Sunday, January 31, 2010

सदैव – पान १४ (समाप्त)

प्रतिक्रिया: 
हुन तिच्यासोबत पलंगाजवळ आला. पलंगावरची पांढरी सॅटीनची चादर पाहून मोई जागच्या जागीच थांबली. हुनला ती अस्वस्थ आहे, हे कळत होतं पण त्यामागचं कारण त्याच्या लक्षात येत नव्हतं.

“खूप अवघडल्यासारखं होतंय का, मोई?” हुनने तिला विचारलं.

“अं? हो ना!” मोईने बळेच हसून उत्तर दिलं.

“बरोबर आहे. आज या घरात तुझी ही पहिलीच रात्र. असं वातावरण तू कधी पाहिलेलं नाहीस ना, म्हणून थोडं वेगळं वाटत असेल. शिवाय हे जड दागिने, कपडे....” असं म्हणून हुनने तिला पलंगावर बसवलं. हळूच तिच्या केशरचनेत गुंफलेला मोत्यांचा सर व फुलं काढली आणि मोईचे केस मोकळे केले. मोई आणखीनच अवघडली.

“मोई, या लाल पोशाखात तू खूप सुंदर दिसते आहेस.” हुनने तिला जवळ घेत म्हटलं. मोईने हुनचा हात बाजूला केला आणि ती उठून उभी राहिली. हुनने तिच्या कमरेला मागून विळखा घातला आणि तो मोईच्या कानात कुजबुजला, “मोई आजची रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र आहे. तुझ्यासारखी स्त्री माझी अर्धांगिनी बनली आहे. मला माझ्याच भाग्याचा हेवा वाटतोय.”

आता मात्र मोईला रडू फुटलं. बेचैन होऊन तिने आपला खालचा ओठ दातांखाली घट्ट दाबला. तिचं रडणं ऐकून हुनने तिला आपल्या दिशेने वळवलं. तिच्या डोळ्यांत पहात त्याने विचारलं, “काय झालं मोई. तुला कसला त्रास होतोय का? माझं काही चुकलं का?” मोईने मानेनेच ’नाही’ म्हटलं.

“मोई, तू माझ्यापासून काही लपवतेयंस का?” हुनने गंभीर स्वरात विचारलं.

आता जर आपण बोललो नाही, तर हुनचा गैरसमज होईल म्हणून मोईने सांगायचं ठरवलं पण ही गोष्टच अशी होती की कोणत्या शब्दात त्याला हे समजावून सांगावं तेच तिला कळत नव्हतं. कशीबशी शब्दांची जुळवाजुळव करत मोईने सांगायला सुरूवात केली.... ’दासींकरवी मिंगला कळलेली प्रथा, पलंगावर अंथरलेली सॅटीनची चादर, पहिली रात्र आणि अबाधित कौमार्याचा पुरावा...’ मोईने काही काही हातचं राखून ठेवलं नाही.

ती बोलत असताना हुन तिच्या चेहे-यावरचे हावभाव पहात होता. तिचं बोलणं ऐकून तोही गंभीर झाला होता. पण गोंधळलेली, बावरलेली मोई त्याला खूप आवडली होती. तिने बोलणं संपवलं आणि पापण्यांची फडफड करत ती हुनकडे पाहू लागली. हुन तिच्याकडे पाहून हसत सुटला. त्याला हसणं आवरेना पण मोईच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू तरारलेले पाहून त्याने हसणं आवरतं घेतलं. तो मोईच्या जवळ गेला. हलक्या हाताने त्याने तिच्या केसातून हात फिरवला.

“वेडी! कुणी सांगितलं तुला की लग्न म्हणजे दोन शरीरांचं मिलन असतं म्हणून? अगं जर दोन मनंच एकत्र आली नाहीत, तर शरीरं एकत्र येऊनही दुरावाच रहाणार! लग्नाची पहिली रात्र म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म असतो, याची मला पूर्ण कल्पना आहे. मला ही प्रथाही माहित आहे पण म्हणून तुझ्या कौमार्याची परिक्षा घेण्यासाठी मला या पांढ-या चादरीची आवश्यकता नाही.

मोई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवण्याआधी मी तुझी माहिती जाणून घेतली, ती केवळ कुणाच्याही प्रेमावर अन्याय होऊ नये म्हणून. तुझ्या पावित्र्याचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. आणि रहाता राहिली आजच्या रात्रीची गोष्ट, तर....” असं म्हणून हुनने आपल्या मान्यातून तलवार उपसली आणि आपला अंगठा तलवारीच्या टोकावर दाबला. रक्ताचा एक थेंब टचकन बाहेर आला.

मोई भान हरपून हुन काय करतो ते पहात होती. हुनच्या चेहे-यावर शांत हास्य होतं. रक्ताचा तो थेंब त्याने पलंगावरील सॅटीनच्या चादरीला हलकेच पुसला. त्याने पुन्हा मोईकडे पाहिलं.

“बस! झालं समाधान? आता तर दासींच्या मनात काही शंका उत्पन्न होऊन त्या चर्चा करणार नाहीत ना? आता तर माझ्या बाहूंच्या उशीवर तुला शांत झोप लागेल ना?” हुनने स्मितहास्य करत विचारलं.

