Thursday, February 4, 2010

सुंदर ललना

प्रतिक्रिया: 
एका स्त्रीने दुस-या स्त्रीला सुंदर म्हणणं ही खूपच दुर्मिळ गोष्ट. इतरांची उदाहरणे कशाला द्यायची, मी स्वत: माधुरी दीक्षित या मदनिकेच्या सौंदर्यद्वेष्ट्यांमधे सामिल होते. या ललनेला मी कधी प्रत्यक्ष पाहिलं नाही पण तिचं हास्य, तिचा आवाज मला पहिल्यापासूनच आवडत गेला आणि स्त्रीसुलभ भावनेतून मी नकळत तिचा मत्सर करू लागले. तिचं सौंदर्य माझ्यासारख्याच कित्येक स्त्रियांच्या मत्सराला कारणीभूत ठरलं असेल, कुणास ठाऊक?

त्याही आधी जिच्या सौंदर्याने एक स्त्री म्हणून मला प्रभावीत केलं असेल तर ती आहे, रेखा. आवाज आणि डोळे यांची निसर्गदत्त देणगी मिळालेल्या या अभिनेत्रीच्या सौंदर्याने घायाळ झालेल्या पुरूषांची संख्या काही कमी नाही. रेखाचं सौंदर्य मला कायम एक गूढ वाटत आलं आहे. ते गूढ तसंच रहावं या हेतूने या अभिनेत्रीची प्रत्यक्ष भेट घेण्याचा विचार मी कधीच मनावर घेतला नाही.

मी प्रत्यक्ष पाहिलेल्या अभिनेत्रींपैकी दोन अभिनेत्रींच्या सौंदर्याने मी अवाक् झाले होते. पहिल्या आहेत वस्त्रहरण नाटकात काम करणा-या संजीवनी जाधव. संजीवनींना मी प्रत्यक्ष पाहिलं ते वस्त्रहरणच्या मध्यंतरामधे. वास्तविक नाटकाच्या प्रयोगासाठी केली जाणारी रंगभूषा ही खूप गडद असते. पण त्या गडद मेक अप मधेही संजीवनी इतक्या सुंदर दिसत होत्या की त्यांनी मला माझं नाव विचारलं नि मी त्याचं उत्तर दिलं इतकंच मला आठवतं. त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी लोकं येत होती, मधेच कुणीतरी चहा आणून दिला तरी माझं सगळं लक्ष त्यांच्या चेहे-यावर एकवटलेलं होतं. इतक्या भडक रंगांमध्येही ही स्त्री इतकी सुंदर कशी काय दिसू शकते, असा मला प्रश्न पडला होता. त्यांचं संजीवनी हे नाव सार्थ आहे असं मला त्यावेळी वाटून गेलं.

त्यानंतर ’हृदयी वसंत फुलताना’ हे नाटक पहाण्यासाठी मी कल्याणला गेले होते, त्यावेळेस ऐश्वर्या नारकरला अगदी हाताजवळच्या अंतरावरून पाहिलं होतं. साधा पंजाबी ड्रेस, केसांचा अंबाडा बांधलेला, स्वच्छ धुतलेला चेहेरा आणि कपाळावर ठसठशीत कुंकवची टिकली. बहुधा तिच्या नाटकाचा प्रयोग संपवून ती घरी चालली होती. तिच्या चेहे-यावर जी सोज्वळ तकाकी होती ती पाहून असं वाटलं की आजपर्यंत कुठलाच कॅमेरा ऐश्वर्याचं खरं सौंदर्य आपल्या चौकटीत बंदिस्त करू शकलेला नाही. तिच्याकडे पहाताना मला नाटक पहाण्यासाठी आत जायचंय हे विसरायला झालं.

रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत अशा कित्येक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या सौंदर्याला वरवरच्या रंगरंगोटीची गरज नाही. आपल्या विचारांचं प्रतिबिंब आपल्या चेहे-यावर उमटतं असं म्हणतात. या अभिनेत्रींचं सौंदर्य खुलवण्यामधे त्यांच्या सुंदर विचारांचाच तर वाटा नसेल ना?

10 comments:

 1. आमचा बुवा मिलिंद गुणाजी आवडता. एकदम रांगडे आणि डोंगरात रापलेले सौंदर्य.
  बाकी साजूक तुपातले म्हणाल तर मग मृणाल कुलकर्णी. तशी अध्ये-मध्ये दीपा परब स्वप्नात येते.

