Tuesday, January 19, 2010

सदैव – पान ९

प्रतिक्रिया: 
इकडे निराश हुन कसाबसा आपल्या महालात पोहोचला पण त्याला चैन पडेना. आपण मोईचा विश्वासघात केला आहे, ही भावना त्याचं मन कुरतडू लागली. त्याच्या खांद्यावरची जखम पाहून त्याच्या पिताश्रींनी, सरदार झाओने त्याला प्रश्न विचारले पण हुनने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तो सरळ आपल्या शयनकक्षात निघून गेला आणि मलमपट्टी करून शांत पडून राहिला.

मोई आत्ता काय करत असेल याचा विचार करता करता, मोईसोबत घालवलेले कित्येक क्षण त्याच्या डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभे राहिले. इकडे मोईचीही अवस्था काही निराळी नव्हती. रात्री झोपेऐवजी तिच्या डोळ्यांतही हुनच्याच आठवणी जमा झाल्या होत्या.

“तुंग, तू मला सोडून नाही ना रे जाणार?” मोईने त्याला विचारलं होतं.

“चल, वेडी आहेस का? अंग मी तर तुला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे.” हुनने तिच्या कमरेभोवती आपल्या हातांचा विळखा घालत म्हटलं.

“खरंच! पण कधी रे होईल असं?”

“आत्ता! अगदी या क्षणी!” असं म्हणून हुनने आपली मिठी घट्ट केली. मोईला त्या मिठीत इतकं सुरक्षित वाटत होतं की आता सर्व जग जरी तिच्याविरुद्ध गेलं तरी सामना करण्याची तयारी होती तिची. तिने डोळे उघडून पाहिलं तर हुन तिच्या चेहे-याकडे एकटक पहात होता.

“काय पहातोयंस?” त्याच्या डोळ्यात बघत तिने विचारलं.

या वेळी मात्र हुनने बोलण्यापेक्षा कृतीवर भर दिला. मोईचे ओठ त्याच्या ओठांमधे बद्ध झाले. ’ओह तुंग’ असं म्हणत मोई त्याला अधिकच बिलगली. मिटलेल्या डोळ्यांपुढे तिला तुंगचाच चेहेरा दिसत होता.

मोईने डोळे उघडले. डोळ्यांसमोरचा अंधार पाहून ती वास्तवात आली. तुंगचं प्रेम म्हणजे आपल्याला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं आणि तुंग म्हणजेच सरदारपुत्र हुन, हे वास्तव स्विकारताना तिला खूप जड जात होतं. आपल्या हुंदक्याच्या आवाजांनी बाबांना जाग येऊ नये म्हणून तोंडावर हात दाबून मोईने रडून घेतलं.

*******
आज एक आठवडा झाला. हुन रोज संध्याकाळी ठरलेल्या वेळी त्याच झाडाजवळ मोईची वाट पहायचा पण त्या प्रसंगानंतर मोई आलीच नाही. त्याने गावात शिरून तान फू व्यापा-याच्या घराजवळ दोन-तीन वेळा फे-याही मारून पाहिल्या पण मोई त्याला कधीच दृष्टीस पडली नाही. कदाचित नदीवर पाणी भरताना तरी मोईचं दर्शन होईल या अपेक्षेने हुन सकाळीसुद्धा नदीवर जात असे पण बहुधा तो नदीवरही येणार, याचा अंदाज असल्याने मोईने आपली नदीवर येण्याचीही वेळ बदलली होती. मोईच्या घरी जाऊन यावं असा विचार त्याच्या मनात आला होता पण तसं करणं म्हणजे विनाकारण मोईची बदनामी तेव्हढी झाली असती, म्हणून त्याने तो पर्याय बादच केला.

मोईला सुखात ठेवण्याचं वचन देऊन तोच मोईच्या सर्वात मोठ्या दु:खाला कारण झाला होता. ही निराशा त्याच्या मनावर, कामावरही व्यापली होती. सुरूवातीचे दोन-तीन दिवस त्याला फेईचाही राग आला होता. त्याच्यामुळेच मोईला हुनची खरी ओळख समजली होती. फेईला शोधून काढावं, आपल्या तलवारीने त्याचे तुकडे-तुकडे करावेत असंही त्याला वाटलं होतं. पण थोडा विचार केल्यावर त्याला वाटलं की तो स्वत:ही मोईला कधी ना कधी सत्य सांगणारच होता. तेच तिला फेईकडून कळलं. मात्र, ते ज्या पद्धतीने कळलं, त्यामुळे मोई त्याला दुरावली होती.

मोई जर समोर असती, तर तो तिची माफी मागणार होता. पुन्हा कधीच तिच्याशी खोटं बोलणार नाही, तिचं मन दुखावणार नाही असं वचन देणार होता पण मोई त्याला भेटायला तर हवी ना! अत्तराची कुपी उघडी राहिल्यावर अत्तर जसं उडून जातं, तसं त्याचं गुफित फुटल्यावर, मोई त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती. तिची समजूत कशी काढावी, हे त्याला समजत नव्हतं. अचानक त्याला मिंगची आठवण झाली. मोईच्या बोलण्यात ब-याचदा मिंगचा उल्लेख असायचा. आपलं गुपित फक्त मिंगलाच माहित आहे, असं ती म्हणाल्याचंही त्याला आठवत होतं. आता शेवटचा उपाय म्हणून मिंगचीच मदत घ्यावी असं त्याने ठरवलं.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

2 comments:

  1. मस्त रंगत चालली आहे कथा...
    (“हुन, तू मला सोडून नाही ना रे जाणार?” मोईने त्याला विचारलं होतं...अस जे लिहल आहे त्यात मला वाटते हुन ऐवजी तुंग असायला हव)

    ReplyDelete
  2. देवेंद्र, तो टंकलेखन दोष आहे. सुधारणा करते, लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! ही चूक माझ्या आधीच लक्षात यायला हवी होती.

    ReplyDelete