Friday, February 5, 2010

तुमचा मित्र

प्रतिक्रिया: 
कधी स्वत:चाचा शोध घ्यायचा असं ठरवलं, तर आपल्याकडे कितीतरी कल्पना, विचारांचा, कलेचा साठा आहे, हे लक्षात येतं. कामाचा व्याप म्हणा किंवा रोजच्या जीवनशैलीमुळे म्हणा आपल्याला स्वत:शीच संवाद करायला सवड मिळत नाही. कधी जर वेळ मिळाला, तर स्वत:मधेच इतके शोध लागतात की आपण असेही आहोत, हे आपल्यालासुद्धा नव्याने कळतं. हे असं होण्याचं कारण म्हणजे चाकोरीबद्ध जीवन जगण्याची आपल्याला सवय झालेली असते. झापडं लावलेल्या घोड्याला जसं डाव्या-उजव्या बाजूचं काही दिसत नसतं, तसंच काहीसं आपलं होतं. एकच एक लक्ष्य ठेवून नुसतं आपलं धावायचं.

या धावण्याच्या नादात नवीन कल्पना, नवीन विचार यांचं स्वागत करताना मन आधी नकारघंटाच वाजवतं. मग हळूहळू स्विकार केला जातो. आस्वाद घेणं दूरच राहिलं, आपल्याला ह्या नवीन कल्पनेबद्दल काही कळतच नसतं. चाकोरीबद्ध जीवनाचा हा सर्वात मोठा दुर्गुण आहे. समजा, आपण जसं वागतोय, त्याच्या अगदी विरूद्ध नाही पण थोडंसं वेगळं वागलं तर? कितीतरी अवघड प्रश्नांची उत्तरं सहज मिळून जातात.

कधीतरी अगदी सहज जसे आरशासमोर उभे रहातो तसंच उभं राहून स्वत:कडे नीट पाहिलं, तर आपल्याआतमधील खरीखुरी व्यक्तीच आपल्याकडे पहात आहे असं वाटतं. हीच ती व्यक्ती जिला तुम्ही शोधत असता.

कदाचित तुम्हाला गायक व्हायचं होतं पण इतक्या लहान वयात नोकरी करायला सुरूवात केली की तुमचं स्वप्न कधी पूर्णच झालं नाही. टी.व्ही. वरचं सारेगमप पहाताना तुम्हाला तुमचं स्वप्न आठवतं. ठीक आहे, नाही जमलं तुम्हाला गायक व्हायला पण बाथरूममधेही गाऊ नका, असं कुणी सांगितलंय का?

कदाचित तुम्हाला चित्रकार व्हायचं होतं पण वडीलांचा व्यवसाय सांभाळताना तुम्हाला या आवडीला मुरड घालावी लागली. आर्ट गॅलरीतलं प्रदर्शन पहाताना, नकळत तुमच्या तोंडून सुस्कारा बाहेर पडतो. सगळ्यांना सगळंच मिळतं असं नाही. तुमच्या घरच्या बाल्कनीत तुम्ही स्वत: काढलेलं एखादं चित्र नक्कीच लावू शकता. हो ना?

तुमच्या आत असलेला तुमचा मित्र कुठेही बाहेर सुटीवर गेलेला नसतो. तो नेहमीच तुमच्या सोबत असतो आणि तुमच्या सोबतीची अपेक्षा करत असतो. तुम्ही फक्त त्याच्या खांद्यावर हात ठेवायची गरज आहे.


13 comments:

 1. तुमच्या आत असलेला तुमचा मित्र कुठेही बाहेर सुटीवर गेलेला नसतो. तो नेहमीच तुमच्या सोबत असतो आणि तुमच्या सोबतीची अपेक्षा करत असतो. तुम्ही फक्त त्याच्या खांद्यावर हात ठेवायची गरज आहे
  हे अगदी खरे आहे
  प्रत्येकालाच आपल्या काहीना काही इच्छा मारून पुढे जावावे लागलेले असते ज्यांना असे काहीच करण्याची वेळ आली नाही ते खरच लकी असतात
  आपल्यातील स्वताला ओळखणे तसे पाहण्यास गेलेतर सोपे नाही
  असो मस्त लिहिले आहेस
  जीवनमूल्य

  ReplyDelete
 2. Kharach ashi kami lok astat ki je atta jya profession madhe ahet te kadhi kali tyancha swapna asta. Swatahamadhalya kalakarala kayam jiwant thewla pahije ya na tya margane. Tumhala kashachi hi awad aso, thodi tari jopasali pahije.
  Sundar likhan, awadla, inspiring...
  -- Kedar

  ReplyDelete
 3. विक्रम, Anonymous,
  प्रत्येकाचंच स्वप्न खरं होत नाही. पण म्हणून हताशपणे स्वप्न आठवत रहाण्यापेक्षा आहे ती परिस्थिती स्विकारून आपलं जीवन आपल्याला स्वप्नाच्या कितीतरी जवळ नेता येतं.

  ReplyDelete
 4. खरंय...मला अश्यातच माझा मित्र सापडला. आयुष्य थोडे सोपे झाले आहे ... ;-)

  खुप छान लिहिले आहे....

  ReplyDelete
 5. "पोटापाण्याचा उद्योग तर हवाच. पण नाटक,गाणं ,कविता, अशा एखाद्या कलेशी नातं ठेवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील आणि कलेशी असलेलं नातं जगायाचं कशासाठी ते सांगेल!"
  (सर्वांचे लाडके) पु.ल. देशपांडे

  ReplyDelete
 6. सौरभ,
  अगदी योग्य उदाहरण दिलंस.

  ReplyDelete
 7. बरोबर आहे..
  आपला आतला आवाज, अंतर्मन काय सांगतंय ते नीट ऐकायला हव..
  त्यासाठी त्याच्याशी आपण आधी बोलायला पाहिजे..
  थोडक्यात proxy network केला पाहिजे स्वताची..
  मग आपणच आपल्याला अधिक उकळत जातो..
  परिस्थिती स्वीकारावी जी आहे ती..
  फार मोठे स्वप्ना बघण्यापेक्षा... छोटी छोटी स्वप्न बघावीत.. ती पूर्ण पण करता येतात...
  आणि लगेच milestone गाठण्यापेक्षा..
  एका mile मध्ये येणारे बारीक बारीक stones गाठावेत..
  आपो-आप आपल्याला हवा असलेला milestone मिळतो... असे मला वाटते हा..

  बाकी लेख छान आहे..

  ReplyDelete
 8. कांचन, "माझ्यातल्या मी"चा शोध घेणारा तुझा लेख मनापासून आवडला.
  तसे तुझे सगळेच लेख अगदी सहजसुंदर असतात.

  ReplyDelete
 9. अखिल,
  माईलस्टोन गाठण्यासाठी खूप छान शब्दात प्रेरणादायी संदेश दिलास तू.

  ReplyDelete
 10. आनंद,
  आपल्याला सर्वात जास्त चांगलं ओळखणारे आपणच असतो. आत्मचिंतन केलं की आपोआपच न सुटलेली गणितं सहज सोपी वाटायला लागतात.

  ReplyDelete
 11. उमेश,
  आपल्या अभिप्रायासाठी आभारी आहे.

  ReplyDelete
 12. क्रांति, प्रतिक्रियेसाठी आभार.

  ReplyDelete