  ReplyDelete
 2. माहित नाही पण मलाही दीपा परब फार आवडते...मला वाटत होते की ती मलाच फक्त आवडते की काय...पण आहेत, तिचेही खास उल्लेख करणारे चाहते आहेत तर!
  माधुरी तर अप्रतिमच! खूपच सुंदर दिसायची ती!
  मृणाल चे केस फार विरळ आहेत!

  ReplyDelete
 3. माधुरी व रेखा,
  क्या बात है. मेरी तो छूट्टी हो गयी.

  तसं मला दक्षीणेतील रम्या, सौदंर्या पण खुप आवड्तात. मीना सुद्धा.

  ReplyDelete
 4. माधुरी खासंच..मला मौसमी चॅटर्जी, रायमा सेन खुप आवडतात... :)

  ReplyDelete
 5. "माझा आवडता नायक?" ह्या प्रश्नाला माझे उत्तर काळानुसार बदलत आले आहे. पण आवडती नायिका म्हणजे एकमेव आणि ती म्हणजे माधुरी दीक्षित. बाकी आधून मधून सोनाली बेंद्रे, स्वदेसच्या वेळी गायत्री जोशी हल्ली मध्येच प्रिया बापट वैगरे अपील झाल्या पण माधुरीची जागा कुणी घेतलेली नाही बॉ.

  ReplyDelete
 6. @ पंकज,
  तुला आवडणारच मिलिंद गुणाजी. तोही भटकंतीवाला ना! अरे का मॅरिड मुलींची स्वप्न पहातोस? आता अमृता खानविलकर, मुक्ता बर्वे यांनाही जागा दे की स्वप्नामधे. मला स्वत:ला मिलींद सोमण अजून आवडतो. पण तो स्वप्नात आला नाही कधी.

  @ Ashwinis-creations,
  दीपा परब (परब कसली आता ती चौधरी झाली. अंकुश चौधरीचं तिच्यासोबत गेली पंधरा वर्ष अफेअर होतं.) साधीसुधी वाटते. गर्ल नेक्स्ट डोअर. माधुरी म्हणजे काय वेगळंच मिश्रण होतं. मृणाल मला आवडते पण तेवढी नाही.

  @ एम. डी. रामटेके,
  रेखा म्हणजे मला पडलेलं एक कोडं आहे. या पलिकडे मी जास्त काही सांगू शकत नाही.

  @ आनंद पत्रे,
  मौसमी तरूणपणापेक्षा आता जास्त छान दिसते असं वाटतं. माझ्या वडीलांना झरीना वहाब फार आवडायची. स्मिता पाटील ही माझ्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक पण ती मला सौंदर्यापेक्षा अभिनयासाठी जास्त आवडायची.

  @ सिद्धार्थ,
  हां ना राव! माधुरी ती माधुरीच. नायक म्हणून बच्चनशिवाय आपल्याला कुणीच आवडला नाय. अजूनही तो पडद्यावर दिसला की मी उत्सुकतेने पहात असते.

  ReplyDelete
 7. मधुबाला आणि ऑड्री हेपबर्न ... दोघींही खूपच जुन्या ... मी त्यांना पडद्यावर बघितलं तोवर त्यांचे चाहते म्हातारे झाले होते - पण सुंदर स्त्रीचा चेहेरा म्हटलं की मला हीच दोन नावं पहिले आठवतात!

  ReplyDelete
 8. गौरी,
  मधुबालाचं सौंदर्य स्वर्गीयच आहे. ऑड्री हेपबर्न खूप रेखीव दिसते. मला तिच्या चेहे-यात कधी साधना तर कधी आशा पारेखच्या चेहे-याची झलक दिसते.

  ReplyDelete
 9. काही अभिनेत्रींच सौंदर्य वादातीत आहे
  मलाही कालानुरूप आणि चित्रपटातील त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका यानुसार अभिनेत्री आवडत गेल्या आहेत
  पण कोणी 'पेरिझाद झोराबियन' हिचे नाव ऐकले आहे का मला ती जॉगर्स पार्क या चित्रपटामुळे खूप आवडली होती ;)
  जीवनमूल्य

  ReplyDelete
 10. विक्रम,
  पेरिझादही खूप सुंदर आहे. तिचं सौंदर्य भारतीय वाटत नाही. माझ्या मते अस्मि वाल्यांनी पेरिझादचं सौंदर्य अचूक ओळखलं होतं. अस्मिच्या जाहिरातीत पेरिझाद इतकं सुंदर कुणीच दिसलं नाही.

  ReplyDelete