मोईच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. हुनने आपले दोन्ही बाहू पसरून मोईला आपल्या दिशेने येण्यास खुणावलं. मोई धावतच त्याच्या मिठीत शिरली. ती अजूनही रडत होती. हुनने तिचं चुंबन घेतलं आणि म्हणाला, “मोई, तुझ्या अश्रूंनी आज या चुंबनालाही चव आली आहे. एरव्ही हे चुंबन गोड गोड वाटायचं. आज त्याला एक वेगळीच लज्जत आली आहे.” मोईने लाजून मान खाली वळवली.

“मोई, आपलं आयुष्य असंच लज्जतदार करायचं आहे आपल्याला. मी म्हटलं होतं ना, तुझ्या मताचा आदर करणं हे देखील प्रेमच आहे माझं. मी सदैव तुझ्यासोबत राहीन. तुझं काही चुकलं तर तुला सावरायला, तुला दिशा दाखवायला, मी नेहमी सोबत असेन. माझ्या आनंदात, दु:खात सहभागी होशीला ना मोई?”

मोईने होकारार्थी मान डोलावत म्हटलं, “होय हुन. मी सदैव तुमच्यासोबत असेन.”

हुनने आपल्या हातांनी पलंगावरची सॅटीनची चादर बाजूला काढून फेकली आणि तो मोईला आपल्या बाहुपाशात घेऊन विसावला. त्याच्या सुरक्षित मिठीत मोई केव्हा गाढ झोपी गेली हे तिचं तिलाही कळलं नाही.
- समाप्त
ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

14 comments:

 1. खास आहे. जास्त फाफटपसारा नं करता सुंदरपणे रेखाटली आहे. ज्या लोकगीतावर आधारुन लिहली आहे ते फारच सुंदर, निर्मळ आणि बरंच काही शिकवणारं असावं; किंबहुना आहे. खुपच छान.
  एका वाक्याने हसायला आलं - “काय सांगतेस? त्याने तुला लग्नाची मागणी घातली?” मिंगचे डोळे आश्चर्याने मोठे झाले होते.
  कारण एकंदर कथेदरम्यान चिनी पात्र डोळ्यासमोर उभी होती, त्यात एखाद्या चिनी पात्राचे डोळे आश्चर्याने "मोठे" झाले... (खुदुखुदु)... असो, थट्टा करत नाही. पण मोठ्या डोळ्यांचा चिनी म्हटल्यावर जरा... :P :D

  ReplyDelete
 2. आनंद, धन्यवाद.

  :) सौरभ, मुद्दामच डोळे मोठे झाले, असं लिहिलं होतं. चिनी लोकगीतामधे जो प्रसंग आहे, तो कथेच्या शेवटच्या दोन पानांमधे आहे पण त्या गीताबद्दलची माहिती वाचताना वाटलं की जर लग्नाच्या पहिल्या रात्री इतकं समजूतदारपणे वागणारा नवरा जिला मिळाला, तिचं बाकी आयुष्य किती समाधानात गेलं असेल? यामुळेच मला ही कथा लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

  ReplyDelete
 3. nice katha. keep it up

  ReplyDelete
 4. खूपचा छान कथा लिहिली आे. मुलानी नक्कीचा ही कथा वाचाईला हवी कारण प्रताईक मूलीना असचा जीवांसाठी हवा असतो. त्याचे वैिक्तिमत्वा फारचा छान रेखातले आे

  तुम्हाला मनापासून धन्यवाद

  ReplyDelete
 5. धन्यवाद अनामिक,

  इतर कथाही वाचून पहा. असा समजूतदार जीवनसाथी प्रत्येकाला मिळाला तर सर्वांचंच आयुष्य सुखकर होईल.

  ReplyDelete
 6. छान झाली आहे कथा.
  पहिले काही भाग सलग वाचले होते.पण नंतरचे भाग ब्लॉगजगतापासुन काही दिवस दुर झाल्याने राहुन गेले होते.ते वाचुन काढले आता.हो तुमच्या ब्लॉगवर आल्यावर आठवल की तुम्ही ’कैसी है ये ऋत’ चा मराठी अनुवाद करायला सांगीतला होता.बघतो आता प्रयत्न करुन...

  ReplyDelete
 7. देवेंद्र, तुमच्या कवितेचा दुवा मिळाला आहे. आज वाचते. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

  ReplyDelete
 8. सुंदर, निर्मळ आणि बरंच काही......

  ReplyDelete
 9. || छान आहे कथा , सुबक वाटली .... सर्व काही डोळ्यासमोर उभा राहत. पुढच्या भागाची वाट पाहतोय ||

  ReplyDelete
 10. || छान आहे कथा , सुबक वाटली .... सर्व काही डोळ्यासमोर उभा राहत. पुढच्या भागाची वाट पाहतोय ||

  ReplyDelete
 11. i like it very much. Hope God may bless every girl such a coveted life partner.
  -Nishi

  ReplyDelete