्या सेकंदाला एक परफ्युमची बाटली विकली जाते, असं म्हणतात. यावरूनच कळतं की सुवासाने आपलं एकूण जगच व्यापून टाकलंय.

10 comments:

 1. खरच, सुगंधाचा मोह सगळ्यानाच असतो. मला मात्र इतर स्प्रे पेक्षा अत्तर खुप आवडतं.

  ReplyDelete
 2. एम. डी. रामटेके,
  अत्तर मलाही आवडतं. मंद सुगंध असेल, तर फारच छान.

  ReplyDelete
 3. मला खूप इच्छा आहे..
  पहिला पावूस पडल्यावर मातीचा जो सुगंध येतो न... त्याचे perfume बनवायचा..
  atleast कुठे बनला तर विकत घ्यायची...

  ReplyDelete
 4. मस्त एका वेगळ्या विषयावर लिहलं आहे.

  परफ्युम खरेदी वरुन मला एक मजेदार घटना आठवली. मी मध्यंतरी बाबांना परफ्युम भेट दिला त्यावेळी पहिल्यांदा मॉल मध्ये खरेदी केला. त्या विक्रेत्याने कागदाच्या पट्टीवर वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे करून मला ट्राय करायला दिले. अधून मधून तो वास पूर्णपणे घालवण्यासाठी कॉफीच्या बियां दिल्या वास घ्यायला. आधी मला वाटलं चॉकलेटचे तुकडे आहेत मी म्हटलं No Thanks. तेंव्हा तो म्हणाला वास घ्यायला दिल्यात. ;-)

  बाकी महिन्याला १००-१५० चा Deo घेण्यापेक्षा मला थोडा महाग असला तरी परफ्युम घेणे ठीक वाटते. वर्षभर पुरतो.

  ReplyDelete
 5. अखिल, पहिल्या पावसानंतर येणा-या मातीच्या सुगंधाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. त्या सुगंधाचा परफ्युम मिळाला तर सगळेच विकत घेतील.

  ReplyDelete
 6. सिद्धार्थ,
  हो, परफ्युम टेस्ट करताना मलाही एकदा कॉफीच्या बिया दिल्या होत्या. नशीब, नवरा सोबत होता म्हणून, नाहीतर मी पण तुझ्यासारखंच ’नो थॅंक्स म्हटलं असतं.’ :-) डिओचा सुगंध चिरकाळ टिकणारा नसतो. कुठे समारंभाला जायचं असेल, तर दीर्घकाळ टिकणारा परफ्युमच वापरलेला बरा.

  ReplyDelete
 7. खुपंच छान आणि सविस्तर!

  ReplyDelete
 8. आनंद, ह्या विषयावर जेवढं बोलू तेवढं कमीच!

  ReplyDelete
 9. हे बरोबर सांगितलत. काही लोक सेंटमधे आंघोळ करावी एवढा सेंट लावतात. डोकं भणभणत त्याच्याने.

  ReplyDelete
 10. भुषण, मला असा अनुभव दोन-तीन वेळा आला आहे.

  ReplyDelete