Tuesday, February 2, 2010

तुझे आहे तुजपाशी

प्रतिक्रिया: 
"खरं सांगू का, ही गर्दी मला सहा डिसेंबरला शिवाजी पार्कच्या मैदानावार होणा-या गर्दीसाठीच वाटते. शिवाजी पार्कवर जी गर्दी होते, त्याला लोक हसतात आणि हे काय निराळं आहे का?" एक बाई सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगेकडे पाहून म्हणाल्या. मी प्रतिसादादाखल नुसतंच हसले. आज अंगारिका असल्याने सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी लागलेली रांग पोर्तुगीज चर्चपर्यंत आली होती. आधीच मुंबईत वाहतुकीचे तीन तेरा वाजलेले असतात, त्यात असा दिवस उगवला की अमका रस्ता बंद, तमक्या रस्त्याला एकतर्फी वाहतूक हे ठरलेलंच!

"आपल्या घरात गणपती नसतो का? त्याची पूजा करायचं सोडून हे लोक देवळातल्या गणपतीसाठी एवढी गर्दी का करतात?" बाई पुढे बोलतच होत्या. खरंच होतं की ते! घरातल्या गणपतीची पूजा करून देवळातल्या गणपतीच्या दर्शनालासुद्धा जायचं की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण अशी लांबच लांब रांग पाहिली की मलाही नेहमी हा प्रश्न पडतो की घरातल्या गणपतीपेक्षा, देवळातला गणपती जास्त पॉवरफुल असतो का? ज्या लेकराच्या भल्याची चिंता वहायची, त्याच लेकराला कडेवर घेऊन उन्हातान्हाचं दोन-दोन तास रांगेत रखडायचं. पुन्हा दर्शन नीट मिळत नाहीच. कुठेतरी कोप-यात उभं रहायचं आणि घाईघाईत नवस बोलायचा. नवस पूर्ण झाला की तो फेडण्यासाठी पुन्हा रांगेत उभं रहायचं. हाच नवस घरातल्या गणपतीसमोर बोलला तर तो पूर्ण होत नाही का? कॉलेजच्या प्रवेशासाठी रांगेत उभं रहाताना कटकट करणारी तरूण मुलंसुद्धा देवाच्या दर्शनासाठी शिस्तीत रांगेत उभी रहातात, तेव्हा मला आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. अशा रांगा लावताना कुणालाच वाहतुकीची समस्या, गैरसोय, ध्वनीप्रदूषण याबद्दल काहीच वाटत नाही.

माझ्या ओळखीचे एक गृहस्थ अपत्यप्राप्तीसाठी दर मंगळवारी पहाटे दोन वाजता ठाण्याहून अनवाणी चालत प्रभादेवीपर्यंत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येत असत. त्यांच्या प्रार्थनेला फळ आलं की आणखी कशाला माहीत नाही पण ते एका गोंडस मुलाचे बाबा मात्र झाले. आता त्यांना सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पूर्वीसारखी पहाटे दोन वाजता सुरू होणारी ठाणे ते प्रभादेवी अनवाणी पदयात्रा करण्याची गरज वाटत नाही. जसा वेळ मिळेल, तसं दर्शनासाठी जातात. मला हा प्रकार ’गरज सरो....’ सारखा वाटला. लाचलुचपत रोखली पाहिजे असं आपण म्हणतो पण आपल्या उद्देशपूर्तीसाठी नवस बोलणं हे देवाला लाच देण्यासारखंच नाही का? आपल्या आर्थिक कुवती नुसार प्रत्येकाचा नवस निराळा - पाच नारळांचं तोरण, १०१ मोदक, सोन्याचं जास्वंदीचं फूल इ. इ. देवाला या सगळ्याची खरंच गरज असते का? मग हे आपण घरातल्या देवासाठी का नाही करत? त्याच्यासमोर नेहमीचा नैवेद्य ठेवून, "देव बिचारा वासाचा धनी", असं का म्हटलं जातं?

