Friday, January 29, 2010

सदैव – पान १३

प्रतिक्रिया: 
“मग ’तो’ मान कुणाला मिळणार?”

“कुणाला म्हणजे? लिफेनला! तीच तर या शयनकक्षाची प्रमुख दासी आहे. हा कक्ष निटनेटका ठेवण्याची जबाबदारी तिचीच आहे ना!”

“हंऽऽऽ! लिफेन मग काय करणार त्या कपड्याचं?”

“अजून काही ठरवलं नाही, बाई! आधी मिळू तर देत.”

मिंगला कळेचना की हे बोलणं कशाबद्दल आहे. शेवटी तिने लिफेनलाच विचारलं, तशी लिफेन खुदूखुदू हसू लागली. मिंग आणखीनच गोंधळली. मग लिफेनने तिला सांगितलं.

“अगं वेडे, आज हुन सरकार आणि मोई बाईसाहेबांच्या विवाहाची पहिली रात्र! आज ते ह्या शयनकक्षात एकत्र झोपणार. त्यावेळेस, त्यांच्या येण्याआधी ह्या पलंगावर एक सॅटीनचा पांढरा कपड़ा चादरीसारखा अंथरायचा. जर मोई बाईसाहेबांचा कौमार्यभंग झाला नसेल, तर आज त्यांना मिळालेल्या एकांतानंतर या पांढ-या चादरीवर रक्ताचा पुसटसा का होईना पण डाग उमटलाच पाहिजे. असा डाग उमटलेली ती पांढरी चादर शयनकक्षाच्या प्रमुख दासीला म्हणजे मला मिळणार. ही प्रथा आहे इथली. खूप मान असतो बरं का ह्या कपड्याचा!”

मिंग हे ऐकून दचकलीच. विवाहानंतर, पहिल्या रात्रीच्या एकांतात कुमारिका स्त्रीला वेदना होतात असं तिने ऐकलं होतं. पण रक्त...! मनातील भिती धुडकावून टाकत मिंगने लिफेनला प्रश्न केला. “आणि.... समजा तसा डाग उमटला नाही तर....?”

“तर काय? मग आम्ही असं गृहीत धरतो की त्या स्त्रीचा लग्नाआधीच कौमार्यभंग झाला आहे.” लिफेनच्या या उत्तरावर सर्वजणी खिदळल्या.

“पण.... पण.... असंही होऊ शकतं की त्या रात्री नवरा-बायकोमधे काही घडलंच नाही.” मिंगने चाचरत आपली शंका बोलून दाखवली.

“होऊ शकतं ना! अगं पण जर पहिल्याच रात्री नवरा-बायको मधे दुरावा राहिला, तर पुढे काय होणार?” दुसरी एक दासी म्हणाली.

ह्या गप्पा अशाच चालू राहिल्या असत्या पण तेवढ्यात सरदार हुआन स्वत: तिथे आले. त्यांना पाहून सर्व दासी चपापून खाली बसल्या. मान खाली घालून त्यांनी दोन्ही हातांनी सरदार हुआनना अभिवादन केलं. सरदार हुआन बाहेरूनच शयनकक्षाचं निरिक्षण करून निघून गेले तसं दासींनी आटोपतं घेतलं. मिंगला केव्हा एकदा ही ऐकलेली गोष्ट जाऊन मोईला सांगतेय असं झालं होतं. अखेर मिंगला मोईला हे सांगण्याची संधी मिळाली. मिंगने मोईच्या कानात कुजबुजत ही गोष्ट सांगितली आणि मोईच्या उरात चांगलीच धडकी भरली.

लग्न म्हणजे सुख, आनंद, समाधान असं बरंच काही ऐकलं होतं मोईने पण पहिल्याच रात्री असं विचित्र संकट तिच्यासमोर उभं राहील, याची तिने कल्पनाही केली नव्हती. बरं! यातून सुटका होण्याचाही काही मार्ग दिसत नव्हता. त्या छोट्याशा बातमीने तिला चांगलंच अस्वस्थ केलं.

भेटवस्तू स्विकारण्याची वेळ संपली. जेवणं आटोपली. पण मोईचं कशातच लक्ष लागलं नाही. शेवटी नवरा-नवरीने आपल्या खास सजवलेल्या शयनकक्षात जाण्याची वेळ समीप आली. मोई आणि हुनच्या मागून ब-याच दासी गाणी म्हणत चालल्या होत्या. मिंग मोईच्या जवळच उभी होती. हुन तर आनंदाने ती गाणी ऐकत होता. मोई हुनकडे पाहून बळेच हसत होती. मिंगला मोईच्या मनातील गोष्ट माहित असल्याने तिला मात्र हसूही येत नव्हतं की ती गाणंही म्हणू शकत नव्हती.

शयनकक्षाच्या दाराशी येताच दासींची चेष्टामस्करी अधिकच वाढली आणि त्यांनी हुन व मोईला आत ढकलून दरवाजा बाहेरून बंद केला. हुन अजूनही बंद दरवाजाकडे पाहून हसत होता. मोईला मात्र दासीचं ते खिदळणं असह्य झालं होतं. हुनला आपल्या मनातील गोष्ट कशी सांगावी तेच तिला कळत नव्हतं.
ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment