Saturday, January 30, 2010

योग्य समस्येचं निराकरण

प्रतिक्रिया: 
ह्या असल्या स्टूलावर उभं राहून मी नाही काम करायची!" सरलाने ठणकावून सांगितलं आणि ती निघून गेली. कौमुदी तिच्याकडे पहातच राहिली. सरलाचंही बरोबर होतं म्हणा. स्टुलाचा एक पाय किंचीत ढिला झाला होता त्यामुळे उंचावरची एखादी वस्तू काढण्यासाठी स्टुलवर उभं राहिलं की तो डुगडुगत असे.

आधीच सरलाच्या डाव्या पायाचा गुडघा दुखत असायचा. त्यात हा असला डुगडुगणारा स्टुल म्हणजे अपघाताला निमंत्रणच. कौमुदी तिला काही बोलली नाही. आठवड्याभरानंतर कौमुदीने सरलाला पुन्हा त्याच स्टुलवर उभं राहून काम करायला सांगितलं.

"सरला, आता तुला हवा तसा स्टूल करून दिला आहे. आता तरी करशील ना काम?" कौमुदीने उत्साहात विचारलं.

सरलाने तो स्टुल हाताने हलवून पाहिला आणि ती वैतागून म्हणाली, "काय बाई, स्टूल तर जसाच्या तसाच आहे."

"जसाच्या तसा कुठे गं, सरला? मी त्याला चांगला रंग लावून घेतला ना! बघ, किती छान दिसतोय." कौमुदी म्हणाली.

"अहो, बाई, स्टूल डुगडुगतोय म्हणून मला काम करायला जमत नाही. त्याच्या देखणेपणाचा मला काय फायदा?" सरलाने कपाळावर हात मारला.

कौमुदीने खरंच योग्य समस्येचं निराकरण केलं होतं का? कौमुदीने तिला कळालेल्या समस्येचं निराकरण केलं होतं पण त्याने हेतू सफल झाला का? सरलाने तिची समस्या योग्य शब्दांत मांडली होती का?

या तीनही प्रश्नांचं उत्तर ’नाही’ असंच येईल. आपल्या कळत नकळत आपणही आपल्या आयुष्यातील समस्या अशाच हाताळतो का?

8 comments:

 1. बरोबर आहे, समस्या वेगळीच आणि आपण उपाय वेगळेच शोधत असतो :)

  ReplyDelete
 2. ब-याचदा मूळ समस्येकडे दुर्लक्ष होतं, तात्पुरते उपायही केले जातात आणि काही काळानंतर ती समस्या पुन्हा उद्भवते तेव्हा आधीच लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं, असं वाटून जातं.

  ReplyDelete
 3. हो खरं आहे. अनेक साध्या साध्या गोष्टी असतात पण नकळत त्या कधी कठीण होऊन जातात हे कळत देखील नाही. आमचे बाबा नेहमी म्हणतात कपड्याचा एखादा जरी टाका निघाला तरी लगेच शिवून टाकावा नाहीतर कपडा फाटतच जातो.

  ReplyDelete
 4. सिद्धार्थ, खूप सुंदर उदाहरण दिलं आहेस. आपल्या आईवडीलांचे अनुभवाचे बोल असतात ते!

  ReplyDelete
 5. Mhanunach Corporate World madhe sangitla jata ki "speak out what u feel, what u want, don't hesitate. ask thousands of times if u don't understand." samasyecha samadhan hoil ki nahi hi nantarchi goshta ahe, pan adhi samasya neet mandli geli pahije.
  -- Kedar

  ReplyDelete
 6. तुम्ही अगदी बरोबर लिहिलं आहे, केदार. जर नेमकी समस्याच माहित नसेल, तर आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा प्रकार होतो.

  ReplyDelete
 7. jakham mandila ani malam shendila !! :)

  ReplyDelete
 8. घनशाम, थोड्या वेगळ्या शब्दांत पण अचूकपणे मूल्यमापन केलंत. ब्लॉगवर स्वागत आहे.

  ReplyDelete