सार्वजनिक गणेशोत्सवामधेसुद्धा ज्या विभागाच्या गणपतीची मूर्ती जास्त उंच त्या विभागाची प्रसिद्धी जास्त. चित्रपट तारे तारका, इतर क्षेत्रातील नामवंत मंडळी त्या ठिकाणी आपली हजेरी लावून गणपतीच्या प्रसिद्धीला हातभार लावणार. मला तर आता गणपतीचीच दया येते. दहा दिवस बिचारा आपल्या मूर्तीच्या उंचपणामुळे आणि या प्रसिद्ध मंडळींच्यामुळे प्रकाशझोतात येतो. अकराव्या दिवशी त्याचे ’भक्तगण’ नाशिक ढोल आणि आणखी कसलं कसलं संगीत बडवून याला तलाव नी समुद्रापर्यंत सोबत करतात. दुस-या दिवशी हेच भक्तगण जर त्याच ठिकाणी जात असतील, तर आपण देवाचं विसर्जन करतो म्हणजे नेमकं काय करतो, हे त्यांना उघड्या डोळ्य़ांनी पहायला मिळत असेल. एक गाव एक गणपतीची संकल्पना कुठे दिसतच नाही.

अरे, पत्रिकेवर छापलेला गणपती पायाखाली येऊ नये म्हणून आपण पत्रिकेचं विसर्जन करतो, त्यापेक्षा गणपती छापूच नका ना, पत्रिकेवर! गणपतीचं चित्र नसेल, तर नवदाम्पत्याला काय आशिर्वाद मिळणार नाहीत का? आणि ज्यांच्या लग्नाच्या पत्रिकेवर गणपती छापलेला होता, ती सगळीच लग्न शेवटपर्यंत ’टिकली’ का? असं असेल तर तमाम हॉलीवूड चित्रपट तारे तारकांनी त्यांच्या वेडींग इन्व्हिटेशनवर गणपतीचं चित्र छापावं. अनब्रेकेबल मॅरेज गॅरेंटेड!

मुरूमांवरच्या औषधाची एक जाहिरात होती. त्यात एक मुलगी काच साफ करत असते पण काही केल्या काच साफच होत नाही, तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, "अंदरसे क्लिन नही हो, तो बाहर से क्लिअर कैसे दिखोगी?" म्हणजे काच दोन्ही बाजूंनी स्वच्छ असेल, तरच आरपार स्पष्ट दिसेल. आपल्या उद्देशपूर्तीसाठी स्वत: प्रयत्न न करता देवाला वेठीला धरण्यात काय अर्थ आहे? काही ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनसुद्धा ईप्सित साध्य होत नाही, तेव्हाही लोक देवालाच दोष देतात, ते कशासाठी? आपल्या यशापयाशाचा विचार करण्यासाठी आत्मचिंतनाची जास्त आवश्यकता असते, हे आपण विसरलो आहोत का?

13 comments:

 1. अगदी सार्थ लिहिलं आहेस कांचन ताई, मला तर देऊळ आणि दुकान यात फरकच जाणवत नाही. कधी कधी देवाला गेलेलो अस सांगण्याऐवजी मी सरळ दुकानात गेलेलो दर्शनाला अस चुकून बोलून जातो !! माणसाला देव दिसत नाही हेच खरं, जर दिसत असता तर देवाला इतकी गर्दीच झाली नसती .. :)

  ReplyDelete
 2. विरेंद्र,
  आपल्या आयुष्यात घडणा-या प्रत्येक चांगल्या वाईटासाठी देवाला जबाबदार धरण्याचं केव्हा थांबणार आहे, हेही माहित नाही.

  ReplyDelete
 3. महागाचा हार घालणं. शंभर लोकांना प्रसाद वाटणं वगैरे सगळे लाच लुचपतीचेच प्रकार आहेत . अमिताभ बच्चन पण पायी गेला म्हणुन लोकांनी पण तेच सुरु केलं. मिडिया आहेच अशा घटनांना जास्त पब्लिसाइझ करायला..

  ReplyDelete
 4. हे वाचल्यावर 'मी माझा' मधली एक चारोळी आठवली...

  देवळात जावून माणूस
  दुकानात गेल्यासारखं वागतो
  चार्-आठाणे टाकून
  काहीतरी मागतो.

  छान लिहिलं आहेस कांचन!

  -अनामिक

  ReplyDelete
 5. अगदी बरोबर..माझे हेच विचार आहेत.

  ReplyDelete
 6. महेंद्रजी,
  मला तर वाटतं या सेलिब्रिटींच्या हजेरीमुळेच देवाभोवती प्रसिद्धीचं वलय जमलं आहे. देवाचा उपयोग हल्ली राजकारणातही होऊ लागला आहे.

  अनामिक,
  खरंच आहे हे! देऊळ म्हणजे एक प्रकारचं दुकानच झालं आहे.

  आनंद,
  आजही वृत्तपत्रात गर्दीचा मोठा फोटो आला आहे.

  ReplyDelete
 7. लोकं म्हणतात देव सगळी कडे असतो, मग तेच लोकं काही मोजक्याच देवळांना का गर्दी करतात? तसेच काही विशिष्ट देवांना विशिष्ट वार असतो याचा तर मला फार राग येतो, शनी मंदिरात जर सोमवारी गेलो तर काही शानीदेवांना दुख नाही होणार, उलट आनंदच होईल. पण आपण जर ह्या गोष्टी कोणाला सांगायला गेलो ना.. तर "नास्तिक" म्हणून छान पदवी मिळते, त्यामुळे आता मी हे बोलणच सोडून दिलंय. एकदम बरोबर लिहिलयेस तू .. मनात असे बरेच काही प्रश्न संतापारूपी दडून आहेत.. तू त्याना छान शब्दरूप दिलेस. धन्यवाद!

  ReplyDelete
 8. प्रितम, भक्त प्रल्हादाचा देश, तुकारामांचा देश तो हाच का? असा मलाही प्रश्न पडतो.

  ReplyDelete
 9. नवस म्हणजे पूर्वापार चालत आलेली पोस्ट पेड स्किमच नाही का? इथे फक्त देवाकडून सर्विस घ्यायची आणि मनाप्रमाणे लाभ झाला तर पेमेंट करायचे.

  >> आपल्या आयुष्यात घडणा-या प्रत्येक चांगल्या वाईटासाठी देवाला जबाबदार धरण्याचं केव्हा थांबणार आहे, हेही माहित नाही.

  ह्यावरून शाळेतल्या धड्यातले एक वाक्य आठवले. जेंव्हा माणूस आजूबाजूच्या घटनांचा किंवा यशापयाशा मागील कारणांचा निष्कर्ष लावू शकत नाही तेंव्हा नकळत तो त्याचे संदर्भ आकाशातील ग्रह तार्‍याशी जोडुन मोकळा होतो.

  ReplyDelete
 10. Mazyakade ek kavita ahe email madhun milaleli. Baryach jananna mahit sudha asel. Ithe dyawishi watli. Nakki wacha shewatparyant. --Kedar

  "
  परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
  दोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकला
  उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला
  मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला


  तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस ?
  मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस
  मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक
  तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक

  इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
  भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो
  काय करू आता सार मॅनेज होत नाही
  पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाहीत
  इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग
  तरीदेखील संपतच नाही भक्तांची रांग
  चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात
  माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात

  माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन
  मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन
  एम बी ए चे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे ?
  डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस कारे ?
  असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक
  तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक
  म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको
  परत येउन मला दमलो म्हणायला नको
  माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश
  माग म्हणाला हवं ते एक वर देतो बक्षिस
  सी ई ओ ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप
  ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप


  मी हसलो उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं
  म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं

  'पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं '
  'सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं'
  'हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव'
  'प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव '
  'देशील आणून परत माझी हरवलेली नाती '
  'नेशील मला परत जिथे आहे माझी माती '
  'इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं '
  'आईबापाचं कधीही न फ़िटणारं देणं '
  'कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर '
  'भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार '
  'य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान'
  देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान ?

  बाप्पा "तथास्तु" म्हणाला नाही,
  सोंडेमागून नुसता हसला
  सारं हाताबाहेर गेलंय पोरा "सुखी रहा" म्हणाला.
  "

  ReplyDelete
 11. सिद्धार्थ, आपणच देवळाचं दुकान केल्यावर उद्या देवसुद्धा कामच्या स्वरूपाप्रमाणे नवसाची ’व्हॅल्यू’ ठरवायला लागले, तर नवल वाटायला नको.

  अनामित, कविता वाचली. खूप छान आहे. आता देवानेच माणसाकडे ’मला सोड’ असा नवस मागण्याची वेळ आली आहे, असं वाटतं.

  ReplyDelete
 12. शराब पीने दे मस्जिद मे बैठकर
  या फिर वो जगह बता दे जहां खुदा न हो !

  (गालिबचा शेर आहे कदचित )

  ReplyDelete
 13. संजय, कल्पना नाही कुणाचा शेर आहे पण देव सगळीकडे आहे, या वाक्याशी तंतोतंत जुळणारा आहे.

  ReplyDelete